Tuesday, 5 November 2024

वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा अनोखा सोहळा : सगर उत्सव

महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत गवळी समाजा तर्फे दरवर्षी मोठ्या जल्लोषात दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या व भाऊबीजेच्या दिवशी सगर उत्सव साजरा करण्यात येतो. पशुपालक व दुग्धोत्पादन असणाऱ्या या समाजात पदरी असणाऱ्या म्हैस व रेड्यांनाच आपली लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे  ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या म्हशी व हेल्याना सजवून वाजत गाजत परिसरात मिरवणूक काढण्यात येते. आकर्षक सजावट केलेल्या हेल्याना आणि त्यांच्या मालकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते.

म्हैस हे लक्ष्मीचे रुप तर रेडा हे याचे वाहन आहे. या दिवशी म्हैस व रेड्याची पूजा केल्यास नवीन वर्षांत अडचणी येत नाहीत असे मानले जाते. या उत्सवामागे महाभारत काळातील एका घटनेचा संदर्भ दिला जातो.श्रीकृष्णाने इंद्रपूजा नाकारुन गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचे आवाहन सर्व गोकूळवासियांना केले होते. त्यामुळे रागावलेल्या इंद्राने गोकूळावर तुफानी पर्जन्यवृष्टी करुन गोकूळ पाण्यात बुडवून कृष्ण व गोकूळवासियांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. तथापि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गोप गोपिकांचे व त्यांच्या पशूधनाचे संरक्षण केले. त्या आनंदाप्रीत्यर्थ गवळी समाजात सगर उत्सव साजरा केला जातो असे जुने जाणकार सांगतात.

रंगविलेली शिंगे, गळ्यात घुंगूरमाळा, पाठीवर नक्षीकाम  व मानेवर मोरपंखांचा पिसारा अशा रुपात नटलेल्या हेल्यांमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरतो. सजवलेल्या म्हैस व रेड्यांकडून कसरती करुन घेतल्या जातात. रेड्यांच्या शर्यती अथवा टक्करी आयोजित केल्या जातात.  

नाशिकमध्येही हा सोहळा वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

(या लेखासोबतची छायाचित्रे इंटरनेटवरुन साभार)












No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....