Saturday, 28 May 2022

सावरकर जन्म स्थान (सावरकर वाडा), भगूर

  


भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.  भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. 

सावरकर कुटुंबाच्या वडिलोपार्जित वाड्यात २८ मे १८८३ या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांच्या नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला दिले गेले.  

सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती. जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात विकून टाकला होता. लिलावात घेणार्‍याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले होते. केंद्र सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व खात्याकडे दिले.  २८ मे १९९८ रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तितके मुळ स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते.

बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो! 

वाड्यातील तळमजल्यावरील जन्मस्थानाचे जागेवर तशी एक पाटी व सावरकरांचा परिचित फोटो आहे. कंपाऊंडच्या भिंतीच्याआतील वाडा बर्‍यापैकी मोठा आहे. आत शिरल्यावर समोर अंगण आहे. उजव्याबाजूच्या कंपाऊंडलगत त्यांचा अर्धपुतळा आहे. समोरच्या पडवीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यांकडे जाता येते. आतील खोल्यांमध्ये सावरकर-कुटुंबियांचे आणि सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहेत. 

आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!

आतल्या खोलीला लागून लहानसे देवघर आहे. तेथे त्यांच्या घरी एकेकाळी असलेल्या अष्टभुजादेवीचा फोटो ठेवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली. 

देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.

सावरकरांनी चौदा/ पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्याची ते अखेरपर्यंत झटले. 

तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.

आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.

आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी. 

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  

https://youtu.be/-4bcYFUbbhY

https://youtu.be/-4bcYFUbbhY





















Monday, 23 May 2022

विस्मृतीत चाललेला अशोक स्तंभ, नाशिक

 *विस्मृतीत चाललेला अशोक स्तंभ, नाशिक*




नाशिकचा अशोक स्तंभ अजुनही आहे पण नाशिककरांनाच त्याचा विसर पडायला लागला आहे! तसा पत्ता सांगण्यासाठी, रिक्षा वाल्यांना सांगणे साठी त्याचा उपयोग होतो आहे.  


अशोक स्तंभ नेमका कधी बांधला होता, व त्यावरील पुर्वीच्या शिलालेखात काय लिहीले होते ते शोध करुनही सापडले नाही. वरील फोटोत असलेले शिलालेख हे स्तंभाचे स्थानांतरण करतांनाचे आहेत तेव्हा त्यात श्रेय नामावली वगैरेची रेलचेल! पुर्वी म.गांधीजींचे रेखा चित्र, त्यांचे सुविचाराचे खाली होते असे म्हणतात!   


आमच्या लहानपणी अशोक स्तंभ आग्रारोड च्या मध्यवर्ती ठिकाणी होता. दक्षिणेकडुन येणाऱ्या गाड्या त्यास वळसा घालुन नवीन तांबट गल्ली ओलांडून रविवार कांरज्या कडे जात असत. स्तंभा  भोवती असलेल्या पायऱ्यांवर बसुन गाड्यांकडे बघणे हा लहानपणीचा उद्योग तेथील पोलीसाचे सौजन्याने करीत असु. शिवाय गंगापुर रोड वरुन वकील वाडीत जातांना रोड क्राँस करणेसाठी स्तंभाचा मिळणारा आधार हा सुखद होता.


खरा नाशिककर "अशोकस्तंभ" न म्हणता केवळ "स्तंभ" असा उल्लेख करतो. १९९० च्या दरम्यान  रविवारी संध्याकाळी स्तंभावर लंडनच्या धर्तीवर उस्फूर्तपणे भाषण करणाऱ्यां साठी "हाईड पार्क" नांवाचे व्यासपीठ चालविले जाई असे अंधुकसे आठवते. अशोकस्तंभ मित्र मंडळाचा दर वर्षीचा गणपती नावीन्यपूर्ण असे व तो पाहण्यासाठी भरपूर गर्दी लोटत असे. फार पूर्वी स्तंभावर टांगा स्टॅन्ड व गुरांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद असल्याचेही आठवते. स्तंभाला लागूनच असलेल्या "सर्कल" चित्रपट गृहात सकाळी १०.०० वाजता जुने इंग्लिश पिक्चर दाखवले जात. कॉलेजला दांडी मारून विद्यार्थ्यांची या मॅटिनी शो ला उपस्थिती असे. सर्कल थिएटर बाहेरील वडापाव त्याकाळी फेमस होता,, त्या नंतर दोन वडे वाले अजून झाले,पण काळाच्या ओघात वडे त्याचे छोटे होत गेले,,,आपण पैसे वड्याचे देत आहोत आणि भजी इतका वडा खातो,,हे लोकांना कळेनासे झाले,,मग या गोष्टीचा अभ्यास करून मोरे बंधू यांनी जम्बो वडा पाव व त्याच बरोबर तीन चटण्या सुरू केल्या,,,व अल्पावधीत मोरे बंधू चा नाशिक वडा पाव हा नाशिककरांचा आवडता ब्रँड बनला.        


नाशकातील विविध मिरवणूका या अशोक स्तंभाला वळसा घालुनच जात असत! वळणावर नासिक ढोल, मिरवणूकीत असलेले विविध कलाकार स्तंभावर आपले कलाप्रदर्शन अति कौशल्याने व भरपुर वेळ करायचे! गणपतीच्या मिरवणुकीतले देखावे, यशवंत व्यायाम शाळा व गुलालवाडीची लेझीम पथके येथे विशिष्ट कलाकृती सादर करीत! राजकीय मिरवणूक हा वेगळा अनुभव आणि मुख्य नेता येथे आपली उपस्थिती दाखवून द्यायचे!   


हा मध्यवर्ती असलेला अशोक स्तंभ राष्ट्रीय भावना जागृत करत होता यात शंका नाही. स्तंभा जवळ अनेकवेळा ध्वज वंदना होत असे. आजुबाजुचे लोक, खाणीजवळच्या झोपड पट्टीतील व घनकर गल्ली वगैरे ठिकाणचे अनेक तेथे ध्वजवंदना द्यायचे! जवळच असलेले ढोल्या गणपती मंदिरात जाणे हा पण अनेकांचा नित्य क्रम!  अशोक स्तंभा विषयक जुने फोटो, माहीती असल्यास कळवणे.


शक्य झाले तर अजुनही अशोक स्तंभ बघा! नाहीतर कुणीच येत नाही हे बघुन अदृश्य व्हायचा!!


जाणून घ्या आदिशक्ती आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_24.html


(फॉरवर्ड)

Monday, 2 May 2022

अक्षय्य तृतीयाचे महत्व




अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.


भविष्यपुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, स्कंदपुराणात याचा विषेश उल्लेख केलेला आढळतो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णु साठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.



स्कंदपुराणातील अक्षय्य तृतीया :

जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात त्यांच्या या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो.


भविष्यपुराणातील अक्षय्य तृतीया : 

वैशाख शुक्ल पक्षातील तृतुयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणारा माणूस सगळ्या पापांतून मुक्त होतो असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे. जे काही दान केले जाते ते अक्षय होते. विशेषतः मोदक दिल्याने व गुळ आणि कापुराच्या सहाय्याने जलदान केल्याने विशेष पुण्या प्राप्त होते. अशा माणसांची ब्रम्हलोकात गणना होते.




का म्हणतात अक्षय्य तृतीया?

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं।

तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।


उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै:।

तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव।


पुराणानुसार, महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात,  ‘हे राजा या दिवशी केलेल्या दान व हवनाचा नाश होत नाही म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याला ‘अक्षय्य तृतीया’ असे संबोधले आहे. या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम अक्षय अविनाशी असते.’




विष्णुपुराणातील अक्षय्य तृतीया :

वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. या दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो.


या दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान अक्षय्य फलदायी असतो. एक वेळी आहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. या दिवशी केलेले दान देखील अक्षय्य होते असे भविष्यपुराणात आलेले आहे. या दिवशी पाण्याचे मडके, पंखे, पादत्राणे(चप्पल-बूट), छत्री, जवस, गहु, तांदूळ, वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी असते. परंतु दान हे सत्पात्री असावे.



हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.




महत्त्व : 


नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.

परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.


अक्षय्य तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या  दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख, समृद्धी नांदते.


असं म्हणतात की, अक्षय्य तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. 


अक्षय्य तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले. 


अक्षय्य तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्रय संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं. 


महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रोपदीला ‘अक्षय्य पात्र’ भेट दिले होते.  ज्याला ‘द्रौपदीची थाळी’ या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. 


या दिवशी भगवान गणेशाने आणि वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे.



जैन धर्माचे पहिले तीर्थांकर भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.


लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचाही जन्म अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच झाला होता. त्यामुळे या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. 


या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.



वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.


जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.

कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.


ज्योतिषशास्त्र

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. असे दुर्(योग) यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :-


शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.


अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.


सांस्कृतिक महत्त्व


महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.


आख्यायिका

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.


शेतीसंबंधी प्रथा :

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.


मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)

महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.


वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

धार्मिक आचार

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.


या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे



साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.


भारताच्या विविध प्रांतांत वा प्रदेशांत


उत्तर भारत - या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.


ओरिसा - या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.


दक्षिण भारत - महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.


पश्चिम बंगाल - या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.


राजस्थान - राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.


महाराष्ट्र - महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

अक्षय्य तृतीयेला केले जाणारे धार्मिक विधी :


अक्षय्य तृतीया हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण  आहे. या दिवशी सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात.


अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा आणि कडक उपवास केला जातो. 

गोर गरिबांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू दान केल्या जातात. 


घरात भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशी पत्राने पाणी या दिवशी घरात शिंपडल्याने सुख शांती नांदते अशी मान्यता आहे. 


धनधान्य मुबलक मिळावे यासाठी भारतात अक्षय्य तृतीयेपासून शेतीच्या कामांना सुरूवात केली जाते. 


व्यापारी त्याच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबाची पुस्तके अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करतात. या धार्मिक विधीला हलखता असं म्हटलं जातं. 


अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. सोने हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते यासाठी या दिवशी आपल्या ऐपतीनुसार थोडे तरी सोने खरेदी केले जाते. असं केल्याने घरातील ऐश्वर्यात वाढ होते असं मानलं जातं. यासाठीच अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिवशी अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी


अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आणि या दिवशी केलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात.या दिवशी लग्नाचा पवित्र विधी केला जातो. कारण त्यामुळे असे विवाह आयुष्यभर काळ टिकतात अशी मान्यता आहे. 


अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय, बांधकामे आणि नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते. 


अक्षय्य तृतीयेला गंगेत स्नान करणे, यज्ञयाग करणे, दान धर्म करणे शुभ मानले जाते. 


जैन बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येची सांगता उसाचा रस पिऊन करतात आणि शिवाय या दिवशी दिवसभर पूजा आराधना करतात. 


आध्यात्मिक प्रवासासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून योगसाधना करणे, ग्रंथाचे वाचन करणे, मंत्र जपास सुरूवात करणे  शुभ मानले जाते. 


भक्तगण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदनाचा लेप लावतात ज्यामुळे त्या भक्ताला मरणानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी मान्यता आहे. 


पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपार्शिवाद घेण्यासाठी अक्षय्य तृतीया शुभ मानली जाते. यासाठी पूर्वजांना या दिवशी त्यांच्या आवडीचे भोजन अर्पण केले जाते. 


काही ठिकाणी हा दिवस आखा तीज म्हणूनही साजरा केला जातो. तीज च्या दिवशी सुहासिनींना सिंदूर दान केल्याने विवाहित जोडप्यामध्ये प्रेम, विश्वास वाढतो असं मानलं जातं.   


हिंदु परंपरेप्रमाणे या दिवशी करावयाच्या गोष्टी  :

अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.

फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.

ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.

या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.

वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.

या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.

पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन तृषार्तास दान द्यावी.

पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ ब्राम्हणास खावयास द्यावी.


अक्षय सुखाचे दान देणारा हा दिवस सर्वत्र अतिशय भक्तिभावाने, पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही पहावयास मिळते. माहेरवाशिणी या दिवसांमधे माहेरी येत असल्याने त्यांचे कोडकौतुक देखील या सणाच्या निमीत्ताने केल्या जाते.


 अक्षय्य तृतीया पूजा विधी :


* अक्षय तृतीयेला अर्थात या व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त उठावे. पहाटे लवकरात लवकर बिछाना सोडावा.


* घराची सफाई व नित्य कर्म याहून निवृत्त होऊन पवित्र किंवा शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.


* घरात पवित्र स्थानावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.


* नंतर मंत्र म्हणत संकल्प घ्यावा-


ममाखिल पाप क्षय पूर्वक सकल शुभ फल प्राप्तये


भगवत्प्रीति कामनया देवत्रय पूजन महं करिष्ये। 


* संकल्प घेऊन प्रभू विष्णूंना पंचामृताने अंघोळ घालावी.

* षोडशोपचार विधीने प्रभू विष्णूंची पूजा करावी.


* प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पित करावी.


* नैवेद्यात जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करावी.


* विष्णू सहस्रनामाचा जप करावा.


* सर्वात शेवटी तुळशीचा जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी.


* या दिवशी उपास करावा.


* मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे.

या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. 


या दिवशी शुभ  संयोग आहे त्यामुळे  वर्षभर दान न  करणारे देखील या  तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. 


या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याच मटके

दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू,सातू, तांदूळ, मातीचे मडके,फळ दान करणे शुभ ठरेल. दान व्यतिरिक्त या

दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून 

या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे 

यात विश्वास ठेवतात. 


अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे

देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते.


म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे. दान-पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट 

कामाचे वाईट परिणाम मिळतात. 



वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिला खुप शुभ मानले गेले आहे. या दिवशी केलेल्या उपवास, दान

 आणि उपायाचे अक्षय म्हणजेच संपूर्ण फळ मिळते. यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. या वेळी 

अक्षय तृतीया 9 मे, सोमवारी आहे. मानले जाते की, या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय आणि पूजा केली 

तर घरात स्थाई रुपात धन-संपत्तीचा वास राहतो. या दिवशी अशा प्रकारे लक्ष्मीची पूजा करावी.


पूजन विधि

पूजा करण्यासाठी कपड्याच्या पवित्र आसनावर महालक्ष्मीची मूर्ति स्थापित करा. महालक्ष्मीच्या मूर्ति जवळ एका 

स्वच्छ भांड्यात केसर युक्त चंदनाने अष्टदल कमळ बनवून त्यावर पैसे आणि दागिणे ठेवा. आता याची पुजा 

करा. सर्वात अगोदर पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करुन स्वतःवर जल शिंपा, तसेच निम्न मंत्र वाचून पूजा-साहित्यावर जल शिंपावे.


ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।

य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।


यानंतर जल-अक्षत घेऊन पूजनाचा संकल्प घ्या.

संकल्प - आज वैशाख महिन्याचा शुक्ल पक्ष तृतीया तिथि, सोमवार आहे. मी या गोत्राचा आहे.(आपले गोत्र बोला) माझे 

नाव हे आहे. (आपले नाव बोला). मी श्रुति, स्मृति आणि पुराणांनुसार फळ प्राप्त करण्यासाठी आणि इच्छा 

पुर्ण करण्यासाठी मन, कर्म आणि वचन पापातून मुक्त, शुध्द होऊन लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी पूजा करण्याचा संकल्प घेत आहे.

असे म्हमून संकल्पाचे जल सोडा. आता डाव्या हातात तांदूळ घेऊन खालील मंत्र वाचून डाव्या हाताने ते तांदूळ लक्ष्मीच्या 

प्रतिमेवर सोडा.


ऊं मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञ समिमं दधातु। विश्वे देवास इह मादयन्तामोम्प्रतिष्ठ।।


ऊं अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।

अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन।।

आता या मंत्रांव्दारे भगवती महालक्ष्मीचे षोडशोपचार पूजन करा.

ओम महालक्ष्म्यै नमः - या मंत्राचा उच्चार करुनसुध्दा पूजा केली जाऊ शकते.

प्रार्थना - विधिपूर्व श्रीमहालक्ष्मीचे पूजन केल्यानंतर हाथ जोडून प्रार्थना करा.

सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकै-

र्युक्तं सदा यक्तव पादपकंजम्।

परावरं पातु वरं सुमंगल

नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ऊं महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।


प्रार्थना करत नमस्कार करा.

समर्पण - पूजेच्या शेवटी कृतोनानेन पूजनेन भगवती महालक्ष्मीदेवी प्रीयताम्, न मम।

हे बोलून समस्त पूजन कर्म भगवती महालक्ष्मीला समर्पित करा. तसेच जल सोडून महालक्ष्मीला घरात निवास करण्याची 

प्रार्थना करा.


Sunday, 1 May 2022

महाराष्ट्र दिनाची कहाणी

महाराष्ट्र दिनाची कहाणी 

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली...!!!
"वीर बलिदानी हुतात्म्यांस शतशत वंदन"...!!!

।।जय जय जय महाराष्ट्र माझा।।

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....