श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्राकारातील ही चतुर्मुख महादेव मूर्ती व प्राचीन शिवलिंगम.
सध्या या मूर्तीची तीनच मुखे अस्तित्वात आहेत. पाठीमागील चौथे मुख नष्ट झालेले आहे.
ही मूर्ती खंडीत (भग्न) स्वरूपात असल्याने पुजली जात नाही. या मूर्तीसोबतच तीन प्राचीन शिवलिंगम ठेवलेली आहेत. या मूर्ती व लिंगे प्राचीन शिलाहारकालीन मूळ त्र्यंबकेश्वर मंदिरातील असावीत असा पुरातत्व संशोधकांचा अंदाज आहे.
चतुर्मुख महादेवाच्या प्रत्येक मुखाला वेगवेगळी नवे आहेत.
सद्यो वामं तथा घोर पुरुष च चतुर्थकम ।
पहिलं नाव सद्य, दुसरं वाम तिसरं नाव घोर तर चौथ नाव तत्पुरूष.
शिवपुराणात महादेवाला पाच मुख असल्याचे म्हटले आहे. सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशी या पाच मुखांची नावे आहेत. महादेव म्हणतात की ओंकार 'ॐ' ही त्यांची उत्पत्ती आहे. त्यांच्या उत्तर मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार, दक्षिण मुखातून मकार, पुर्व मुखातून बिंदु आणि मध्य मुखातून नाद प्रकट झाला. अशा पाच अवयवांपासून 'ॐ' ची निर्मिती झाली.
या मंदिराच्या आवारातील शिवलिंगे वेगळ्याच प्रकारची दिसतात. मात्र अशाप्रकारचे शिवलिंग हे निव्वळ भगवान शिवशंकराचे प्रतीक नसून यात ब्रह्मा, विष्णू व शिव या तीनही देवतांचा अंश असतो असे मानले जाते. शिवलिंगाचा सर्वात खालचा भाग चौकोनी असतो त्याला ब्रम्हभाग म्हणतात. मधला भाग अष्टकोनी असतो त्याला विष्णूचा अंश म्हणतात. सर्वात वरचा भाग वर्तुळाकार असतो ज्याला शंकराचा अंश म्हणतात. आणि हाच भाग आपणाला दिसतो बाकी दोन भाग पिठात व भूमीमध्ये असतात.
शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
'शं करोति इति शङ्करः । 'शम्' म्हणजे कल्याण आणि 'करोति' म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.
आपण श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो व बाहेर पडतो मात्र मंदिराच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या आपल्या समृद्ध प्राचीन परंपरेचे अवशेष असलेल्या भग्नावषेशांकडे आपले लक्ष जात नाही. हे अवशेष भाविकांच्या दुर्लक्षामुळे व ऊन, वर व पाऊस यांच्या भडिमारामुळे दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या अवशेषांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे हे संबंधितांच्या लक्षात येईल तो सुदिन...
No comments:
Post a Comment