आज अंगारकी चतुर्थी. चला दर्शन घेऊ नाशिकच्या प्राचीन गणपती स्थानांचे 🙏
https://tinyurl.com/2raf43t6
अनेक पुराणांनी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानलेली नाशिक नगरी ही सदैव भाविकांच्या श्रद्धेने ओथंबलेली असते. स्थान माहात्म्यात सर्वच देवतांचे वास्तव्य येथे असल्याचे सांगितले जाते. स्मार्तधर्मात अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणेशाची अनेक स्थाने येथे आहेत.
नाशिकच्या गणेशाशी असणारा ऐतिहासिक संदर्भ महानुभाव संप्रदायाच्या स्थानपोथीत आढळतो. चक्रधरस्वामी इसवी सन १२७८ दरम्यान तीर्थयात्रेच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकमध्ये आले होते. त्यावेळी नाशिकमधील पंचवटी, रामनाथ, आदित्य, महालक्ष्मी, गणेश, सोमनाथ, विनायक, कापालेश्वर, वारुणा-संगम, जळसेनाचा घाट, सुंदराचे देऊळ, पंचायतन, काळीकेचे देऊळ, साळातीर्थ येथे आल्याचा उल्लेख आहे. गणेश उपासनेचे महत्त्व पेशवेकाळात वाढीस लागले असे मानले जात असले तरी नाशिकमध्ये तेराव्या शतकापासून निश्चित गणेशाची स्थाने आहेत. येथे असलेल्या नवश्या गणपती, मोदकेश्वर, मदन मदोत्कट गणपती अशा विविध गणेशस्थानांमुळे या माहात्म्यात भरच पडली आहे.
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त या प्राचीन गणेशांचे दर्शन घेऊयात.
मोदकेश्वर :
शेकडो वर्षाची परंपरा असलेले सदर गणेश मंदिर गोदातीरी पूर्वाभिमुख वसलेले आहे. गणेशाचे नाशिकमधील हे स्थान प्राचीन असून अतिशय जागृत मानले जाते. ही मूर्ती स्वयंभू आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. जुन्या नाशिकमधील संत गाडगेबाबामहाराज धर्मशाळेच्या अलिकडे हे मंदिर स्थित आहे. मंदिर अतिशय साधे आहे. आजूबाजूच्या उत्खननात मोदकाच्या आकाराचे दगड सापडले म्हणून यास मोदकेश्वर मंदिर असे नाव पडले. गणेशाच्या बाजूला ऋध्दि-सिध्दी यांच्या मूर्ती आहेत. प्रसिध्द २१ गणेशांमध्ये सदर गणेशाची गणना होत असल्याने पूर्वी नाशिकचे ग्रामदैवत म्हणूनही या गणेशाकडे पाहिले जायचे. गणेश कोष, पंचवटी दर्शन यात्रा, गोदावरी माहात्म्य अशा विविध पुस्तकांमध्ये मोदकेश्वराचा उल्लेख आल्याने संपूर्ण भारतातून येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
या गणेश मदिरांच्या जीर्णोध्दार विलास क्षेमकल्याणी यांच्या पूर्वजांनी केला. तेव्हापासून आजतागायत क्षेमकल्याणी यांची नववी पिढी मंदिराचे कामकाज पाहत आहे. दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी भल्या पहाटे पासून गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.
मदनाने स्थापिलेले मदनमदोत्कट विनायक
श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली. त्यावेळी रतिसह मदनाने कठोर गणेशसाधना करून श्री गणेशाचा कृपाप्रसाद मिळविला. देवी रतीने प्रार्थना केल्यावर प्रसन्न झालेल्या गणेशांनी मदनाला अनंग स्वरूप प्रदान केले. अर्थात शरीर विरहित अवस्थेतच तो त्याची सर्व कामे करतो. पूर्ण रूपात तो रतीला सशरीर मिळेल असा आशीर्वाद मिळाल्यानंतर रती आणि मदन यांनी भगवान गणेशांची आराधना केली. हेच ते मदनाने आराधना केलेले 'कामवरद' महोत्कट क्षेत्र होय. हे स्थान आज नाशिक क्षेत्री गोदावरीच्या तीरावर मदनमहोत्कट रूपाने विद्यमान आहे. स्थानिक भाषेत त्याला हिंगण्यांचा गणपती असे म्हणतात.
नवश्या गणपती :
नाशिकपासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर आनंदवल्ली गाव आहे. या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गणेशाचे पेशवेकालीन मंदिर आहे. याला नवश्या गणपती असे म्हणतात. हे स्थान फारच रम्य आणि शांत स्थान आहे. राघोबादादा पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सन १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात या गणेशाची स्थापना केली. मंदिराजवळील त्यांच्या गढीवरुन गणेशाचे दर्शन घेता येत असे. या ठिकाणी मंदिराच्या सभागृहात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.अशा या आठ मूर्ती आणि गाभाऱ्यातील मूळ मूर्ती असे मिळून एकूण नऊ गणपती होतात म्हणून याला नवश्या गणपती हे नाव पडले असे म्हणतात. तर काही भक्तांच्या सांगण्यानुसार नवसाला पावतो म्हणून या गणपतीचे नाव नवश्या गणपती असे आहे. अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारा असा हा गजानन असून अवश्य भेट द्यावी असे रमणीय स्थान आहे.
No comments:
Post a Comment