म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात
२४ फेब्रुवारी १६७४ : कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.
कोल्हापूर येथील गडहिंग्लज तालुक्यात नेसरी या गावी एक इतिहास घडला. तो दिवस होता इंग्रजी तिथीनुसार २४ फेब्रुवारी १६७४. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे तिसरे सेनापती म्हणजे कुडतोजीराव गुजर. महाराजांनी त्यांना त्यांच्या परक्रमामुळे 'प्रतापराव' ही पदवी बहाल केली. तेव्हापासून कुडतोजीराव गुजर 'सेनापती प्रतापराव गुजर' म्ह्णून ओळखले जाऊ लागले.
सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच शिवाजीराजांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. उमराणी येथे झालेल्या निकराच्या लढाईत बहलोलखान मराठ्यांना शरण आला, त्याने क्षमायाचना करताच प्रतापरावांनी त्यांना सोडून दिले.
ही बातमी राजेंच्या कानी जाताच राजेंनी प्रतापरावांना पत्राद्वारे आदेश दिला."गनिमास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका".या आज्ञेने प्रतापराव खजिल झाले. बहलोलखानास मारण्यास आतुर झाले. प्रतापरावांना बातमी कळाली की खानाचे सैन्य हे गडहिंग्लजनजीक आहे तेंव्हा प्रतापराव गुजर यांचे सैन्य ही कोल्हापुरजवळ होते. ही बातमी कळताच
प्रतापरावांनी बेभान होऊन केवळ बरोबरच्या सहा सहका-यांना घेऊन नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला केला. या वळेस बहलोलखानाकडे सुमारे १२हजाराची फौज होती. घनघोर लढाई झाली. शेकडो गनिम त्यांनी कापून काढले, मात्र प्रतापराव गुजर व त्यांचे सहा सहकारी या गर्दीत धारातीर्थी पडले .
प्रतापराव पडले,’ही खबर महाराजांना अतीव दु:ख झाले. या ७ वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजाराम महाराजांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला. नेसरीची खिंड पावन झाली.
म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!
ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात!
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!
खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!
दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात!
- कविश्रेष्ठ कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment