अशोका धबधबा, विहीगाव
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपोआपच विहीगांवच्या आशोका धबधब्याकडे ओढली जातात. मुंबई, ठाणे आणि नाशिकपासून अतिशय कमी अंतरावर कसारा घाटातील विहिगाव (तालुका -शहापूर) येथे अशोका धबधबा हे पावसाळी पर्यटनासाठी बेस्ट लोकेशन आहे. वन डे पिकनिकसाठी तीनही जिल्ह्यातून अनेक लोक इथे येतात. सर्वत्र दाट वनराई आणि त्यात डोंगराच्या अगदी पायथ्याला अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हा अशोका धबधबा निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतो.
कसारा घाटातील हिरवी वळणे चढतांना कसा-यापासून १५ किमीवर विहीगांव फाटकात दादर नावाचा तिठा लागतो. या तिठय़ावरून उतरून पुढे गावातून पायी अशोका या धबधब्यावर पोहोचता येते. चालतांना वाटेत विस्तीर्ण हिरवीगार शेती लागते. समोरील दाट धुक्याच्या दुलईतले डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याखालील विसावलेले ओलाचिंब गांव पाहताना एखाद्या निसर्ग चित्रासारखेच भासते. पुढे सरळ पश्चिमेस गेल्यावर गावात बांधण्यात आलेला मोठा बंधारा पहावयास मिळतो या बंधा-याजवळ हे सारे जलप्रवाह एकत्र येऊन पुढे तो प्रवाह मोठा होऊन जवळील खोल दरीत कोसळतो. वाटेत येणाऱ्या दगडावरून हे पाणी आदळून होणारा पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह मंत्रमुग्ध करतो. हा प्रवाह सुमारे ३० फूट उंचीवरून धबधब्याचे रुप घेऊन कोसळतो.
२००१ साली प्रदर्शित झालेल्या अशोका या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान व करिना कपूर यांच्या एका गीताचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील पंचमढीच्या ‘अप्सरा विहार’ नावाच्या धबधब्याभोवती झाले. या धबधब्याचे रुप विहीगावच्या धबधब्याशी मिळते जुळते आहे. अशोका चित्रपटातील ‘सन सना ना..’ या गीतामधील ‘अप्सरा विहार’ हा धबधबा हुबेहूब अशोका’ धबधब्यासारखा दिसतो. कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाईचा हा परिसर एकसारखाच भासतो. त्यामुळे तेव्हापासून हा धबधबा ‘अशोका धबधबा’ नावाने ओळखला जाऊ लागला.
या धबधब्यातील फेसाळलेला हा प्रवाह पाहण्यासाठी, डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटकांचा येथे मोठा कुंभमेळाच भरलेला पहावयास मिळतो. या धबधब्याला इको टुरिझमचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय योजण्यात आले आहेत. संरक्षक जाळया, सिमेंटचा प्लॅटफार्म, प्रथमोचार कक्ष, चेजिंग रूम, प्रसाधन गृहांची सुविधा आदी उपलब्ध केल्याने हा धबधबा आता सुरक्षित झाला असल्याने अनेक पर्यटक कुटूंब, काफिल्यासह इथे वर्षा सहलीचा आंनद लुटण्यासाठी येतांना दिसतात.
या धबधब्याजवळून खोल दरीत जाण्यासाठी मार्ग आहे. सध्या या ठिकाणी वनविभागाने उतरण्यासाठी पाय-यांची सुविधा केल्याने आता या ठिकाणी लहानथोरांनाही अगदी विनासायास पोहोचता येते. जवळच विहिगाव असल्याने या ठिकाणी जेवणाची आर्डर देता येते. शाकाहारी व मांसाहारी जेवणारी सुविधा उपलब्ध होते. विहिगाव संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्यही या ठिकाणी सुटीच्या दिवशी उपस्थित असतात तर वनविभागाने या ठिकाणी एक कर्मचारीही तैनात केला आहे.
या ठिकाणी साहसी पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते, यात धबधब्याचे ट्रेकिंगचा समावेश आहे. वरून पडणाऱ्या शुभ्र धबधब्याचे पाणी आणि खालून दोनशे फुटावर दोराच्या सहाय्याने चढणारे रॅपलर्स हा थरारदेखील पाहण्यासारखा असतो. तसेच याच धबधब्यावरून समोर असलेल्या महाकाय झाडाला खालीवर असे दोन रोप बांधून त्यावर चालून हा धबधबा क्रॉस करणे असे साहसी खेळ मुंबईतील काही संस्था ऑनलाइन नोंदणी करून पर्यटकांना अनुभवता येतात.
असा हा मनमोहक 'अशोका' धबधबा नक्कीच पाहण्यासारखा आहे. मग कधी येताय?
#अशोका #धबधबा #पावसाळीपर्यटन #पाऊस #नाशिक #मुंबई #कसारा #Kasara #ashoka #waterfall #nashik #mumbai #naturelover #rainyseason #rain #adventure_tourism #rappelling #tourist #tourism #nature
https://youtu.be/lTq_CMFh0Ew
No comments:
Post a Comment