रमेश देव म्हणजे चैतन्य, उत्साहाचा खळखळता झरा.... एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांचे वयाच्या ९३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रमेश देव यांचा जन्म अमरावती झाला, परंतु त्यांचे घराणे राजस्थानमधील जोधपूरचे होते. रमेश देव यांचं मूळ आडनाव खरंतर ठाकूर होतं. रमेश देव यांचे पणजोबा, आजोबा अभियंता होते. त्यांच्या पणजोबा व आजोबांची जोधपूर येथील प्रसिद्ध असा 'जोधपूर पॅलेस' हा राजवाडा बांधण्यामध्ये महत्वाची भूमिका होती असे सांगितले जाते. कोल्हापूर शहरातील काही इमारतींच्या उभारणीसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून त्यांचे आजोबा कोल्हापूरला आले व तेथेच नंतर स्थायिक झाले. त्यांचे वडील कोल्हापुरात त्याकाळातील एक प्रसिद्ध फौजदारी वकील होते. एकदा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना एका कामात अमूल्य मदत केली. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, ‘ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात बघा. तुम्ही आता ठाकूर नाही आजपासून तुम्ही देवच.’
तेव्हापासून ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना 'देव' या आडनावानेच संबोधू लागले होते.
देव यांनी करवीर नगरीला (कोल्हापूर) आपली कर्मभूमी मानले होते. तेथील भक्ती सेवा विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. रमेश देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट केले आणि सुमारे १९० मराठी चित्रपटांमध्ये ते दिसले. अभिनयाची आवड असलेल्या रमेश यांनी सुमारे ३० मराठी नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी अनेक फिचर फिल्म्स, दूरदर्शन मालिका आणि जाहिरात चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
या महान कलावंताला मनःपूर्वक श्रद्धांजली!!!
No comments:
Post a Comment