'पंचमुखी' कपालेश्वर मुखवटा
नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर *कपालेश्वर मंदिर* वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही.
नाशिकचे कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. त्यानंतर विधीवत पूजा आणि श्रुंगार करून सवाद्य पालखी सोहळा संपन्न होत असतो. पालखीसोहळ्यात मिरवला जाणारा हा आगळावेगळा पंचमुखी मुखवटा अत्यंत तेजस्वी भासतो. शिवशंकराच्या पाच मुखांच्या जटामुकुटात गंगा विराजमान आहे. तिच्या शिरावर पंचमुखी नागराजांनी आपली छाया धरली आहे.
या मुखवट्याच्या निर्मितीची कथा मोठी अद्भुत आहे. नाशिकच्या जुन्या तांबट आळीत रहाणारे दादा उमाशंकर वैद्य हे निस्सीम शिवभक्त. कपालेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. एकदा त्यांना कपालेश्वराचा द्रुष्टांत झाला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर चरणी चांदीचा मुखवटा अर्पण करण्याचे ठरवले. ही गोष्ट १८९३ सालची. सोनार समाजातील तत्कालीन कसबी सुवर्णकार श्री रामचंद्र रावजी इंदोरकर यांच्याकडे हे काम सोपवण्यात आले. आपले सर्व कसब कारागीरी पणाला लावुन त्यांनी हा पंचमुखी शिवाचा मुखवटा घडवला. आणि त्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा तो कपालेश्वर पालखीत मिरवण्यात आला.
तेव्हापासून श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या या महापर्व कालात वैद्य कुटुंबाकडे असलेला मुखवटा भगवान कपालेश्वराच्या पालखीत मिरवला जातो. वंशपरंपरेने या पालखी सोहळ्याचा खर्च आणि परंपरा वैद्य कुटुंबाकडे राहील हेही तेव्हाच ठरवण्यात आले. वैद्य कुटुंबीयांनी दादा उमाशंकरांची ही परंपरा निष्ठेने पुढे चालु ठेवली आहे.
No comments:
Post a Comment