हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात
हनुमंताला महादेवांचा 11वा रूद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभु श्री रामाचे उत्कट भक्त आहेत.
हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे. हनुमानाचे वडिल वानरराज केसरी हे होते. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. जन्मानंतर लगेचच भूक लागल्यामुळे उगवणाऱ्या सुर्याला नारंगी रंगाचे फळ समजून त्याला खाण्याकरता हनुमानाने सुर्याकडे उड्डाण केले. त्यामुळे इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले.
इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मूर्च्छित झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्च्छिततेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत झाले व वातावरण सुरळीत केले. तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या.
हनुमानाला मारूती, बजरंगबली, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते.
हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल मात्र अनेक वादविवाद आहेत. त्यांचे जन्मस्थान असलेला अंजनेरी पर्वत नेमका कुठे आहे याबद्दल विविध ठिकाणी दावे केले जातात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमानाच्या विविध जन्म स्थळांबद्दल ठिकाणाहून इथेच हनुमानाचा जन्म झाला असे दावे केले जातात. या सर्व ठिकाणी तशी स्थळेही दाखविली जातात. तर आता जाणून घेऊयात, हनुमानाचा जन्म कुठे झाला व हि विविध स्थाने कोणती आहेत.
महाराष्ट्रात जर हा प्रश्न विचाराल तर बहुतेक करून त्र्यंबकेश्वरजवळ जो अंजनेरी पर्वत आहे, ते स्थान लोकं सांगतील पण उरलेली स्थानंही भारतातली लोकं ठामपणे सांगतात.
ही सर्व स्थानं, तिथेच जन्म झाला म्हणत जन्माची आणि एकंदर गोष्ट, त्या सर्वही स्थानी मंदीर आणि एखाद्या देवाच्या जन्म स्थानी जे वातावरण असतं, ते सगळं सगळं या सर्वच ठिकाणी आहे.
आता ही अशी परिस्थिती का निर्माण व्हावी हे माहीत नाही पण सांगितली जाणारी हनुमानाची जन्म स्थानं ही अशी...
१) अंजनेय पर्वत, हंपी, कर्नाटक. ऋष्यमुक पर्वताच्या जवळच ही जागा आहे आणि तिथे हनुमान जन्माचं स्थानही दाखवतात..
Anjeyadri hill, near Hampi
२) त्र्यंबकेश्वर, नाशिकजवळ जो अंजनेरी पर्वत आहे तिथेही अगदी दुर्गम स्थानी छोट्या गुहेतही हे स्थान दाखवले जाते.
Anjaneri, Nashik, Maharashtra.
३) अंजनाद्री शिखर, सप्तगिरी, तिरुमला आंध्रप्रदेश. तिरुमलाच्या तिरुपती बालाजी देवस्थान असलेल्या सात टेकड्या शेषाद्री, निलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि वेंकटाद्री म्हणून ओळखल्या जातात. या डोंगररांगेतील अंजनाद्री या टेकडीवरच हनुमानाचा जन्म झाला असे मानतात. तिथे हनुमान जन्माचं स्थानही दाखवतात. हे ठिकाण हनुमान जन्म स्थळ म्हणून विकसित करण्यास तिरूपती देवस्थानम बोर्डाने सुरुवातही केली आहे.
Anjandri Hill, Tirumala, Andhra pradesh
४) कर्नाटच्या शिवमोगा जिल्ह्यातील गोकर्ण येथेच हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जातो. गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी तर हंपीजवळचं अंजेयानाद्री कर्मभूमी असे मानणारेही अनेक भाविक आहेत.
Gokarn, District Shivamoga, Karnataka
5) झारखंड राज्याच्या गुमलापासून जवळ, अंजन नावाचं एक गाव आहे, तिथेही हनुमान जन्मस्थळी आहे.
Anjan gram in Jharkhand
6) राजस्थानातल्या चुरु जिल्ह्यात सुजनगडजवळ लक्षका नावाच्या डोंगराच्या निकट अंजन धाम हे ही हनुमानाचं जन्मस्थान म्हटलं जातं.
Anjan dham, Churu, Rajasthan.
7) हरयाणा मध्ये कैथल या शहरालगत असणा-या पर्वतावरील गुंफेत हनुमानाचा जन्म झाला असेही मानतात.
Kaithal, Haryana.
8) गुजरात मध्ये डांग जिल्ह्यात नवसारीजवळ जंगलातील एका गुहेत हनुमानाचे जन्म स्थान दाखवले जाते.
Dang, Gujrat.
हनुमान हा एकच अवतारी देव असा असेल की त्याची ही अशी एवढी जन्माची ठिकाणं सांगितली जातात. प्रत्येक ठिकाणी इथेच हा रुद्रावतार अवतरला म्हणत भक्त प्रत्येक ठिकाणी मनोभावे भक्तीत लीन होतात..
ही सर्व ठिकाणे वेगवेगळी असली तरी सर्व भक्तांची भक्ती मात्र हनुमंतरायाच्या चरणी दृढ आहे.
हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते.
हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.
वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हटले जाते.