Monday, 8 March 2021

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या महिलेमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.

थेरेसा सर्बर माल्कल   


आज जगभर जो जागतिक महिला दिन साजरा होतो, त्याची पार्श्वभुमी बहुतेकांना माहित नसते. या दिवसाची सुरुवात करणा-या थेरेसा माल्कल आज दुर्दैवाने विस्मृतीत गेल्या आहेत. . चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया… 

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला  रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या झार राजवटीत प्रचंड छळवाद सहन करावा लागला. त्यामुळं अनेक ज्यु कुटुंबे करून अमेरिकेत स्थलांतरीत झाली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांवर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम त्यांनी सुरू केले.

काही काळानंतर पुढे त्यांच्या असे लक्षात आले की, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव केला. त्यावेळी अमेरिकेत सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळू शकत होता. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की या पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णयप्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत होते. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले. 

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळा विभाग बनवण्यात आला. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसांनाच निवडण्यात आले. 

यानंतर थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठीचा लढा आणखी तीव्र केला. त्यापैकीच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार.  तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि अथक प्रयत्न करून समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. 

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांच्या या मागणीला पाठींबा दिला. आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर लवकरच युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत. 

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतरीत मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे. 

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि थेरेसा माल्कल यांच्या कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन!





No comments:

Post a Comment

Vintage photo 1909

  Boys begging on the streets of Nashik, 1909.