Wednesday, 6 September 2023

मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर

 आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जाणून घेऊया दुर्मिळ  व एकमेवाद्वितीय अशी मूर्ती असलेले मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर  




दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावाचे मुख्य दैवत आहे श्रीकृष्ण. या गावातील श्रीकृष्णाच्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.  ते म्हणजे येथे असलेली गोपालकृष्ण स्वरूपातील अष्टबाहू मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कधी झाली अज्ञात आहे. मात्र पुरातनकाळापासून ही वैशिट्यपूर्ण मूर्ती असलेल्या या मंदिरात येथील ग्रामस्थ गोपाळकृष्णाची मनोभावे आराधना करीत आहेत.  


मराठाकालीन शैलीतील दुमजली काष्ठ सभामंडप असलेले हे मंदिर पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे आहे. या मंदिराची तीन मजली इमारत काष्ठवास्तुशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. या सभामंडपातील गाभाऱ्यात ही देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभाऱ्यावर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. 


गाभाऱ्यातली शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती  अतिशय देखणी व मंत्रमुग्ध करणारी आहे.  कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हातात मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स धेनु आणि गरूड उभे आहेत. 



या मूर्तीविषयी एक आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन काळी केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. सोबत त्याने तयार केलेली ही अष्टबाहू गोपाळकृष्णाची मूर्ती होती. पुढे जाण्यासाठी सकाळी जेव्हा तो तयार झाला तेव्हा जमिनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीकारास उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो,  

हे अष्टबाहू कृष्णाचे रूप भारतात इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. त्यामुळे मोहाडीतील ही या दुर्मिळ कृष्णमूर्तीचे वैभव हे मोहाडीचे वैशिष्ट्य आहे. साधारण पंचाहत्तर वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. गावात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उतसाहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.  पाहण्यासारखा असतो. या जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अनेक वर्षांपासून होत असलेली मोहाडीची श्रीकृष्ण व्याख्यानमालाही रसिकांसाठी एक आकर्षण असते. 

Monday, 4 September 2023

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहात्म्य

 ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहात्म्य 

श्रावण महिना लागला की, असंख्य शिवभक्तांना ओढ लागते ती ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेची.  त्यातही श्रावणातील तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहतात. या प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात. एवढेच नव्हे तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविक गर्दी करतात. वास्तविक पाहता, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी चालते, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. मात्र कालांतराने श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार हा प्रदक्षिणेचा पर्वकाळ मानला गेला. त्यामुळे प्रदक्षिणा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारीच करावी, हा नवा पायंडा वर्षानुवर्षे रूढ झाला आहे. सध्याच्या काळात  “फेरी” हा शब्द प्रचलित झाला आहे मात्र धर्मशास्त्रानुसार ही प्रदक्षिणाच, कारण यात संपूर्ण ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते. अनादिकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत असून पुण्यप्राप्तीसाठी व पापक्षालनासाठी प्रदक्षिणा करावी असे म्हणतात. 


पौराणिक आख्यायिकेनुसार, ब्रम्हगिरी पर्वत हा शिवस्वरूप असून ब्रम्हगिरी पर्वत स्वयंभु पंचमुखी शिवलिंग आहे. आधी हा पर्वत शिवगिरी ह्या नावाने ओळखला जायचा. ब्रम्हदेवाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने ब्रम्हदेवास वरदान दिले की तुमचे नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन तेव्हापासुन ह्या पर्वताचे नाव ब्रम्हगिरी पर्वत असे पडले. ह्या पर्वताला एकुण पाच शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते.


नवक्रोशात्मकं लिंगं त्र्यंबकस्य प्रतिष्ठितम । 

या श्लोकानुसार नऊ कोस लांबी असलेला ब्रह्मगिरी पर्वत हाच त्र्यंबकेश्वराचे शिवलिंग आहे. व याठिकाणी साक्षात शिवशंकरासोबत ब्रह्मदेव व हरिहर पर्वत रूपाने भगवान विष्णू ही विराजमान असल्यामुळे अशा प्रकारे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते व हजारो वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळते अशी जनमानसात धारणा आहे.


आणखी एका पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला ज्यामुळे अनेक जिवजंतु, पशु-पक्षी, अकारण मरण पावले आणि चारही दिशेला त्राही त्राही झाली. पाण्याचा भयंकर दुष्काळ पडला तेव्हा गौतमऋषी व त्यांच्या सौभाग्यवती अहिल्यामातेने भगवान वरुणदेवाची पुजा अर्चना केली व त्यांना प्रसन्न करून घेतले.

त्यांनी गौतमऋषींना एक उपाय सुचविला, मुनिवर तुम्ही एक खड्डा तयार करा आणि मग मी तो खड्डा अक्षय शितल पाण्याने तुडुंब भरून देईन. नंतर या खड्ड्याचे पाणी कधीही संपणार नाही. गौतम ऋषींनी तसेच केले आणि बघता बघता तो खड्डा अक्षय शितल पाण्याने भरून गेला. या खड्ड्याचे तलावात रूपांतर झाले. या गौतम तलावाजवळ आजूबाजूचे साधुसंत येऊ लागले व नंतर तेथेच निवास करून राहु लागले. हळूहळू गौतम तलावाजवळ वस्ती होत गेली. 


एके दिवशी गौतम तलावाजवळ पाणी भरण्यावरून माता अहिल्याचे दुसऱ्या ऋषी पत्नीबरोबर भांडण झाले. ही गोष्ट अन्य ऋषीपत्नींनी वाढवून आपल्या ऋषीपतींना सांगितली. तेव्हा ऋषीपतींनी आपापल्या सौभाग्यवतींना आश्वासन केले की, आम्ही सगळे मिळून गौतम ऋषींना त्र्यंबकेश्वर स्थान सोडून जाण्यास भाग पाडतो मग तुम्हा लोकांना पाणी भरायला कोणताही त्रास होणार नाही. सर्व ऋषीमुनींनी श्री गणेशांची आराधना करून त्यांना विनंती केली की गौतम ऋषींवर कोणत्याही पापांचा दोष लावा. त्यामुळे गौतम ऋषी कलंकित होऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्र सोडून लांब जातील. तेव्हा गणेश तथास्तु म्हणाले. 


नंतर गौरीपुत्र गणेशाने गायीचे रूप धारण केले व गौतम ऋषींच्या शेतावर चरायला गेले. गौतम ऋषींनी गायीला चरताना बघितले व तिला हुसकवण्यासाठी दर्भाच्या काडीने मारले. दर्भाच्या काडीचा स्पर्श होताच गाय मरण पावली तेव्हा सर्व ऋषी तेथे आले आणि त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्या पापांचा दोष लावला. असाह्य गौतम ऋषीमुनींनी अन्य ऋषींना या महापाप दोषांचे निवारण विचारले. तेव्हा सगळे ऋषीगण म्हणाले, तुमच्याकडे फक्त दोनच उपाय आहेत एकतर तुम्ही ब्रम्हगिरी पर्वत सोडून जाणे नाहीतर तीन वेळा पृथ्वीची आणि १०१ वेळा शिवस्वरूप ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून नाथांचे नाथ भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांच्या जटेतील गंगामातेला ब्रम्हगिरीत आणून त्या पवित्र जलधारेने स्नान करा आणि त्या पाण्याने शिवस्वरूप १०१ शिवलिंगावर अभिषेक करा. तेव्हा तुम्ही या गोहत्येच्या महापापातून दोषमुक्त होवू शकाल.  गौतम ऋषींनी समस्त ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीची ३ वेळा प्रदक्षिणा व ब्रम्हगिरी पर्वताची १०१ वेळा प्रदक्षिणा करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतले. तत्पश्चात भगवान आदिनाथ भोलेनाथ प्रगट झाले आणि म्हणाले, मुनीवर गौतम आपण निष्पाप आहात. तुमचा छळ केला आहे. मी तुमच्या गोहत्या महापाप दोषमुक्ती करिता आपल्याला गंगा अवश्य प्रदान करील.  त्यानुसार ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवाच्या जटेमधून गंगास्वरूप गोदावरी प्रकट झाली. 


श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना आपल्या ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई या भावंडांसमवेत याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि पुढे त्यांनी ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून भागवत धर्माची स्थापना केली. 


ही प्रदक्षिणा कधी करावी, या विषयावर देखील अनेक तर्क सांगितले जातात. परंतु, धर्मशास्त्रानुसार श्रावणातल्या सोमवारी व त्यातल्या त्यात तिसऱ्या सोमवारी ही प्रदक्षिणा करावी अशीच परंपरा इथे प्रचलीत आहे. अनेक जण श्रावणाच्‍या तिस-या सोमवारची प्रदक्षिणा रविवारी संध्‍याकाळपासूनच सुरू करतात. त्यामुळे प्रदक्षिणेचा शीण जाणवत नाही असे अनेकांचे मत आहे. 


प्रदक्षिणेचे मार्गानुसार तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अंतराने छोटी असलेली परंतु सध्या सर्वात जास्त प्रचलित असलेली ब्रम्हगिरी प्रदक्षिणा.  या प्रदक्षिणा मार्गाचे अंतर साधारणपणे २२ ते २५ किमी पर्यंत आहे. दुसरा मार्ग म्हणजे हरिहर पर्वतासहित प्रदक्षिणा. या मार्गाने प्रदक्षिणेचे अंतर साधारणपणे ३७ ते ३८ किमी पर्यंत आहे तर सर्वात मोठी प्रदक्षिणा म्हणजे अंजनेरी, हरिहर व ब्रह्मगिरी पर्वतांसह प्रदक्षिणा. हा मार्ग साधारणपणे  ५८ ते ६० किमी अंतराचा आहे. जास्तीत जास्त भाविक पहिल्या प्रकारची छोट्या अंतराचीच प्रदक्षिणा करतात. 


ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सुरुवात करताना प्रथम कुशावर्ता तीर्थावर जाऊन स्नान करायचे असते. पहाटे उठून कुशावर्त तीर्थावर स्नान करून भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा आरंभ करावी. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण घेऊन गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार करून पुढे सापगांव शिवार, गणपती बारी, पुन्हा त्र्यंबकेश्‍वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या प्रदक्षिणेदरम्यान ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किल्ला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते.  प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. या प्रदक्षिणा मार्गात प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, नाग तीर्थ, राम तीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ इ. अनेक तीर्थांचे दर्शन होते. पूर्वी या मार्गात एकूण १०८ तीर्थ होते ते म्हणतात. मात्र अनेक तीर्थ आता काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. 


पुर्वी शेतातून मिळेल तो रस्ता काढीत भाविक ही प्रदक्षिणा पुर्ण करत असत. मात्र आता हा संपूर्ण मार्ग सिमेंटच्या रस्त्याने बांधून काढण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना हि प्रदक्षिणा आता पूर्वीपेक्षा सुखकर झाली असली तरी जंगल आणि भातशेतीतून, चिखलातून पायवाटेद्वारे होणाऱ्या प्रदक्षिणेचे मजा येत नाही. चिखल माती तुडवत चालण्याची मजा कमी झाली आहे.


श्रावणात केल्‍या जाणा-या या प्रदक्षिणेच्या मागे जसे एक पौराणिक व धार्मिक महत्व आहे, तसेच निसर्गाशी जवळीक साधून निसर्गसौंदर्याचा असीम व अनोखा आनंदही या प्रदक्षिणेने मिळतो. ऐन पावसाळ्यात हि प्रदक्षिणा असल्याने पावसाची रिमझिम सतत चालूच असते. बहुतांश वेळेला दुतर्फा असलेले डोंगर अर्धेअधिक धुक्यांनी झाकलेलेच असतात. सभोवार सततच्या पावसामुळे खळाळणारे ओहोळ, झरे आणि डोंगरमाथ्यावरून झेपावणारे असंख्य धबधबे भाविकांना स्वर्गसुखाचीच अनुभूती देतात.   








वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....