Thursday, 4 March 2021

अनुपम (अनुपान) शिळा, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर

अनुपम (अनुपान) शिळा, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर  


त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे प्रथम स्थान मानले जाते. बहुतेक नाथांनी इथेच तपसाधना करुन आदिनाथांचा अनुग्रह, सप्तश्रृंगी मातेचा आशीर्वाद मिळवून शाबरी विद्या प्राप्त केली होती.

ब्रह्मगिरी पर्वतावर कौलगिरी नामक भागात अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथपंथीयामध्ये प्रचलित असलेली आख्यायिका अशी आहे की साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना येथे उपदेश देण्याचे मान्य केले होते. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. 

त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे.

एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी "हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. अशीही अजुन एक आख्यायिका प्रचलित आहे. तेव्हापासून नाथसंप्रदायातील साधू तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथपंथीय याच गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. 






No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....