२१ जून - आंतरराष्ट्रीय योग दिन
आज २१ जून रोजी जगभर सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगासने व प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच शारिरीक व मानसिक व्याधी रोखण्यासाठी व निवारणार्थही तज्ज्ञांकडून योगोपचार करण्यास सांगितले जाते. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी योगाचे एक अंग असलेल्या प्राणायामाला पर्याय नाही. त्यामुळे कोट्यावधी लोक नियमितपणे प्राणायाम करु लागले आहेत.
पतंजली मुनींनी सांगितलेल्या योगाचे एकूण आठ अंग आहेत. ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. यास अष्टांग योग म्हटले जाते. अष्टांग योगाचे पालन केल्यास मनुष्याच्या शरीरात व मनात परिवर्तन घडून त्यास निरामय जीवनाची प्राप्ती होते. ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक शारिरीक व आध्यात्मिक साधना आहे. अशा या हजारो वर्षे प्राचीन असलेल्या रोग निवारणाच्या पद्धतीला २०१४ या वर्षापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.
मात्र योग दिनासाठी २१ जून हाच दिवस का निवडण्यात आला याबद्दल सर्वसामान्यांमध्ये कुतूहल असते.
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत २०१४ साली ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला होती. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली. संयुक्त राष्ट्राने २०१५ पासून २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
यंदाच्या योग दिनाची थिम योगा आणि वेलनेस अशी आहे.
No comments:
Post a Comment