Monday, 28 September 2020



पंचप्राणांचा प्राण

सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात — ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे *अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण
आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे.माझी खात्री आहे की हा लेख संपेतोवर तुम्हि तमाम रसिक मंडळी माझ्यासारखीच ईश्वरचरणी प्रार्थना कराल की , 'हे जगन्नियंत्या करुणानिधे , पंचप्राणांच्याही या प्राणांचं तू सदैव रक्षण कर!'
चला तर मंडळी या प्रवासाला......
मूळ आडनांव हर्डिकर असणार्या परंतू गोमंतकांत मंगेशी येथे स्थायिक झालेल्या एका कुटुंबातील एका प्रतिभावान माणसाचं नुकतंच लग्न झालेलं.जोडपं रहायला गोव्यात.सुस्वरूप व ऐन बाविशीतली पत्नी रोज मंगेशीच्या मंदिरात देवदर्शनाला जायची.एक दिवस तिथल्या गुरुजींनी तिच्या हातावर तीर्थ देताना तीर्थाबरोबर गोमुखातून तिच्या हातावर तिर्थासोबत एक सुपारीहि आली.हा कसलातरी शुभसंकेत होता.तिनं हि गोष्ट पतीच्या कानावर घातली.काहि कालाने तिला दिवस गेले.प्रतिभावान् अशा त्या गृहस्थाला ज्योतिषविद्याहि अवगत होती.त्याने तिला सांगितलं , "तुझ्या पोटात जे बाळ आहे ते अत्यंत प्रतिभाशाली असेल व अखिल जगतात नांव कमावेल!ते बघण्याचं सूख तुला लाभेल , हां .... पण ते बघायला मी मात्र जिवंत असणार नाहि !"
हे ऐकून तिच्या डोळ्यांत आसू अन् ओठावर हसू होतं! यथावकाश ती प्रसूत झाली व तिला मुलगी झाली.मुलीचं नांव ठेवण्यांत आलं ह्रृदया .....या मुलीनंतर तिला पुढे आणखीन तीन मुली झाल्या व या पहिल्या चार मुलिंच्या पाठीवर एक मुलगा झाला.
मंडळी तो प्रतिभावान् गृहस्थ म्हणजे मराठी नाट्यसंगीताचे दिग्गज मास्टर दीनानाथ मंगेशकर , त्या गृहस्थाची ती पत्नी म्हणजे शुद्धमती ऊर्फ माई मंगेशकर आणि या उभयतांनी अखिल भारतालाच नव्हे तर अखिल जगताच्या संगीताला ज्या पंचप्राणांचा अमोल ठेवा दिला ते संगिताचे पंचप्राण म्हणजेच :
२८ सप्टेंबर १९२९ रोजी रात्री ९.३३ वाजता मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी) च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे जन्मलेली ह्रृदया ऊर्फ लता
७ सप्टेंबर १९३१ रोजी जन्मलेली मीना
८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेली आशा
१५ डिसेंबर १९३५ रोजी जन्मलेली उषा आणि
२६ आॅक्टोबर १९३७ रोजी जन्मलेला ह्रृदयनाथ
मंडळी , आता मी तुम्हाला सांगणार आहे या पंचप्राणांचा प्राण असलेल्या लता ची हकीकत.....लौकिकार्थाने आज लता ९० वर्षांची झाली व आज तिचा वाढदिवस ! लताला उदंड निरामय आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि पुढिल भागाकडे वळतो ....
लता मंगेशकर हि एक व्यक्ति नसून ते एक संगीतक्षेत्रातलं विद्यालय आहे! — खरं तर या एवढ्या एका वाक्यातंच हा लेख संपला असं जाहिर करायला हरकत नव्हती , जर का या लेखाचा उद्देश हा लताने गेल्या ८० वर्षांत किती गाणी गायली? असा असता तर.....असंख्य संगीतकारांनी लताला घडवलं अशा वदंता ऐकल्या पण खरं तर अगणित गीतांना , गीतकारांना , संगीतकारांना , साजिंद्यांना लतानी घडवलं असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरावं...पण हा मुद्दा अलाहिदा.....
२४ एप्रिल १९४२ ला मास्टर दीनानाथ इहलोक सोडून गेले आणि तेंव्हापासून आजतागायत् लताने ह्या ७९+ वर्षांत मंगेशकर कुटुंबाला एकखांबी तंबू होऊन कसं सांभाळलंय , आभाळाएवढ्या पित्याचं छत्र हरवलेल्या लताला अकाली प्रौढ व्हावं लागलं , लताच्या विनम्र वागणुकीमागचे नियतीचे असंख्य आघात , कठीण प्रसंग सोसत तिने आत्यंतिक मायेने सांभाळलेलं घर ..... एक माणूस म्हणून लता किती उच्चस्थानी आहे ....हे सगळं तुम्हाला कळावं एवढा एकमेव उद्देश आहे या लेखाचा ! आयुष्यभर खपलेल्या या माझ्या लता माऊलीला तिच्या कष्टांचं यथायोग्य श्रेय तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्या मनाच्या गाभार्यापासून मिळावं यासाठी हा सारा खटाटोप.....
मास्टर दिनानाथ यांनी 'बळवंत संगीत मंडळी' हि नाटक कंपनी सुरु केली होती.दीनानाथ , चिंतामणराव कोल्हटकर व दिनानाथांच्या बहिणीचे यजमान कृृष्णराव कोल्हापुरे ( म्हणजे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचे वडील! ) असे तिघे या संस्थेचे पार्टनर्स होते. रणदुंदुभी सारखी गाजलेली नाटकं संस्थेने रसिकांना दिली.नंतर सिनेमायुगामुळे बळवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन हि कंपनी काढून कृष्णार्जुन युद्ध हा सिनेमा काढला.पण अगदी याचवेळी दिनानाथांची खोटि सहि करून आर्थिक व्यवहार करून दिनानाथांना व पर्यायाने कंपनीला एकानं गोत्यात आणलं.दीनानाथ व चिंतामणराव न्यायालयापुढे हजर झाले.पुढे फोर्जरी सिद्ध झाल्याने दीनानाथ निर्दोष सुटले व कालांतराने चिंतामणरावहि.पण या मानसिकतेनं दिनानाथांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला.बोलपटांचा जमाना आल्याने नाटकांना प्रेक्षक मिळेनात.मग नाटक कंपनी बंद केली. पण ते कंपनीचं प्रचंड सामान ठेवण्यासाठी धुळ्याला जागा घ्यावी लागली.सामान ठेवलेल्या जागेच्या चाव्या विश्वासाने ज्यांच्याकडे सोपवल्या त्या पाटणकरांनी विश्वासघात करत सामान हडप केलं.
नाटक कंपनी बंद झाल्यावर दीनानाथ काहि काळ गोव्यात होते व मग पुण्यात स्थायिक झाले.चरितार्थासाठी शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सुरु केले.एके काळी २०० हून अधिक माणसांचे अन्नदाते असलेल्या दिनानाथांसोबत लताहि कार्यक्रम करू लागली.मंडळी , वयाच्या दहाव्या— अकराव्या वर्षी लता बाबांबरोबर सोलापूर , पुणे , सांगली सारख्या ठिकाणी स्टेज शोज् मधून खंबावतीसारखे राग व नाट्यपदं म्हणत होती.आणि असंच दोन एक वर्ष चालल्यावर एके दिवशी अचानक दीनानाथ हा इहलोक सोडून गेले! ( २४ एप्रिल १९४२ ) .जेमतेम १३ वर्ष वयाच्या लताला ससून हाॅस्पिटलमधून परतलेल्या माईकडून — म्हणजे स्वत:च्या जन्मदात्या आईकडून ही दु:खद हकीगत जाणून घेण्यासाठी उषा व ह्रृदयनाथला स्वयंपाकघरात कोंडावं लागलं ! खेळण्या—बागडण्याच्या वयात लता अकाली प्रौढ झाली ! सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्योतिष जाणकार दिनानाथांनी सांगितल्याप्रमाणेच हे अशुभ घडलं होतं.....
सुबत्ता असताना महिनोन् महिने घरी येऊन रहाणारे नातेवाईक लुप्त झाले.दिनानाथांच्या मोठ्या फोटोपुढे बसून लता रियाझ करू लागली.....सहा एक महिन्यांनी लता १३ वर्षांची झाली त्याच दिवशी मास्टर विनायक ( म्हणजेच अभिनेत्री नंदा चे वडील. )घरी आले व त्यांनी लताला नवयुग पिक्चर्स साठी करारबद्ध केलं ! महिना ८०/— ₹ मानधनावर संसाराचा गाडा सुरु झाला.यावेळी लता कोल्हापुरात रहात होती.
१९४३ साली दिनानाथांची पहिली पुण्यतिथी साजरी केली — मास्टर विनायकांनी व अत्यंत हृद्य कंठांनी लताने तिच्या आद्य गुरुंची — दिनानाथांची आवडती नाट्यपदं त्या कार्यक्रमात म्हटली.नंतर चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मा.विनायकरावांना मुंबईत जावं लागलं आणि पर्यायानं लताला पण.माई व इतर भावंडं इंदोरला निघून गेली व लता मुंबईत आली.आणि इथेच लताच्या जीवनाला कलाटणी मिळाली.लौकिकार्थाने शालेय शिक्षण संपलं पण विनायकरावांमुळे लताने भेंडीबाजारवाले खाँ साहेब अमान अली खाँ यांचं शिष्यत्व पत्करलं.पण जेमतेम वर्षभरातंच ते तळेगांवला निघून गेल्याने लताचं हेहि शिक्षण खंडित झालं.मग लता अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे शिकू लागली.पण वर्षभरातंच तेहि गावाला निघून गेल्याने लताचं हेहि शिक्षण खंडित झालं.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या *किती हसाल* (इ.स. १९४२) ह्या मराठी सिनेमासाठी गायलं, पण हे गाणे नंतर सिनेमातून वगळलं गेलं. मास्टर विनायकांनी लताला नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) ह्या मराठी सिनेमात एक छोटीशी भूमिका दिली. ह्या सिनेमात लतानं नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी संगीतबद्ध केलेलं गाणं स्नेहप्रभा प्रधानसोबत म्हटलं.लताने वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) ह्या हिंदी सिनेमासाठी पा लागूं कर जोरी हे गाणं गायलं ( संगीतकार : दत्ता डावजेकर ). लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी सिनेमात ( बडी माँ - १९४५ ) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या सिनेमात लतानं माता तेरे चरणोंमें हे भजन गायलं.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला.पण त्याच साली मा.विनायकरावांचं निधन झाल्यानं लतावर परत पारतंत्र्य कोसळू पहात होतं.पण कुठेतरी बाबांचा आशीर्वाद कामी आला.विनायकरावांच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी लताला सूद प्राॅडक्शनचं काम मिळालं व लताने त्यांच्या एका आगामी सिनेमासाठी २—३ गाणी गायली.पण दुर्दैवाने तो सिनेमा प्रदर्शितंच झाला नाहि!
१९४७ साली लताला खरा तारणहार भेटला : संगीतकार गुलाम हैदर ! गुलाम हैदरनं लताचं गाणं ऐकलं व तो तिला निर्माते शशधर मुखर्जींकडे घेऊन गेला — जे त्यावेळी शहीद सिनेमा बनवत होते.लताचं गाणं ऐकल्यावर मुखर्जींनी *लहान मुलीसारखा लताचा आवाज असल्याचं* कारण दिलं.पण गुलाम हैदर लताला काम मिळवून देण्याचा जणू चंगंच बांधून आलेला!तो गोरेगांवहून लताला घेऊन मालाडला आला : बाॅम्बे टाॅकीज हाऊस ला.मालकीण देविकाराणी हि रशियन नवर्याबरोबर निघून गेलेली.त्यामुळे बाॅम्बे हाऊस चालवत होते अशोक कुमार आणि सावक वाच्छा .तिथे लताने मजबूर साठी मुकेशसोबत अंग्रेजी छोरा चला गया गायलं.नंतर लताला इथेच आयुष्याला कलाटणी देणारं महल मधलं 'आएगा आनेवाला' हे गाणं खेमचंद प्रकाशच्या संगीतात गायला मिळालं आणि लतासाठी यशाचा 'महल' उघडा झाला !
खेमचंद प्रकाशच्या 'आएगा आनेवाला' नं लताला 'नौशाद' नावाचं संगीताचं कोंदण मिळवून दिलं...आधी 'दुलारी' , मग 'अंदाज' मधलं 'उठाए जा उनके सितम्' गाजलं ... मग गाण्यांची 'बरसात' झाली व लता बहरत गेली.एंव्हाना माई व भावंडं पण मुंबईत आली होती व लता स्थिरावत चालली होती.
१९७६ साली आशाने लतावर लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं :
दीदीची आठवण येणारं एकंच दृष्य — पहाटेच्या गडद अंधारात आपल्या उंचीपेक्षा मोठा तंबोरा घेऊन ती गात्येय.दोन लांबलचक काळ्याभोर वेण्या जमिनीवर काळ्या नागिणीसारख्या लोळतायत ! पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या आमच्या राहत्या घरात मी , मीना उषा व बाळ एकाच रजईत झोपलोय.हि थोरली केंव्हा उठते कळतंच नाहि.हळूहळू तिच्या गोड आवाजाच्या धुंदीत मी परत झोपून जाते!
माईंनी सांगितल्याप्रमाणे मी जेंव्हा २—३ महिन्यांची होते तेंव्हा दीदी मला घेऊन खूप पळापळ करायची.तिला माझे गुबगुबीत गाल व गालावरच्या खळ्या खूप आवडायच्या.असंच एकदा मला घेऊन दीदी पळत असता पहिल्या मजल्यावरून धाडकन गडगडत खाली आली.दीदीच्या डोक्याला जबरदस्त खोक पडली.माझ्याहि डाव्या भुवईखाली लागल्यामुळे झालेला व्रण मला आजहि दीदीच्या माझ्यावरील प्रेमाची आठवण करुन देतो !
माझा जन्म झाला त्यावेळच्या पद्धतीनुसार १३ दिवस माईला किसमिस घातलेला साजूक तुपातला हलवा खायला देत असत.माई इकडे हलवा खाई व पांढर्या दुपट्यात गुंडाळलेली मी झोपलेली असायची.हे बघून जेमतेम ४ वर्षाची दीदी कळवळून जायची.असंच एकदा कळवळून दीदीने तिला आवडणार्या किसमिसचा एक दाणा माझ्या तोंडात टाकला.तो माझ्या घशात अडकला.शेवटी मला उलटं करुन पाठीत २—३ धपाटे घातल्यावर तो दाणा निघून गेला..... पण दीदीला मात्र खूप बोलणी बसली.
दीदी जिथे काम करी तिथल्या मालकाची पत्नी अतिशय गर्विष्ठ व संस्कार—मर्यादाशून्य होती.ती दीदीला खूप घालून पाडून बोलायची."भिकारीण कुठची ! कधी जन्मात चांगलं—चुंगलं खाल्लंय का ?"पण आमची दीदी संस्कारक्षम व विनयशील....तिने कधीही त्या बाईवर डूख धरला नाहि.त्या बाईचे वाईट दिवस आल्यावर दीदी कार्यक्रमाच्या माध्यमातून पैसे गोळा करून तिला पाठवत असे!
दीदीला डाॅक्टर व्हायचं होतं.पण परिस्थितीअभावी दीदीला आमच्यासाठी खस्ता खाव्या लागल्या... मी १३—१४ वर्षांची असताना शेजारच्या रेशनिंग अधिकार्याशी लग्न करून घर सोडून आले तेंव्हा दीदी खूप नाराज झाली.माझा नवरा दीदीला शिव्या देई व बदनाम करी. माझ्या नाकातून रक्त येई व मग मी बेशुद्ध होई.मला असा डिप्थेरिया झाल्याचं कळल्यावर ( तेंव्हा मी एका मुलाची आई होते व दुसरा पोटात होता! ) मला अंगात ताप होता.पण दारात बघते तो दीदी — माई , मीनाताई , उषा व बाळला घेऊन हजर ! मी "तुम्हि सगळे इथे कसे?" म्हटल्यावर दीदीने मला बघायला आल्याचे सांगितले.भरल्या डोळ्यांनी व दाटल्या कंठानी "मी मेले असते तरी चाललं असतं, पण तू इथे यायला नको होतंस!" असं म्हटल्यावर दीदी म्हणाली की "अगं वेडे , माफ करण्यात जी मजा आहे ती बदला घेण्यात नाहि!"
पुढे दुर्दैवगतीने राहत्या वस्त्रांनिशी मी मुलगा हेमंत , मुलगी वर्षा व पोटातल्या बाळासह रस्त्यावर आले ! तेंव्हा दीदीने मला भरभक्कम आधार दिला.पुढे मी प्रसूत झाल्यावर मुलाचं नाव दीदीने आनंद ठेवलं.एकवेळ मी मुलांवर चिडले तर मला दीदीची बोलणी खावी लागली आहेत ! दीदींनी मुलांचे अतोनात लाड केलेत!
दीदीमधे एक छोटीशी बाहुली लपलेली आहे.साध्या सरळ आयुष्याशी जोडली गेलेली , कुणाहि सर्वसामान्य माणसासारखीच अतिशय कमी गरजा असलेली दीदी हि एक आदर्श दीदी आहे!
मंडळी , आता मी काहि किस्से सांगणार आहे की जे ऐकल्यावर लताबद्धलचं तुमचं प्रेम व आदर द्विगुणित होईल !
पुण्याला रहायला आल्यावर 'खजांची' मधल्या गाण्यांची
एक स्पर्धा होती.लताच्या मावशीचे यजमान गोडबोले दादांनी मास्टर दीनानाथांची परवानगी न घेताच लताचं नांव त्या स्पर्धेत दाखल केले.नंतर हे कळल्यावर मास्टर दीनानाथ भयंकर चिडले व लताला म्हणाले , "आता माझे नांव घालवणार तू! जा! या स्पर्धेत पहिली ये नाहितर पुन्हा घरी येऊच नकोस!" आणि लताने खजांची मधलं गाणं म्हणून स्पर्धेत पहिलं येण्याचा मान पटकावला ! पुढे याच खजांची च्या संगीतकार गुलाम हैदरनी लताच्या आवाजाची सिनेक्षेत्रात शिफारस केली !
सोलापूरच्या नूतन संगीत थिएटरला ९ सप्टेंबर १९३९ ला रात्री जलशामधे मास्टर दीनानाथ यांच्या बरोबरीने लताने स्टेजवर पहिलं पाऊल ठेवलं ! उण्यापुर्या १० वर्षाच्या लताने तेंव्हा 'आलीरी मैं जागी' ही खंबावतीतील चीज म्हटली ! त्यानंतर ब्रह्मकुमारी मधील 'मधुमिलनात या' हे दीनानाथांचं पद म्हटलं !
१९४२ साली दीनानाथ हे जग सोडून गेले.आणि लताने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पहिली मंगळागौर सिनेमात तिनं काम केलं व बाबूराव गोखले यांनी लिहिलेलं तिचं पहिलं गाणं स्नेहप्रभा प्रधान सोबत रेकाॅर्ड झालं : 'नटली चैत्राची नवलाई'
१९४३ साल : गजाभाऊसिनेमातल्या गाण्याचं शूटिंग होतं.लताच्या अंगात १०४ डिग्री फॅरनहाईट एवढा ताप होता.त्या भर तापाच्या अवस्थेत लता शूटिंगला गेली.तिला परीचे कपडे घातलेले व पंखांना दोर्या बांधून टांगून ठेवलेले! पण ते सगळं सहन करत तिने शूटिंग पार पाडलं ! याच मराठी सिनेमात लताने आपल्या आयुष्यातलं पहिलं हिंदी गाणं गायलं : माता एक सपूतकी दुनिया
एकदा बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या गायनाचा कार्यक्रम एके ठिकाणी चालू होता.सारे श्रोते तल्लीन होते.अचानक जवळंच कुठेतरी लताचं गाणं वाजायला लागलं. 'कदर जाने ना , मोरा बालम बेदर्दी' लताचे सूर कानावर पडल्यावर खाँ साहेबांनी स्वत:ची भैरवी गाणं बंद केलं आणि ते डोळे मिटून स्वस्थपणे लताचं गाणं ऐकू लागले.गाणं संपल्यावर खाँसाहेब म्हणाले , "तौबा तौबा ! विलक्षण मुलगी , कधीच बेसूर होत नाहि.जो प्रभाव आम्हि ३ तास गायल्यानंतरहि पाडू शकत नाहि तो ती ३ मिनिटांत पाडते ! काय जबरदस्त देणगी आहे अल्लाहची !"
एकदा बाळासाहेबांनी म्हणजे पंडित ह्रृदयनाथनी अमीर खाँसाहेबांना विचारलं , "खाँसाब , दीदीके गानेके बारेमें आपकी क्या राय है?" बर्याच वेळाच्या स्तब्धतेनंतर भावनाविवश होत ते म्हणाले , "हमनें बरसो रियाज़ किया , ख़ाक किया! जो बात हम तीन घंटोंमें पैदा करतें हैं , वो सिर्फ तीन मिनटमें पैदा करती है! बाल , क्या दीवान—ए—ग़ालिब फिरसे लिखा जाएगा ? नहीं ना ? तो फिर लता जैसी आवाज ख़ुदा भी फिरसे कैसी पैदा करेगा ?"
कुमार गंधर्वांनी लतावर लिहिलेल्या लेखात लताला चित्रपटसंगीताची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हटलंय.असा कलाकार शतकातून एकदाच निर्माण होतो !
पंकज पुरोहित सुबीर नामक एका पत्रकाराला कुणीतरी विचारलं की "तुला जीवन व मरण कसं काय हवं?" यावर सुबीर म्हणाले , "कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मी एखाद्या निर्मनुष्य डोंगरावर बसलेला असावा.चंद्रावर कॅसेट रेकाॅर्डर ठेवलेला असावा.आणि तिथून लताजींचा आवाज हळूहळू माझ्यापर्यंत पोचावा. नीला आसमाँ सो गया! हे लताजींचं गाणं माझ्यासाठी जीवन आहे.मला जेंव्हा मृत्यू येईल तेंव्हा लताजींचा स्वर ऐकतंच यावा. कभी तो मिलेगी , कहिं तो मिलेगी , बहारोंकी मंलि राही! — हे गीत ऐकत असताना मृत्यू आला तर विचारायलाच नको !"
मंडळी हा लेख संपवण्यापूर्वी मी एक महत्वाचं विवेचन नोंदवू इच्छितो :
अनादी कालापासून एखाद्या कलाकाराने कुणाचीही लकब जशीच्या तशी साकार करून दाखवली की तो कलाकार " 'न' कलाकार " ठरतो ! ( मराठीची करामत ! — सप्रेम punch ! ) आणि आपण अशा कलाकाराचं वारेमाप कौतुकच करत आलोय ! पण ज्या कलाकाराकडून वर्षानुवर्षे शेकडो अभिनेत्रींचा प्ले बॅक दिला जातो आणि तोही अशा प्रकारे की नऊ रस अनेक वेळा पडद्यावर अभिनयातून दिसोत वा ना दिसोत पण गात्या गळ्यातून मात्र चपखल व्यक्त करणार्या लतासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराचं कौतुक करताना मात्र आपण हात थोडासा आखडताच घेतो असं मला कायम वाटत आलंय ! जगात कुणालाही सहज यश मिळत नसतं आणि तसंच लतालाही ते मिळालं नाहिये ! रात्रंदिवस मेहेनत करून तिनं अथक परिश्रमाने पंचप्राणांचं , पाच अक्षरांचं मंगेशकर कुटुंब जपलंय ! गडगंज श्रीमंती अपार कष्टानं आपल्याकडे खेचून आणली आणि तरीही लताला कधीही फार झगमगत्या पोशाखांमधे , दागदागिन्यांनी मढून गेलेली व भपकेबाज , आपल्याच तोर्यात असणारी अशी मीच काय कुणीही पाहिलेली नाहि ! कायम साधी रहाणी आणि विनम्र स्वभावाने ती वावरत आली ! कल्पना करून बघा मंडळी , पगार झाल्याच्या दिवशी तुमच्या—माझ्यासकट तमाम दुनिया कशी धुंदीत वावरते ! मग लतानं असं वागायला काय हरकत होती ? — नव्हे , तसं ती वागती तर ते अगदी नैसर्गीकच नव्हतं काय? पण ती कायम साधी सोज्वळच राहिली ! हाताच्या पाच बोटांची मूठ शक्तिशाली ठरावी तशी ती कायम कुटुंबातील पांच जणांना एकत्र बांधून अविचल राहिली ! मास्टर दीनानाथांच्या अकाली जाण्यानं वयाच्या १३ व्या वर्षापासून ती अकाली प्रौढ झाली व आज ती ९० वर्षांची झाली आहे! ७८ वर्षं ! मंडळी , ७८ वर्ष तिनं कुटुंब एकत्र ठेवलंय ! तेही सगळ्या भावंडांची आपापली संगीत साधना करत असताना त्यांना पाठिंबा देत ! तिची फोटोग्राफी उत्तम आहे , ती उत्तम नकलाकार आहे , तिला बंगाली , पंजाबी , उर्दू अशा अनेक भाषा अस्खलितपणे बोलता येतात ! ती उत्तम चित्रकार आहे ! तिला नसेल वाटलं कधी हौसमौज करावीशी ? पण ती सगळ्यांची 'दीदी' झाली व आपल्या सगळ्या हौशींना तिनं मुरडच घातली ! खेळण्या बागडण्याच्या वयापासून ती झिजत्येय , अविरत झिजत्येय ! मान्य आहे की आपल्याच कुटुंबासाठी झिजत्येय , पण त्याचा परिणाम तिनं गाण्यावर होऊ दिला का ? — तर नाहि ! आज कित्येक तपं ( १२ वर्षांचं एक तप ) लताच्या आवाजाने आपल्याला पहाटेच्या भूपाळीपासून ते रात्रीच्या अंगाई गीतापर्यंत , प्रचंड आनंदापासून ते अतीव दु:खापर्यंत आपल्या सगळ्या भावभावनांना साक्ष देणारी अनेक गाणी , श्रृंगाररसापासून ते भयावह प्रसंगांपर्यंत सगळे भाव , हुबेहूब आपल्या अंतरीच्या भावनांना वर्षानुवर्ष लताच्या आवाजानं व्यापून टाकलंय ! माझ्यासकट तमाम जनता कुठल्याही गायक—गायिकेबद्धल शेरेबाजी करायला , त्यांचं व्यक्तिगत जीवन चव्हाट्यावर मांडायला उत्सुक असतात , का ? तर त्या सार्वजनीक प्रसिद्ध व्यक्ति म्हणून ? आपल्या चुका जाहीरपणे कुणी मांडल्या तर आवडेल आपल्याला ? नाही ना ? मग जी गोष्ट आपल्याबाबत इतरांनी करु नयेसं आपल्याला वाटतं तीच गोष्ट आपणही अशा व्यक्तींच्या बाबत करु नये असं मला प्रामाणिकपणाने वाटतं ! लताच्या जीवनातल्या अनेक खाचखळगे जसे मला माहित आहेत तसे तुम्हालाही माहित आहेत ! पण आज तिच्या वाढदिवशी किंबहुना कधीही ते आपण मांडू नयेत असं मला वाटतं ! लतासारखे कलाकार हजारो वर्षांतून एकदा जन्म घेतात ! आपण भाग्यवान आहोत की आपण अशा देशात जन्म घेतला जिथे लताच्या आवाजाने दिवस उगवतो व तिच्याच लोरीने आपल्या घरातली तान्हि बाळं झोपी जातात ! लता , आम्हि धन्य झालो की तुझ्या सूरमयी आवाजाच्या टाॅनिकवर लहानाचे मोठे झालो! आणि याच तुझ्या आवाजाशी व तुझ्या या अनुपम सुरावटींच्या बरसातीशी आम्हाला आमरण कृतज्ञ राहू देत !—हीच त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडे प्रार्थना !
मंडळी लता गाते तसंच ती एक उत्कृष्ट नकलाकार आहे.एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहे.तशीच एक उत्कृष्ट चित्रकारहि आहे!
मंडळी , लताच्या भावना मास्टर दिनानाथांविषयी 'कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला!' अशा असल्या तरी या लतामाऊलीनं मंगेशकर कुटुंबियांसाठी केलेला त्याग पाहता असं म्हणावसं वाटतं की "कल्पवृक्ष कन्यारूपी लावुनिया बाबा गेला!"
लताने एकूण किती गाणी गायली , कुणासाठी गायली , किती पुरस्कार मिळवले हे सांगणारे कितीतरी लेख झाले असतील व तिच्या असामान्य कर्तृत्वामुळे इथून पुढेहि होतंच रहातील.पण एक माणूस म्हणून लता हि एक सह्रृृदय वात्सल्यमूर्तीच आहे आणि हे तिचं प्रेमळ रूप जे मला भावलं ते तुमच्यापर्यंत पोचवावं एवढा एकमेव उद्देश मनात ठेऊन हे लिहायचं साहस केलंय ! सगळ्यांना दीदी म्हणून लताला आदरार्थी एकेरी न संबोधणार्या तमाम रसिक लोकांच्या मनाविरूद्ध मी लताचा उल्लेख एकेरी केलाय , करतोय आणि कायम एकेरीच करत रहाणार ..... कारण आईला कुणी अहो जाहो करतं का हो ?
हे जगन्नियंत्या परमेश्वरा , मंगेशकर कुटुंबातील पंचप्राणांचाहि प्राण असणार्या या माझ्या माऊलीला निरामय आरोग्य दे , तिच्यातील लहान मूल जे मिश्किल हसतं , हुबेहुब कुणाच्याही नकला करतं , निरागस हसतं — ते चिरंतन लहान राहूदे आणि तिला आज तिच्या ९० व्या वाढदिवशी देतोय.
(सदर लेख व्हाॅटस् अप फाॅरवर्ड आहे. त्यामुळे लेखकाचे नाव देता आले नाही. कुणाला माहिती असल्यास कळवावे म्हणजे योग्य ती दुरूस्ती करता येईल).

 

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....