Thursday, 24 June 2021

पेमगिरी चा महावटवृक्ष

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष

पेमगिरी चा महावटवृक्ष 

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगड उर्फ शहागडाच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा नावाच्या भागात एक विशाल वटवृक्ष आहे. वादळ-वा-याला तोंड देत शेकडो वर्षांपासून तो तेथे उभा आहे. सुमारे दोन ते तिन एकरवर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ६० फूट आहे. त्याच्या एकूण ९० च्या जवळपास पारंब्या आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशी समाजाची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. 

या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. या झाडाखालीच गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही येथेच अखेरचा श्वास घेतला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले. आणि भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करतच तिनेही प्राण सोडला. पुढे या जागेवर त्यांच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. कुणी जाणीवपूर्वक फांद्या तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी त्या त्या लोकांना अद्दल घडली गेली, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. 

कारणं काहीही असोत, पण हा वट वृक्ष दिवसेंदिवस त्यामुळे विस्तारत गेला. आजमितीस हा महाराष्ट्रातला सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील हा महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी या ठिकाणी आवर्जून येत असतात. कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आपल्या देशातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे. देशभरात येथील वटवृक्ष विस्ताराने ५वा मोठा असल्याचा दावा केला जातो. 

#Banyantree #Sangamner #Pemgiri #वड #वटवृक्ष





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....