Tuesday, 27 August 2024

ळ' अक्षराचा घडलेला किस्सा...



 ळ' अक्षराचा घडलेला किस्सा...

सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी ग दि माडगूळकर यांना, प्रत्येक ओळींच्या शेवटी '' हे अक्षर येईल असे वेगळे भावगीत लिहून द्या असे सांगितलं....
अण्णांनी ते चॅलेंज स्वीकारलं, आणि केवळ 15 मिनिटांत गाणं लिहिलेला कागद बाबूजींना आणून दिला...
आणि म्हणाले,बाबूजी, तुला 'ळ' हे अक्षर हवे होते ना? घे...
एवढे बोलून गदिमा निघाले, तसे बाबूजी म्हणाले, आण्णा, कुठे निघालात? गाण्याची चाल ऐकूनच जा....
आणि बाबूजींनी हार्मोनियम घेतली, चाल कंपोझ केली....
आणि "यमन" रागात एक अप्रतिम भावगीत जन्माला आले...
गदिमा यांनी लिहिलेल्या त्या भावगीताच्या ओळी अशा होत्या....
सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होईल अर्थ निराळा

घन निळा लडिवाळा
झुलवू नको हिंदोळा

हे भावगीत बाबूजींनी माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांच्याकडून गाऊन घेतले, ते आजही उत्तम आहे, लोकप्रिय आहे, अजरामर आहे....
ग्रेट गदिमा....ग्रेट बाबूजी...
खरे प्रतिभासंपन्न..
हे गाणं शुभा खोटेंवर चित्रित केले...आणि तबल्यावर साथ करत आहेत उस्ताद अहमद जान थिरकवा आणि हार्मोनियम वर तुळशीदास बोरकर...

गोपाळ काला व दही हंडी उत्सव

 दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.  श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला हा दहीहंडीचा सण साजरा केला जातो.  देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रासह गुजरात, गोव्यात या सणाचा थाटमाट मोठा असतो.गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने गोकुळात  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींना उजाळा देणारा सण आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, खोडकर बालकृष्णाला दही. दूध आणि लोणी (माखन) खूप आवडायचे. त्या काळी गोकुळात दूध, दही, लोणी साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारच्या घरांतून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र-सवंगड्यांच्या हाती दही-लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली. यावेळी कृष्ण मित्र-सवंगड्यांसह मानवी मनोरा बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे. असा खोडसाळपणा कृष्ण व त्याचे सवंगडी करीत असले तरीही गोकुळातील रहिवासी आनंदी होते. दहीहंडी उत्सव बालगोपाळांच्या बालपणापासूनच्या या खेळकर गमतीजमतींची आठवण करून देतो.

कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.







 

Friday, 9 August 2024

नागपंचमी




ॐ भुजंगेशाय विद्महे,
सर्पराजाय धीमहि,
तन्नो नाग:प्रचोदयात्।।

श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी. निसर्ग साखळीत नाग हा महत्त्वाचा प्राणी आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक सांगड घालत घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते.

पौराणिक काळापासून हिंदू धर्मात नागाला देवता मानले गेले आहे. भगवान शिवाच्या गळ्यात नाग असतो तर विष्णू शेषशायी म्हणजे शेष नागाच्या वेटोळ्यावर विश्रांती घेतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. नाग/सर्प हा शेतकऱ्याचा मित्र ही मानला जातो कारण तो अनेक उपद्रवी प्राण्यांपासून शेताचे/पिकांचे रक्षण करतो. साधना मार्गात कुंडलिनीला ही सर्पाची उपमा दिली आहे त्यामुळे नाग हा कुंडलिनी शक्तीचेही द्योतक मानला जातो. भगवान श्रीकृष्णा ने आजच्याच दिवशी यामुनेतील कालिया नागाला स्वतःच्या वशीभूत केले होते. अश्या अनेक कारणांमुळे आजच्या दिवशी सर्प पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. सर्प सहसा विनाकारण कोणालाही दंश करत नाही, शेतकरी वर्ग सापाचे आभार मानण्यासाठी व सर्पदंश न व्हावा या हेतूने आजच्या दिवशी भगवान शिव व विष्णू ला प्रिय असलेल्या नागाचे मनोभावे पूजन करतात. महिलांनी त्याला भाऊ समजून पूजल्यास भावा बहिणींचे आयुष्य वाढते. नागाचे मनोभावे पूजन केल्यास हाती घेतलेल्या सर्व कार्यास गती प्राप्त होते व कार्य पूर्णत्वास जाते अशी मान्यता आहे.  प्राचीन काळी नागपंचमीच्या दिवशी कुस्त्या आणि नृत्य -नाट्य होत.

काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तर काही ठिकाणी पाटावर चंदनाने/ तांदळाचे ९ नाग काढून तर काही ठिकाणी जीवतीच्या कागदावर असलेल्या कालिया नागाची पूजा केली जाते. नागाची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहतात.  तसेच नाग प्रतिमेला फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी वाहतात. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या सर्पयोनीतील नागदेवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे . तसेच या दिवशी हे नागस्तोत्रदेखील म्हटले जाते.

अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, उकडलेले पदार्थ करावेत, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, भूमी उकरू नये असा दंडक आहे. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आणि मुली संध्याकाळी गावाबाहेर नागाच्या वारुळावर अथवा देवळात जात असत. दूध लाह्या वाहून नागांची पूजा केल्यानंतर झिम्मा फुगड्या इत्यादी खेळ आणि झाडांना झोपाळे बांधून त्यांवर झोके घेणं, फेर धरून गाणी म्हणणं हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. ही गाणी गद्यप्राय होती त्यांत बाळाई, भारजा, जैता, बहुला गाय इत्यादींच्या कथा गुंफलेल्या असत. क्वचित त्यात सासर- माहेरचा जाच किंवा कौतुकही शब्दबद्ध झालेले असायचे.

नागपंचमीच्या सणाला संपूर्ण भारतात आगळे महत्त्व आहे. महाराष्ट्र, गुजरात, काठियावाड इत्यादी भागांमध्ये नाग ही कुलसंरक्षक देवता मानली जाते. महाराष्ट्रात घरोघरी मातीचे नाग करून पूजा केली जाते. गुजरातेत नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात आणि मूर्तीवर जलाभिषेक करतात. वऱ्हाडात मुंग्यांच्या वारुळाजवळ नागमूर्ती ठेवून तिची पूजा करतात.  महाराष्ट्रात बत्तीस शिराळ्याला नागपूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते.  वसईतील शेषवंशी समाजात आणि पालघर जिल्ह्यातील वनवासी क्षेत्रात पूर्वापार नागपूजा मनोभावे केली जाते.

उत्तरप्रदेशात मथुरा, वाराणसी, अहिच्छत्र या ठिकाणी नागपूजेची मोठी केंद्र आहेत. उत्तरप्रदेशात नागपंचमीच्या दिवशी घरातील पुरुष दुधाची भांडी घेऊन गावाबाहेर अथवा जंगलात जातात आणि नागांच्या वारुळात ती दुधपात्रे रितीकरून येतात. काशीत या दिवशी सकाळी नागलो भाई नागलो, छोटे गुरु का, बडे गुरु का, नागलो भाई नागलो असे ओरडत शाळकरी मुलांच्या मिरवणुकाच निघतात. संध्याकाळी नागकुंवा नामक जलाशयावर असलेल्या नागमूर्तीचे पूजन होते. जमलेले लोक नागकुव्याचे पाणी नागतीर्थ म्हणून प्राशन करतात. व्याकरणकार पतंजली हा शेषावतार होता. मरणोत्तर त्याने या विहिरीत वास्तव्य केले असे सांगितले जाते.

आज काश्मीरमधली परिस्थिती बिकट असली तरी या भागात पारंपरिकरित्या सर्पपूजा अस्तित्त्वात असल्याचे पुरावे मिळतात. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सर्पाकृती कोरलेल्या आढळतात.बंगाल आणि छोटा नागपूर या भागात या दिवशी सर्पराज्ञी मनसादेवीची पूजा करतात. तिची पूजा केली नाही, तर कुटुंबातील व्यक्ती सर्पदंशाने मरते अशी समजूत आहे. बिहारात हिनवर्ण स्त्रिया स्वतःला नागपत्नी समजून नागाची गीते गातात. ओडिसातले लोक अनंतदेव या नावाने नागपूजा करतात. आसाम मध्ये उथेलन नावाचा एक प्रचंड सर्प असल्याचे मानले जाते. तो नरबळी दिल्याशिवाय तृप्त होत नाही अशी तिथल्या आदिवासींची धारणा आहे. त्रिवांकुर, छत्तीसगड, विलासपूर याठिकाणी नागांची देवळेच आहेत.

दक्षिण भारतात अनेक समाजांमध्ये विवाहित स्त्रिया लग्नसमारंभात सर्पाची पूजा करतात. कर्नाटकात नागांच्या नैवेद्याला गूळ-पापडीचे लाडू करतात, त्यांना तंबीट म्हणतात. केरळमध्ये नायर आणि नंपूतिरी यांच्या घराभोवतीच्या परिसरात वायव्येच्या कोपऱ्यात सर्पकावू नावाचे एक ठिकाण असते. तिथे नागप्रतिमा ठेवून तिच्या भोवती झाडेझुडुपे वाढवतात. वर्षातून एकदा त्या नागदेवतेची मोठी पूजा करतात.

भारतात काही ठिकाणी नागांचे अवतार मानलेल्या वीर पुरुषांचीही पूजा केली जाते. पंजाबमधील गुगा, होशंगाबादमधील राजवा आणि सोरळ मध्य परदेशातील करूवा आणि राजस्थानमधील तेजाजी हे ते वीरपुरुष होत. राजस्थानात पीपा, तेजा इत्यादी पौराणिक नागराजाची पूजा प्रचलित आहे.  पंजाबमध्ये सफीदोन या नावाचे एक ठिकाण आहे. ते पंजाबातल्या सर्पपूजेचे केंद्र आहे. जनमेजयाने जे सर्पसत्र केले ते याच ठिकाणी अशी मान्यता आहे.

#नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!


वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....