गायत्रीमाता मंदिर, त्र्यंबकेश्वर
https://tinyurl.com/y75y4dc2
हे गायत्री मातेचे छोटेसे मंदिर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या पाठीमागे आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्रिस्तरीय आहे. सद्यस्थितीत या मंदिराचे शिखर अस्तित्वात नाही. त्यामुळे या मंदिराच्या भिंतीवर विटांच्या बांधकामाचे ठिगळ लावून वर पत्र्याचे आच्छादन केलेले आहे. गायत्री मातेच्या मूर्तीवर शेंदराचा भलामोठा थर असल्याने मूर्ती नक्की कशी दिसते ते सांगता येत नाही. मात्र सप्तशृंगी मंदिराप्रमाणे सदर मूर्तीचे शेंदूर कवच काढल्यास मूळ रूप प्रकाशात येऊ शकेल. मंदिराच्या सभामंडपाचा अंतर्भाग रंगवलेला असल्याने भिंतींवरील मुर्त्यांचे बरेचसे बारकावे ओळखता येत नाहीत. मंदिरातील सर्वच मूर्त्यांना शेंदुरकाम व रंगकाम केल्यामुळे या वारशाची ओळख हरवल्यासारखी वाटते.
सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे अवशेष पाहता हे मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिरापेक्षा पूर्वीचे अतिप्राचीन असल्याचे स्पष्टपणे दिसते. मंदिराचे शिखर भूमिज पद्धतीचे असावे असे मंदिराच्या मागील बाजूच्या अवशेषांवरून अंदाज बांधता येतो. मंदिराच्या शिल्पस्थापत्यावरून हे मंदिर किमान ९ - १०व्या शतकात निर्मिलेले असावे असे वाटते. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत हे मंदिर असल्याने संबंधित प्रशासनाने या प्राचीन वारशाचे संवर्धन करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment