Tuesday, 16 February 2021

आई वडिलांसोबत डोक्यावर पाटी घेऊन भाजीपाला विकणाऱ्या तरुणाची यशोगाथा...

आई वडिलांसोबत डोक्यावर पाटी घेऊन भाजीपाला विकणाऱ्या तरुणाची यशोगाथा...

बार्शीच्या तरुणाचा यूपीएससी मध्ये झेंडा - शरण कांबळे देशभरात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण.
पोरगं साहेब झालं इतकचं समजते पण कोणती परिक्षा पास झाले माहित नाही. हि प्रतिक्रिया आहे शरणच्या आईची.
बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं चिज झालं आहे. सेंट्रल आम्रड पोलीस फोर्सद्वारे विविध दलांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ, सेंट्रल रिझर्व्ह पोळी फोर्स सीआरपीएफ, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सीआयएसएफ, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस आयटीबीपी आणि सशस्त्र सीमा बल एसएसबी या दलामध्ये निवड करण्यात येते. शरण याने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रथमच दिलेल्या परीक्षेत बाजी मारली आहे.

गोपीनाथ कांबळे यांना जेमतेम दीड एकर शेती आहे. दिवसभर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा शरण हा लहान मुलगा. दोन मुलांपैकी मोठा मुलगा दादासाहेब अभियंता झाला आहे. तर लहान मुलगा शरण हा अभियंता पदाची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. शरण याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशालेत , बारावीचे शिक्षण वैरागच्या विद्या मंदिरात आणि २०१६ साली सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग येथे बी टेक चे शिक्षन पूर्ण केले आहे. २०१८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगरूर येथून मास्तर ऑफ टेक्नॉलॉजी या विषयाची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका कंपनीमध्ये सुमारे २० लाखांच्या पॅकेजची नौकरी नाकारून शरण याने आई सुदामती व वडील गोपीनाथ यांच्या काबाड कष्ठाचे चीज व्हावे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तब्ब्ल १८ ते २० तास अभ्यास करून शरण याने २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने कांबळे कुटुंबाला आनंदाची बातमी मिळाली.

शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला. आपला लेक एवढा मोठा साहेब झाला, या आनंदाने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. भूतकाळातील आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहाणग्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....