नाशिकमधील गणेशाची प्राचीन स्थाने
धार्मिक पातळीवर नाशिक क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. तेथे असलेल्या मोदकेश्वर, महोत्कट गणपती, तिळा गणपती, लोथेचा गणेश, नवश्या गणेश अशा विविध गणेशस्थानांमुळे या माहात्म्यात भरच पडली आहे.
पुराणांनी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानलेली नाशिक नगरी ही सदैव भाविकांच्या श्रद्धेने ओथंबलेली असते. स्थान माहात्म्यात सर्वच देवतांचे वास्तव्य येथे असल्याचे सांगितले जाते. स्मार्तधर्मात अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणेशाची अनेक स्थाने येथे आहेत. कलियुगातील स्वैराचार पाहून धर्माच्या रक्षणासाठी पार्वतीने नाशिकक्षेत्री गणेशाला पाठवले असे पुराणात सांगितले आहे. नाशिकच्या गणेशाशी असणारा ऐतिहासिक संदर्भ महानुभाव संप्रदायाच्या स्थानपोथीत आढळतो. चक्रधरस्वामी इसवी सन १२७८ दरम्यान तीर्थयात्रेच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकमध्ये आले होते. त्यावेळी नाशिकमधील पंचवटी, रामनाथ, आदित्य, महालक्ष्मी, गणेश, सोमनाथ, विनायक, कापालेश्वर, वारुणा-संगम, जळसेनाचा घाट, सुंदराचे देऊळ, पंचायतन, काळीकेचे देऊळ, साळातीर्थ येथे आल्याचा उल्लेख आहे. गणेश उपासनेचे महत्त्व पेशवेकाळात वाढीस लागले असे मानले जात असले तरी नाशिकमध्ये तेराव्या शतकापासून निश्चित गणेशाची स्थाने आहेत. नाशिकमधील मोदकेश्वर, महोत्कट गणेश, तिळा गणपती, लोथेंचा गणेश आणि नवशा इ. गणपती प्राचीन मानले जातात.
मोदकेश्वर नाशिक-
नाशिकच्या ग्रामदैवताचा मान मोदकेश्वरास दिला जातो. गणेशकोश, पंचवटी-यात्रा दर्शन, गोदावरी माहात्म्य यात मोदकेश्वराचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती क्षेत्रांत मोदकेश्वराची गणना होते. गोदावरीच्या पश्चिम तीरावर, नाव दरवाजाजवळ हे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. मोदकेश्वर या नावामागे रोचक आख्यायिका सांगितली जाते. गणेश आकाशमार्गाने भ्रमण करत असताना त्याच्या हातातील एक मोदक खाली पडला त्यापासून गणेशरूप साकार झाले, त्याचा दृष्टांत येथील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झाला. त्यानुसार त्यांनी या मंदिराची उभारणी केली. चार खांब असलेल्या गाभाऱ्यात शेंदूर विलेपित मोदकेश्वर विराजमान आहे. मागील बाजूस रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मोदकेश्वराच्या शेजारीच विश्व्ोश्वर महादेव आहे. पिता-पुत्रांचे इतके निकट सान्निध्य असणे हे या मंदिराचे वैशिष्टय़, याबरोबरच कोनाडय़ात विष्णू, गजलक्ष्मी, हनुमानासह राम-लक्ष्मण-सीता, विठोबा यांच्या छोटय़ा छोटय़ा मूर्ती आहेत. प्रात:काळी सूर्यकिरण मोदकेश्वरावर येतात त्यावेळची शोभा अवर्णनीय असते. दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, भाद्रपद आणि माघातील उत्सवाच्या वेळी विविध अलंकारांनी मोदकेश्वराचे रूप सजवले जाते. मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. त्या काळात विशेष महापूजेचे आयोजन केले जाते. गोदेच्या स्नानाने शरीरशुद्धी होते तर मोदकेश्वराच्या दर्शनाने चित्तशुद्धी होते अशी गणेशभक्तांची धारणा आहे.
महोत्कट गणपती -
मोदकेश्वराच्या मागील गल्लीतच महोत्कट गणेशाचे स्थान आहे. शंकराच्या शापामुळे उद्विग्न झालेल्या मदनाने उ:शापासाठी गणेशाची कठोर उपासना सुरू केली तेव्हा रतीने जिथे मोदकांची बठक करून त्यावर गणेशाची स्थापना केली, तो महोत्कट गणेश, असे वर्णन गणेशपुराणातील उपासना खंडात आले आहे. तसा महोत्कट गणेश नाशिकमध्ये िहगणेंच्या वाडय़ात आहे. पेशव्यांचे उपाध्याय असणाऱ्या िहगणे घराण्याचे हे खासगी देवस्थान. िहगणेंच्या वाडय़ात असणारे सध्याचे देवस्थान पूर्वी वाडय़ाच्या बाहेर होते. तेथील शिलालेख आजही आहे. सोळाव्या शतकात होणाऱ्या परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी िहगणेंच्या पूर्वजांनी गणपतीची मूर्ती पाठीवर उचलून आत्ताच्या ठिकाणी स्थापन केली. म्हणून पाठीवरून खाली ठेवल्यावर जसे आसन असते तशाच स्थितीत ही गणेशमूर्ती आहे, असे सांगतात. अनेक वर्षांपासून या मूर्तीस शेंदूर विलेपन होत असल्याने गणेशाचे रूप पालटले होते. अलीकडेच हा शेंदुराचा लेप अचानक निघाल्याने गणपतीचे मूळ स्वरूप समोर आले आहे. साडेचार फूट उंचीच्या दोन खांबी मंडपात अत्यंत सुबक चेहऱ्याची महोत्कट गणेशमूर्ती विराजमान आहे. दहा हातांत विविध आयुधे घेऊन तेजस्वी बालकाप्रमाणे हा आसनस्थ आहे. गणेशाचे मुकुट, माळा, साखळ्या, दुर्वाचा हार हे अलंकारही पेशवाईला साजेसे असे आहेत. उत्सवाच्या वेळी मूर्तीस सर्व दागिने चढवतात त्यावेळचा त्याचा थाट पाहण्यासारखा असतो.
तिळा गणपती -
पंचवटी परिसराशेजारी असणाऱ्या गणेशवाडीत एका टेकडीवर तिळा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरामुळेच इथल्या भागाला गणेशवाडी हे नाव मिळाले. कै. दामोदर दगडूशेठ सोनार (भडके) यांना घराचा पाया खोदताना डाव्या सोंडेची गणेश मूर्ती मिळाली तेव्हा त्यांनी जवळच मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. इसवी सन १७६७ साली मंदिरासाठी पाच हजार रुपये इतका खर्च झाला असे सांगतात. उत्तर पेशवाई काळातील स्थापत्य शैलीत प्रस्तुत मंदिराची रचना आहे. उंच टेकडीवर दगडी पाया आणि वर विटांचे बांधकाम केले आहे. सभामंडप त्यापुढे गर्भगृह असून दोन्ही वरील छत घुमटाकार आहे. गर्भगृहाला समोरासमोर दोन खिडक्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या दाराची उंची अतिशय कमी असल्यामुळे खाली वाकूनच आत प्रवेश करावा लागतो. गर्भगृहातील तीन कोनाडय़ांपकी मधल्या मुख्य कोनाडय़ात गणपती आहे, त्याच्या उजवीकडच्या लहान कोनाडय़ात मारुतीची छोटी मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती मिळाली तेव्हा ती अतिशय लहान होती, शेंदूर विलेपनामुळे आता तिचा आकार जरा वाढला आहे. हे आकार वाढण्याचे प्रमाण तिळाइतके आहे म्हणून याला तिळा गणपती असे म्हणतात. पौषातील तीळकुंद चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो. तेव्हा सर्व नाशिककर येथे येऊन तीळगुळाचा नवेद्य दाखवतात आणि इच्छापूर्ती, सुखप्राप्तीची कामना करतात. भडके कुटुंबियांची बारावी पिढी या मंदिराची व्यवस्था पाहत आहे. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या मूळ रूपाला बाधा येऊ न देता जीर्णोद्धार केला.
लोथेंचा गणेश –
रविवार कारंजावर गायधनी गल्लीच्या सुरुवातीला लोथेंच्या वाडय़ात उजव्या सोंडेचा गणेश रिद्धिसिद्धीसहित विराजमान आहे. इसवी सन १९८८ मध्ये महापालिकेने केलेल्या रस्ता रुंदीकरणात मंदिराचा काही भाग गेला. ३००-४०० वर्षांपूर्वी लोथेंच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टान्तानुसार त्यांनी सदर जागी उत्खनन केले तेव्हा या मूर्ती मिळाल्याचे सांगतात. पांढऱ्या संगमरवरी अखंड पाषाणात अत्यंत रेखीव गणेश मूर्ती घडवलेली आहे. कमळात पद्मासन घालून चतुर्भुज, शूर्पकर्ण गणपती बसला आहे. वरील हातात परशु आणि फुलं तर खालच्या डाव्या हातात अक्षमाला आणि उजवा हात वरद मुद्रेत आहे. उजवीकडील दात अर्धा असून डाव्या दाताकडून सोंड उजवीकडे वळली आहे. गळ्यात जानवे, माळा आहेत. कमळाजवळ गणपतीकडे पहाणारा उंदीर असून गणेशाच्या दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी आहेत. मंदिरापुढे पेशवेकालीन हंडय़ा आणि िभतीवर मोठमोठे आरसे लावले आहेत. लोकांना फारसा परिचित नसलेला हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने जास्त सिद्ध मानला जातो.
नवश्या गणपती –
नवसाला पावणारा तो नवश्या गणपती. गंगापूररोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे हे मंदिर आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाईंना नाशिकजवळील चावंडस गावी ठेवण्यात आले. इसवी सन १७६४ साली आनंदीबाईंना पुत्रप्राप्ती झाली तेव्हा आनंदीबाईंच्या नावावरून सदर गावाचे नामकरण आनंदवली असे केले गेले. त्याच दरम्यान येथे गणपती मंदिर बांधले. तेच हे नवश्या गणपतीचे मंदिर. सदर क्षेत्र आता नाशिक महानगराच्या हद्दीत आहे. पंधरा-वीसपूर्वी मंदिराजवळ आनंदीबाईंच्या गढीचेही अवशेष होते आता केवळ मंदिर आहे आणि बाकी परिसर इमारतींनी भरला आहे. तरीही इथली प्रसन्न शांतता आणि पावित्र्य टिकून आहे. मुख्य रस्त्यापासून जरा खाली खोल नदी पात्राकडे पायऱ्या उतरत गेल्यावर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आहे. प्रशस्त सभामंडप, सभामंडपात दोन्ही बाजूला अष्टविनायक, त्यापुढे छोटे गर्भगृह, गर्भगृहाला घुमटाकार शिखर अशी मंदिराची रचना आहे. डोक्यावर मुकुट असलेली गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून त्यापकी वरील दोन हातात पाश आणि फुले आहेत, तर खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत असून, मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. नवसपूर्तीचा भाग म्हणून येथे छोटय़ा-छोटय़ा घंटा लावल्या जातात, त्यामुळे सभामंडपाचे खांब अनेक घंटांनी भरून गेले आहेत. सभोवताली गर्द झाडी, लागूनच नदीपात्र आणि नीरव शांतता यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षति करते. नदीपात्रात बोटिंगचीही सुविधा उपलब्ध आहे.
(लोकसत्ता)