Tuesday, 13 February 2024
श्री गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेशाची माघी जयंती
आज श्री गणेश जयंती, माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेशाची माघी जयंती. माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरदा चतुर्थी अशी या चतुर्थीची नावे आहेत. गणपतीचे अनेक अवतार आणि अनेक रूपे असून त्यातल्या एका अवताराचा हा जन्म दिवस अर्थात वाढदिवस आहे। चौथाच दिवस का तर माणूस मातेच्या उदरात असताना सुद्धा चौथ्या महिन्यात त्याचा जीवात्मा शरीरात प्रवेश करत असतो.
मग भाद्रपद चतुर्थी आणि माघी चतुर्थी मध्ये काय फरक आहे. तर आज जयंती असलेला विनायक हा गणेशाचा वेगळा अवतार आहे। भाद्रपद चतुर्थीला आपण पूजन करतो तो शिव - पार्वतीचा पुत्र गणपती किंवा गणेश हा नव्हे. आज जयंती असलेला महोत्कट विनायक हा दशभुज म्हणजे दहा हात असलेला, रक्तवर्णी म्हणजे रक्ताचा लाल रंग असलेला अवतार. वाहन सिंह. माघ शुक्ल चतुर्थी या दिवशी ऋषी कश्यप यांना अदिती या त्यांच्या पत्नीपासून “महोत्कट विनायक” हा पुत्र झाला. कश्यप ऋषींना दिती, अदिती सहित एकूण १३ पत्न्या होत्या. कश्यप ऋषी आणि दिती यांच्या पोटी हा जन्माला आला. म्हणून काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी सुद्धा गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि तोही श्री गणेशाचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो. आपण लहानपणापासून गणेश जन्माची एक कथा ऐकत आलेले असतो. ती ही की पार्वतीच्या मळापासून तिने गणपती बनवला आणि दारावर त्याला बसवला. मग शिवशंकरांना त्याने आत सोडलं नाही म्हणून त्यांनी त्याचं मस्तक उडवलं आणि नंतर सत्य परिस्थिती कळल्यावर हत्तीचं मस्तक आणून जोडलं. ही कथा भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी घडलेली होती
महोत्कट विनायक हा भगवान श्री गणेशाच्या ६४ अवतारांपैकी पहिला अवतार आहे. नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन राक्षस भावांच्या नाशासाठी हा अवतार अवतरला होता. त्यांचे वडील कश्यप प्रजापती होते आणि आई अदिती. त्याच्या नऊ हातांमध्ये शस्त्रे आहेत. त्याच्या हातात सुदर्शन चक्र, तलवार, बाण, धनुष्य, त्रिशूळ, शंख, कमळ, गदा आणि परशू आहे आणि ते दहाव्या हाताने आपल्या भक्तांना इच्छित परिणामांचा आशीर्वाद देतात. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा आणि धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणून माघी चतुर्थी या महोत्कट विनायकाची उपासना करून साजरी केली जाते. अशी स्कंद पुराणात या अवताराबाबत कथा आहे. कृष्णावर याच माघी चतुर्थीला चंद्र दर्शन झाल्यामुळे चोरीचा आळ आला होता असा पुराणात उल्लेख आहे.
या दिवशी गणेशाची हळद किंवा शेंदुरापासून बनवलेली प्रतिमा पुजली जाते. काही ठिकाणी गाईच्या शेणापासून सुद्धा ही प्रतिमा बनवली जाते. पाण्यात तीळ भिजवून किंवा तिळाची पेस्ट अंगाला लावून आज आंघोळ करायची असते. जेणे करून अंग मऊ व्हावे, कारण थंडीमुळे अंग कोरडं आणि रुक्ष होऊन त्वचा तडकलेली असते आणि त्यामुळे अंगाला खाज सुटत असते. आजच्या दिवशी गणेशाची पूजा विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी करण्याचा प्रघात किंवा परिपाठ आहे. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. बरेच जण एकभुक्त (एक वेळ उपाशी राहून) या दिवशी जागरण करतात. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.
Subscribe to:
Posts (Atom)
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...
-
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) 'भद्रं करोति इति भद्रकाली | ' भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी ...
-
आज #गोदावरी #जन्मोत्सव... गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. #भगवान ...