यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे यंदा भाविकांनी महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मंदिरात जाऊन पूजाविधी आणि नामस्मरण करता येणार आहे.
भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात.
प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
महाशिवरात्री कथा :
समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.
यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.
या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते
एकदा ब्रह्मा आणि विष्णू दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतता निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या अग्निलिंगाच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा प्रयत्न निष्फल ठरला त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या अग्निलिंगसमोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ऊॅं असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, अग्निलिंगच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर अग्निलिंगच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.
महाशिवरात्री ची पुराणकथा –
ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन ‘कालकूट’ नावाचे हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.
उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी . . .
महाशिवरात्रि व्रत कथा :
प्राचीन काळी एका जंगलात गुरुद्रुह नावाचा एक शिकारी राहत होता जो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, शोध घेऊनही त्याला शिकार सापडली नाही, त्याची मुले, पत्नी आणि आई-वडील उपाशी राहतील, सूर्यास्ताच्या वेळी त्याला काळजी वाटू लागली. तो एका जलाशयाजवळ गेला आणि एका झाडावर पाणी प्यायला घेऊन चढला, कारण त्याला आशा होती की इथे कोणीतरी प्राणी आपली तहान भागवायला येईल.ते झाड ‘बेल’चं होतं. आणि त्याच झाडाखाली शिवलिंग होते व ते बेलाच्या पानांनी झाकून गेले होते. त्यामुळे दिसत नव्हते.
रात्रीचे पहिले प्रहर संपण्यापूर्वी तेथे एक हरिणी पाणी प्यायला आली. तिला पाहताच शिका-याने तिच्यावर बाण सोडला, असे करताना त्याच्या हाताने बेलाची काही पाने आणि पाण्याचे काही थेंब उडाले व खाली असलेल्या शिवलिंगावर पडले आणि अनवधानाने शिका-याच्या हातून पहिल्या प्रहराची पूजा झाली. पानांचा सळसळाट ऐकून हरणाने घाबरून वर पाहिले आणि शिका-याला थरथरत्या स्वरात म्हटले ‘मला मारू नकोस. .’ शिकारी म्हणाला की तो आणि त्याचे कुटुंब भुकेले आहे म्हणून तो तिला सोडू शकत नाही. हरिणीने वचन दिले की ती आपल्या मुलांना तिच्या मालकाच्या स्वाधीन करून परत येईल. मग तो त्याची शिकार करतो. शिका-याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तिने पुन्हा शिकारीला असे सांगून पटवून दिले की ती देखील सत्य बोलत आहे. त्यामुळे क्रूर असलेल्या शिका-याला दया आली आणि ‘लवकर परत ये’ असे म्हणत हरिणीला त्याने जाऊ दिले.
थोड्या वेळाने दुसरे हरीण पाणी प्यायला तेथे आले, शिकारी सावध झाला, त्याने बाण सोडण्यास सुरुवात केली आणि असे करत असताना पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्या हाताच्या हालचालीने थोडे पाणी आणि काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली. शिका-याकडून दुसर्या प्रहराचीही पूजा झाली. हे हरणही घाबरले, शिका-याकडे जीवाची भीक मागितली. पुन्हा एकदा शिका-याने दया येऊन त्याला जाऊ दिले.
काही वेळाने तिसरी हरिणी आलि व पुन्हा एकदा आधीच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन तिलाहि
शिका-याने जाऊ दिले. मात्र बराच वेळ गेला तरी एकही हरिण परत न आल्यामुळे तो चिंतेत पडला व त्याला आपल्या कुटूंबाचि चिंता सतावू लागली.
काही वेळाने त्याला एक नर मृग येताना दिसला. शिका-याने नेम धरताच त्या मृगाने शिका-याची विनवणी केली व त्याला सांगितले की, यापूर्वी ज्या तीन हरिणी गेल्या आहेत, त्या त्याच्याच पत्नी आहेत व तू मला त्यांचाकडे जाऊ दिले तर मी वचन देतो की त्यांना व माझ्या मुलांना भेटून परत येतो मग तू सावकाश माझा बळी घे. शेवटी शिका-याला दया आली व त्याने त्यालाही जाऊ दिले.
रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू झाल्यानंतर काही काळाने शिका-याने पाहिले की तो नरमृग व त्याच्या तीनही हरिणी आपल्या मुलांसह एकत्र त्याच्याकडे येत आहेत. त्यांना पाहताच त्याने आपल्या धनुष्यावर बाण ठेवला आणि पूर्वीप्रमाणेच आपल्या चौथ्या प्रहराची शिवाची पूजाही पूर्ण झाली. आता त्या शिका-याची शिवाच्या कृपेने सर्व पापे भस्मसात झाली, म्हणून तो विचार करू लागला – ‘धन्य आहेत हे प्राणी जे अज्ञानी असूनही आपल्या देहाचे दान करू इच्छितात, पण मी मात्र या पापकृत्याने माझे व माझ्या कुटूंबाचे पोट भरत आहे.' त्याने आपले धनुष्य बाणा फेकून दिले हरणांना सांगितले की ते सर्व धन्य आहेत आणि त्यांना परत जाऊ दिले.
हे सर्व पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवले आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान कृपा आशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला.
हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व शिकाऱ्याला व्याध नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता .
महाशिवरात्री कशी साजरी केली जाते?
महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर यांचा नामजप करतात.
महाशिवरात्री पूजाविधी :
महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे.
शिवरात्रीचा अर्थ काय?
शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र.या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते.
शिवरात्रीच्या पूजेत काय अर्पण केले जाते?
शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध इत्यादींचा अभिषेक केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलची पाने, आणि धतुरा अर्पण केला जातो.
महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.