नाशिकमध्ये १८८९ मध्ये ब्रिटिश राजवटीत ट्राम सेवा सुरू झाली. कोलकाता आणि मुंबईनंतर ट्राम मिळवणारे नाशिक हे भारतातील तिसरे शहर होते. नाशिक येथील ट्राम नॅरोगेज म्हणून बांधण्यात आल्या होत्या. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे ती इंजिनने चालविली जात नव्हती तर घोड्यांद्वारे चालविली जात होती. दोन केबिन चार घोडे ओढत असत. जवळपास २७ वर्षे नाशिकच्या मार्गांवर ते धावले आणि नंतर घोड्यांची जागा पेट्रोल इंजिनने घेतली.तब्बल ४४ वर्षे नाशिकच्या जनतेची सेवा केली. जिचा मार्ग मेनरोडवरील (जुनी महानगरपालिका) ते नाशिकरोड असा होता.
इसवी सन १८१८ मध्ये नाशिक ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली आले. तेव्हा नाशिक हे तीर्थक्षेत्र व धार्मिक ठिकाण म्हणूनच प्रसिद्ध होते. ब्रिटिशांनी नाशिकला शहराचा दर्जा देऊन इसवी सन १८६५ मध्ये नगरपालिकेची स्थापना केली. या दरम्यानच्या काळात मुंबई व ठाणे दरम्यान १८५३ला रेल्वेसेवा सुरु झाली होती. मुंबईपासून जवळ असलेल्या नाशिकजवळील देवळाली येथे इसवी सन १८६१ मध्ये ब्रिटिश लष्कराची छावणी उभारण्यात आली. लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वेमार्गाची आवश्यकता होती. त्यामुळे मुंबई व नाशिक मार्गावरील थळघाटात रेल्वेमार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. १८६५ मध्ये थळ घाट ( म्हणजे आताचा कसारा घाट) रेल्वे मार्ग पूर्ण झाला. याच वर्षी देवळाली मार्गे नाशिक येथेही रेल्वे स्टेशन सुरु करण्यात आले. मात्र हे रेल्वे स्टेशन झाल्यास परदेशी नागरिकांचा वावर नाशिकमध्ये वाढून ब्रिटिश आपल्या धार्मिक रूढी व परंपरा यात दखल देतील या भीतीने तत्कालीन धर्मपंडितांनी नाशिकला रेल्वे स्टेशन बांधण्यास विरोध केला. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन नाशिक शहरापासून १० किमी दूर शहराबाहेर उभारण्यात आले व या स्टेशनला नाशिकरोड हे नाव देण्यात आले. त्याकाळी नाशिक व नाशिकरोड दरम्यान घनदाट अरण्य होते. लूटमार व वन्य प्राण्यांची भीती यामुळे नाशिकहून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर जाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होते. त्यामुळे नाशिक ते नाशिकरोड या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीसाठी साधनांची आवश्यकता निर्माण झाली.
दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीतील ब्रिटिश अभियंता एव्हरार्ड रिचर्ड कॅलथ्रॉप याचा नॅरो गेज लोहमार्ग उभारण्यात हातखंडा होता. त्याने स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठी नॅरोगेज रेल्वेचा प्रभावी वापर करता येईल असा विचार केला व त्यानुसार नाशिक ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन जोडणारा ५ मैल लांबीचा नॅरोगेज ट्रामवे व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रेल्वे स्टेशन ते बार्शी गाव असा २१ मैल लांबीचा नॅरोगेज मार्ग असे दोन प्रकल्प कंपनींकडे सादर केले.
दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिली व कॅलथ्रॉप यांनी या मार्गांचे सर्वेक्षण हाती घेतले. इसवीसन १८८७ मध्ये त्यांनी लंडनला दि इंडियन रेल्वेस फीडर लाईन्स कंपनीची नोंदणी केली. १८८९मध्ये आरोग्याच्या कारणास्तव कॅलथ्रॉप यांनी दि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीतून सेवेचा राजीनामा दिला. मात्र नाशिक ट्रामच्या बांधणीच्या कामावर सल्लागार म्हणून देखरेख केली.
इसवी सन १८८९मध्ये नाशिक ट्रामच्या बांधणीस एक लाख रुपये खर्च आला होता. चार घोड्यांच्या साहाय्याने ओढली जाणारी दोन डब्यांची गाडी असे नाशिक ट्रामचे सुरुवातीचे स्वरूप होते. ही ट्राम गाडी मेनरोडवरील नाशिक पालिकेच्या इमारतीपासून निघून नाशिकरोड रेल्वे स्टेशन पर्यंत जात असे. नाशिक ट्रामचा प्रवास मार्ग मेन रोड - भद्रकाली - गंजमाळ - सध्याच्या फेम मल्टिप्लेक्सच्या मागून - नाशिकरोड रेल्वे स्टेशन असा ९-१० किमीचा होता. ब्रॅडी'ज या खाजगी कंपनीने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला होता. याच कंपनीने नंतर नासिक ट्रामवे कंपनी या नावाखाली भारतातील पहिली पेट्रोल इंजिनवर चालणारी ट्राम सुरु केली. दरम्यान सलग पडलेले दुष्काळ, प्लेग इ. रोगांच्या साथी यांमुळे झालेल्या प्रचंड तोट्यामुळे या ट्राम सेवेला घरघर लागली होती. अखेर सन १९३३ मध्ये नाशिक ट्राम कंपनीने बंद केली.
(छायाचित्रे आंतरजालाच्या मदतीने)
- अशोक दारके
No comments:
Post a Comment