किल्ले गाळणा
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावाजवळ गाळणा किल्ला आहे. नाशिक व धुळे यांच्या सीमारेषेवर असलेला हा किल्ला धुळेपासून अधिक जवळ आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्व भागात तुटकशा होत जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेत गाळणा उठून दिसतो, तो त्याचा इतिहास आणि स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे. म्हणूनच या डोंगरीदुर्गाला खान्देशचे नाक, बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हटले गेले आहे. गाळणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ७१० मीटर, म्हणजे साधारण २,३२९ फूट आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला पांझरा नदी खोरे, उत्तरेला तापी खोरे, तर त्याच अंगाला सातपुडा पर्वतरांग दिसते. पूर्वेला खान्देश मुलूख व लळिंग किल्ल्याचे टोक दिसतं. पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेत भरतात. या सगळ्यांत गाळणा आपल्या वैभवशाली स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव -डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून २ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात नाथपंथियांचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
गाळणा किल्ल्यावरील गुहा आणि टाक्यांची रचना पाहाता हा किल्ला प्राचीन काळा पासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास १३ व्या शतकापासून सापडतो. गाळणा किल्ल्याचा इतिहास म्हणजे बागुलवंशीय राजे, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज यांच्यातील लढायांचा इतिहास होय. १४ व्या शतकापासून या किल्ल्याचे व या विविध राजसत्तांच्या लढायांचे, त्यांच्यातील तहाचे आणि कुरघोड्यांचे संदर्भ तत्कालीन अनेक मुस्लिम ग्रंथांत व पत्रव्यवहारातून वाचायला मिळतात. १३ व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते. याच बागुल राजघराण्यामुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते. सोळाव्या शतकात (इसवीसन १५१० ते १५२६) गाळणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवीसन १५२६ मध्ये बागलाणचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १५५५ मध्ये निजामशहाने गाळणा पुन्हा जिंकून घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसन १७५२ मध्ये भालकीचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या ताब्यात होता. इसवीसन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला. गाळणा किल्ल्याचा उल्लेख मध्ययुगात काही कागदपत्रांमध्ये केळणा असाही झाल्याचे दिसते.
अनेक राजसत्तांनी या किल्ल्यावर राज्य केले. व यातील प्रत्येकानेच किल्ला अधिकाधिक बुलंद करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांनी किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, महालांची कामे केल्याचे दिसते. किल्ल्याच्या उत्तरेकडील एका बुरूजावर १५८३चा शिलालेख असून, तो बुरुज बांधणारा महंमद अलीखान याच्या नावाचा आहे. आणखी एका बुरुजावर १५८७चा पर्शियन शिलालेख आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे १५६२-६३, १५६६-६७, १५६९-७० आणि १५७०-७१ या वर्षांतील चार शिलालेखांत 'अफलातून खान' या निजामशाही किल्लेदाराचा उल्लेख येतो. त्याने गाळण्याच्या किल्ल्यावर प्रचंड बांधकाम केले. हे बांधकाम 'हुशीसिराजी' आणि 'हाकिमी गालीबखान' या तंत्रज्ञांनी केल्याचा उल्लेखही शिलालेखांतून येतो. १५७७ ते १५८० या काळात हैबतरखान हा गाळण्याचा निजामशाही किल्लेदार होता. तो आबिसियन हबसी मुसलमान होता. त्याने किल्ल्यात निजामशहासाठी 'मुराद' नावाचा खास राजवाडा बांधला. या राजवाड्याची इमारत बनविणारा तंत्रज्ञ मराठा असून, त्याचे नाव 'दत्तो त्रिमुरारी' असे होते. यावरून गाळण्याच्या बांधणीत स्थानिक स्थापत्यशास्त्रींचे योगदानही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
अनोखी बारव
हा किल्ला पाहण्यासाठी अनेक जण येतात मात्र गाळणा गावातील एका विहिरीत किल्ल्याची दगडी प्रतिकृती आहे हे कोणी पाहिले नसेल. हा एक अजब व आश्चर्यचकीत करणारा प्रकार आहे आणि विशेष म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. ही बारव म्हणजे बारवस्थापत्यशास्त्राचा एक अजब नमुना आहे. या बारवेतील कातळात एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती कोरल्यासारखी रचना पाहायला मिळते. गाळणा गावातील ही बारव २० फूट खोल व २५ X २५ लांबी-रुंदीची अष्टकोनी आकारात आहे. कातळात सहा-सात कप्प्यांची रचना करून, ती कमानी आणि बुरुज-तटबंदीच्या मदतीने एकमेकांना जोडलेली दिसते. ही सगळी रचना अखंड आहे. दोन कप्यातील जोडभिंतीवरून सहज चालत जाता येईल, इतक्या जाडीची तटबंदी व लहान लहान पायऱ्याही येये पाहायला मिळतात. बारवेच्या कठड्याची बांधणी मुघल काळात झालेली दिसते. मूळ बारव पूर्णपणे कातळात असून, ती प्राचीन वाटते; कारण बाराव्या शतकानंतर कातळातील कोरीवकाम फारसे दिसत नाही. जैन लेणी व पाण्याचे टाके सोडले, तर कातळात असे काम कुठेही पाहायला मिळत नाही. झाले असले, तरी शिल्पदृष्ट्या ते अगदीच दुय्यम असते. ही बारव फक्त कातळात कोरलेली नाही, तर तिची रचना एखाद्या किल्ल्यासारखी शिल्पांनी नटलेली असल्याने तिचे वेगळेपण भावते.
दिवाळीत आपण मातीचा किल्ला बांधतो, त्याची मोठी प्रतिकृतीच. ही प्रतिकृती कातळात कोरलेली असून, ती नेमकी कशासाठी बांधली असावी, हे कोडे काही सुटत नाही. गाळणा आणि देवगिरी किल्ल्यात साम्य आहे. हे दोन्ही किल्ले यादवकालीन असल्याने ही प्रतिकृती गाळण्याची की देवगिरीची, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. प्रतिकृती कातळात कोरण्यात आल्याने, ती नेमकी कशी कोरायची याचा प्लॅन तयार असेल. एखादी वास्तू प्रत्यक्षात कशी असेल हे दाखविण्यासाठी ही प्रतिकृती कोरली असावी का? नंतरच्या काळात त्यात पाणी साचू लागल्याने निजाम अथवा मुघल काळात त्यावरील बांधकाम करून, तिला बारवेचे स्वरूप दिले असावे.
उन्हाळ्यात या बारवेतील पाणी पूर्णपणे आटल्याने ही प्रतिकृती व्यवस्थित पहाता येते. मात्र, इतर वेळी पाण्याचे ती भरल्याने एका तटबंदीतून दुसऱ्या तटबंदीत पाणी जातानाही पहायला मिळते. मात्र, तिचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही.
काही असो, या प्रतिकृतीने, बारवेने नाशिकच्या शिल्पवैभवात मोरपिस खोवले आहे, हे नक्की! -
- रमेश पडवळ
(छायाचित्रे इंटरनेटवरुन साभार)
No comments:
Post a Comment