आज गोदावरी जन्मोत्सव सोहळा...
गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. भगवान श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषींना गोदावरी माहात्म्य सांगून आनंदित केले. रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. तिचे गौतमीमुख विशेष पवित्र मानतात. तिला वृद्धगंगा म्हणतात कारण गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी कथा आहे. ती दक्षिणेत असल्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात.
गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावामागे सह्याद्रीतील डोंगररांगेतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. गोदावरी म्हणजे गाईचे पोषण करणारी असा अर्थ आहे. या पर्वताच्या पायथ्याशी प्राचीन काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. एकदा त्यांचे कडून चुकून गोहत्या घडली. त्या पातकाच्या निवारणार्थ त्यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली व गोहत्येचे पातक नाहीसे होण्यासाठी गंगावतरण करण्याची भगवान शंकरांना वरदान मागितले. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या जटांच्या माध्यमातून गंगा प्रकट केली अशी कथा आहे. ह घटना माघ शुद्ध दशमी या तिथीस घडल्याचे मानले जाते. त्यामुळे माघ शुद्ध दशमीस गोदावरी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
जेथे महादेवाने जटा उघडून गंगा सोडली तेथे लहानशा कुंडात थोडेसे पाणी असते. नंतर डोंगराच्या पूर्व कुशीत गंगाद्वार येथे लहानशा झऱ्यातून ते बाहेर येते. तेथपर्यंत ६९० पायऱ्या चढून जाता येते. तेथे कुंड व गंगेचे लहानसे देऊळ आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्योतीर्लिंग त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे.
No comments:
Post a Comment