सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराचे इसवी सन १८८० मध्ये ब्रिटिश फोटोग्राफर हेन्री कुझेन याने काढलेले छायाचित्र
Monday, 29 November 2021
Saturday, 27 November 2021
त्रिंगलवाडी किल्ल्याचा रक्षणकर्ता असलेला मारुतीराया...
Friday, 26 November 2021
संविधान दिन
संविधान दिन
२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सध्या राज्यघटनेत ४४८कलमे (३९A, ५१A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
Thursday, 25 November 2021
गुरुपुष्यामृत योग
आज या वर्षातला अखेरचा गुरुपुष्यामृत योग
ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे. एकंदरीत २७ नक्षत्र आहेत. म्हणजे दररोज एक नक्षत्र याप्रमाणे साधारणपणे २७ दिवसांनी पुष्य नक्षत्र येते. पुष्य ज्या वारी येते ते नाव असते जसे रवी पुष्य. जर पुष्य नक्षत्र गुरुवारी आले तर त्यास म्हणून ओळखले जाते. या योगास विशेष फलदायी मानले जाते. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे व देवता बृहस्पति ( गुरू ) आहे.
पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.
गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. शास्त्रानुसार ह्या योगावर खरेदी केलेले धन, वाहन, वस्तू ह्या वर्धिष्णू असतात. म्हणून ह्या योगावर सोने, चांदी, वाहन, गृह ह्याची खरेदी करतात. ह्या योगावर केलेलं जप ध्यान दान पुण्य विशेष फलदायी असते. म्हणून ह्या दिवशी आपल्या नित्य पाठातील मंत्राचा जप करावा.
आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.
आयुर्वेदानुसार ह्या दिवशी बालकांना सिद्ध सुवर्णप्राश देतात . ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुले सुदृढ होतात.
Tuesday, 23 November 2021
नाशिकचा नवश्या गणपती
आज अंगारकी चतुर्थी निमित्त नाशिक मधील नवश्या गणपतीचे दर्शन.
नाशिकमधील नवशा गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. हा गणपती नवसाला पावतो, अशी ख्याती आहे. गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशमूर्ती आहे. या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे.
सन १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिकजवळील आनंदवली हे आजोळ होते. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. राघोबादादांनी आनंदवलीस मोठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यास नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली.
सन १९८८ मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरातील नागरिकांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. गोदातीरी असलेल्या मंदिरास वारंवार पुराचा तडाखा बसत असल्याने या मंदिराचा जीर्णोध्दार करणे अपरिहार्य होते. सन १९९० च्या कालखंडात संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरात अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीस या मंदिरात अतिशय गर्दी असते. नावाप्रमाणेच हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Thursday, 18 November 2021
श्री कार्तिकस्वामी दर्शन
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्र योगावर कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. वर्षातील या एकाच दिवशी पर्वणी काळात स्त्रियांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते. श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक"ही मानले गेले आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे “धनसंपत्तीकारक” ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो.
विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे. दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले “प्रज्ञाविवर्धनस्तोत्रा”चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करुन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. (विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खुप शुभ असते)
या शुभ पर्वणीनिमित्त आपणा सर्वांसाठी सादर आहे पंचवटी, नाशिक येथील मंदिरातील श्री कार्तिकस्वामींचे दर्शन...
Wednesday, 17 November 2021
गोरक्षनाथ महाराजांचा प्रकटदिन
आज 'कार्तिक शुक्ल त्रयोदशी' म्हणजे शिवचैतन्य महायोगी गोरक्षनाथ महाराजांचा प्रकटदिन.
महायोगी श्रीगोरक्षनाथ यांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात. गोरक्षनाथांचा उल्लेख सर्व भारतभर आढळतो. यामध्ये अठरापगड जाती व पंथ त्यास मान्यता देतात हे विशेष होय. नाथ संप्रदायास वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे श्रेय गोरक्षनाथांकडे आहे. ‘गोरक्ष शतक’ या त्यांच्या ग्रंथामुळे नाथ पंथास चिरस्थायी पाया मिळाला. नाथतत्त्वाच्या ज्ञान व शैवभक्तीचा प्रचार त्यांनी काठमांडू ते कन्याकुमारी आणि काबूल ते कोलकाता असा समर्थपणे केला. भारतात भ्रमंती करून त्यांनी असंख्य लोकांना नाथ तत्त्वाचा उपदेश केला आणि अगणित शिष्य निर्माण केले. त्यांचे शिष्य अठरापगड जातीत व भारताच्या कानाकोपऱ्यांत पसरले. काही शिष्यांनी मठांची स्थापना करत जनसामान्यांपर्यंत नाथतत्त्व पोहोचेल अशी व्यवस्था केली. आद्य शंकराचार्यानंतर अद्वैत भूमिकेच्या पातळीवर जनजागरण करणारा एवढा मोठा पुरुष म्हणून ते ख्यात आहेत.
पूर्वीच्या काळात त्र्यंबकेश्वरचा गोरक्षनाथ मठ म्हणजे नाथ संप्रदायाचे देशातील अतिशय महत्त्वपूर्ण केंद्र होते. दर्शनीसिद्ध नाथ तयार होईर्प्यत शिक्षण देण्याचे कार्य या ठिकाणी होत असे. एकदा शिक्षण पूर्ण झाले की, दर्शनी नाथ मठातून भ्रमंतीला बाहेर पडत. नाथ संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराची धुरा त्यांच्यावर होती.
त्र्यंबकेश्वर येथे योगीराज गोरक्षनाथ यांनी पेटवलेली धुनी आजही प्रज्वलित आहे. पुराण कथेनुसार भगवान परशुरामास आपल्या हातून पाप झाल्याने त्यांना शांताता लाभत नव्हती. शांतता मिळविण्यासाठी ते त्र्यंबकेश्वर येथे आले. गुरू गोरक्षनाथानांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांनी हाती पात्र देवता घेऊन ते कर्नाटक मंगलोर येथे गेले होते. तेथे त्यांना पाहून समुद्रमागे सरकला व त्यांना शांतता लाभली. नाथपंथात आजही सिंहस्थात त्या प्रमाने पात्र देवतेची स्थापन करून राजाची निवड होते. पात्रदेवता घेऊन ठिकठिकाणी मुक्काम करीत मंगलोर कर्नाटक येथे कदली मठापर्यंत प्रवास होत असतो. येथे आजही मंजुनाथाचे मंदिर आहे व गोरक्षनाथांनी प्रज्वलित केलेली ज्योत आहे.
ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वाराजवळ गुरु गोरक्षनाथ यांनी तपश्चर्या केलेली गुंफा आहे. #ब्रह्मगिरी पर्वतावर कौलगिरी नामक भागात अनुपम शिळा आहे. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. या अनुपम शिळेला बोलीभाषेत #अनुपान शिळा असेही संबोधन आहे.
गुरु गोरक्षनाथ प्रकटदिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.
Tuesday, 16 November 2021
तुळशी विवाह
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण अशी संत बहीणाबाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.
तुळशी विवाहाचा पूर्वापार चालत आलेला संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी व घरच्या घरी स्वतःच करण्यासाठी हे मोबाईल ॲप वापरा. त्याशिवाय इतरही व्रतवैकल्ये, सणावारांच्या संपूर्ण पुजाविधी, विविध देवीदेवता व संतमहात्म्यांच्या आरत्या, गणपती अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली व स्तोत्रे अशी सविस्तर माहिती या मोबाईल ॲपमध्ये देण्यात आली आहे.
प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये कायम स्वरूपी असायलाच हवे असे ॲप.
आजच हे ॲप खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.aarti
तुळशी विवाह पूजोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...
-
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) 'भद्रं करोति इति भद्रकाली | ' भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी ...
-
आज #गोदावरी #जन्मोत्सव... गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. #भगवान ...