दुर्गभांडार किल्ला
हा किल्ला सुटा नसून त्र्यंबकगडाचा जोडकिल्ला आहे. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर गावात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या मागे असलेल्या ब्रह्मगिरी डोंगराचाच एक भाग आहे.
सुरतेच्या लुटीवरुन परतताना महाराजांनी इथे मुक्काम केला होता व त्यापैकी लुटीतील खजिन्याचा काही भाग इथे लपवून ठेवला होता अशी दंतकथा बरेच जण मानतात. मात्र इथे प्रवेश करण्यासाठीचा दुर्गम मार्ग व अतिशय भक्कम बचाव पाहून ही दंतकथा खरी असावी असे वाटू लागते.
या किल्ल्याचे सोप्या शब्दात वर्णन करायचे म्हणजे पाषाणात कोरलेले एक रांगडे शिल्प! खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि दोन गडांना जोडणारा नैसर्गिक सेतू म्हणजे डोक्याचे पारणे फेडणारा पण थरारक अनुभव! दोन्ही बाजूला दरी असणाऱ्या ह्या चिंचोळ्या पुलावरून जाताना भणाणणा-या वा-यामुळे जपूनच जावे लागते.
किल्ले दुर्गभांडार चे वैशिष्ट्य म्हणजे त्याला जाणारी वाट. जसे सुरीने लोणी सहजतेने कापावे तसा कातळ तासलेला, त्यात बनवलेल्या पायऱ्या,त्यानंतर फक्त कमरेपर्यंत उंच असे दरवाजे,त्यानंतर भौगोलीक परिस्थितीने बनलेल्या पुलाचा किल्ल्याची वाट म्हणून केलेला वापर या सर्व गोष्टी आपणास रोमांचित करतात आणि मनात प्रश्न उभे राहतात कि हे नेमकं कसं बनवलं असेल?
दुर्गभांडार त्र्यंबकगडाच्या शेजारी आहे. "मुख्य किल्ल्याच्या बाजूला नुसती टेकडी असेल तर तिथे तटबंदी बांधा अथवा तटबंदी बांधणे शक्य नसेल तर ती टेकडी उध्वस्त करणे" या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात सांगितलेल्या धोरणाची पुरेपूर अंमलबजावणी केल्याचे दुर्ग भांडार येथे दिसून येते.
ब्रह्मगिरी/त्र्यंबकगड वरील जटास्थानाच्या मागे एक टेकडी आहे, याला उजवीकडे ठेवत एक निमुळती वाट दुर्ग-भंडार कडे जाणाऱ्या भुयारी कातळ जिन्याकडे जाते. उंच गवतात पायवाट थोडीसी निसरडी आहे तर थोडे जपून, अर्धा तास चाललो कि समोर दुर्ग भांडार चे दर्शन होते, निर्माणकर्त्यांनी कातळात कोरलेल्या, मऊ लोण्याला कापावे, त्याप्रमाणे दगडाला कापून खाली उतरणाऱ्या पायऱ्या खोदल्या आहेत. दुर्ग-भांडारच्या पायऱ्यांचे वैशिष्ट म्हणजे उतरताना आपल्या तीनही बाजूंनी कातळ असतो फक्त डोक्यावरचे छत काय ते उघडे असते. १५० पायऱ्यांचा जिना उतरून गेल्यावर एक दरवाजा मातीत अर्धवट गाडला गेला असावी असे वाटते, पण तसे नाही आहे, त्याची रचनाच तशी आहे. ह्या दरवाज्यातून वाकून जावे लागते तो पार करताच एक निमुळती वाट समोरच्या डोंगराकडे जाते. दुर्ग भांडार आणि त्र्यंबकगड यांच्यामध्ये अंदाजे २५० फूट लांब x ८ फूट रुंद नैसर्गिक दगडी पूल आहे. दगडी पुलावरून जाताना काळजीपूर्वक जावे लागते, कारण दोन्ही बाजूला अंदाजे १००० फूट खोल दरी आहे आणि वाऱ्याचा जोर पण ह्याठिकाणी जास्त असतो. पुढे आणखी एक कातळातील दरवाजा लागतो. त्यातून पुढे जाणारी वाट आपल्याला भूयारी मार्गापलीकडील डोंगर माथ्याकडे म्हणजे दुर्गभांडार कडे नेते. या किल्ल्यावर बुरुज, पाण्याची टाकी आणि सैनिकांच्या पहा-याच्या जोती आहेत.
गडावरून त्र्यंबकगड, त्र्यंबकेश्वर गाव, अंजनेरी किल्ला, हरिहर किल्ला यांचे उत्तम दर्शन होते. हरिहर, भास्करगड, ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडार हे चारही गड दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय स्थापत्यशास्त्र किती अद्भूत होते याची साक्ष देतात. चारही ठिकाणच्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या म्हणजे नवलच आहे.
No comments:
Post a Comment