भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान)
'भद्रं करोति इति भद्रकाली | '
भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी|
याचा अर्थ जी नेहमीच कल्याण करते ती भद्रकाली. पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांच्या राजवटीत हिंदू धर्मियांच्या मंदिरातील देवदेवतांच्या मुर्तींची विटंबना होत होती. नाशिकमध्ये भद्रकाली मातेचे मंदिर बुधवार पेठेत पाटील गल्लीमध्ये होते. मुघल अंमलात या मंदिराला आक्रमकांचा उपद्रव होऊन मुर्तीची विटंबना, मोडतोड किंवा ती भंग होऊ नये म्हणून गावांतील स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन त्यावेळचे सरदार चिमाजी पटवर्धन यांना मंदिरासाठी जागा द्यावी म्हणून विनंती केली. सरदारांनी तिवंधा चौकाजवळील आपली जागा मंदिरासाठी दिली व सदर जागेवर सरदार पटवर्धन व सरदार गणपतराव दीक्षित यांनी भद्रकालीचे मंदिर बांधले. सदर मंदिराचे बांधकाम सन १७९० मध्ये पूर्ण झाले. भद्रकाली देवीचे मंदिर मोठे प्रशस्त असून वरती दोन मजले बांधलेले आहेत पण मंदिरावर कळस नाही. वरकरणी इथे मंदिर आहे हे आक्रमकांना कळू नये व मंदिराची व देवतांची विटंबना टळावी म्हणूनच मंदिरावर कळस नाही. मंदिराचे बाह्य स्वरूपाचे बांधकाम एखाद्या राहत्या वाड्याप्रमाणे केलेले आहे. आतमध्ये मात्र संपूर्ण काम लाकडात केलेले आहे.
श्री भद्रकाली देविची मुर्ती पंचधातुची असून साधारणतः १५”पंधरा इंच उंचीची आहे. मूर्ती अष्टादशभुजा अर्थात १८ हातांची आहे. त्या प्रत्येक हातात शस्त्र व अस्त्रे आहेत. शुल, चक्र, शंख, शक्ती, धनुष्य, बाण, घंटा, दंड, पाश, कमंडलू, त्रिशुल, माळा, तलवार, तेज, ढाल, चाप इत्यादि आयुधांनी शस्त्रसज्ज आहे. या गाभाऱ्यात पंचधातूच्या नवदुर्गांच्याही मुर्त्या आहेत.
या भद्रकाली शक्तीपीठाच्या मागे एक पौराणिक आख्यायिका आहे. पूर्वी राजा दक्ष प्रजापतीने मोठया यज्ञााचे आयोजन केले होते. या यज्ञामध्ये भगवान शंकर सोडून सर्व देव ऋषी मुनी यक्ष गंधर्व व सर्व मंडलिक राजे यांना आमंत्रण दिले गेले. पण भगवान शंकर हे त्याचे जावई असूनही त्याला आमंत्रण दिले नाही. त्यावेळी देवी सतीने शंकरांना विनंती केली. माझ्या वडिलांचे घरी यज्ञ आहे आपण जाऊ. तेव्हा शंकरांनी सांगितले आपणास बोलाविल्याशिवाय कोणाकडेही जाऊ नये. मात्र सतीच्या हट्टामुळे तिला जाण्यास परवानगी दिली. सती जेव्हा दक्षप्रजापतीच्या घरी गेली तेव्हा सर्वांनी तिची व शंकराची विना निमंत्रण आल्यामुळे निंदा केली.
सतीने सांगितले,
'यो निन्दति महादेवं निन्द्यमानं शॄणोति वा | तावुभौ नरकं यातो यावच्चंद्रदिवाकरौ ||'
जो शंकराची निंदा करतो वा ऐकतो तो जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत नरकात रहातो.
पतीची निंदा श्रवण स्वतःच्या पित्याकडून श्रवण करावी लागल्यामुळे सतीने आपल्या देहाचे यज्ञकुंडात समर्पण केले. त्यावेळी शिवगणांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरूवात केली. तेव्हा भॄगुमुनीने 'अपहता असुरा| रक्षांसि वेदिषदा|' ही आहुति दिल्याने अनेक ऋभु नामक प्रबलवीर प्रकट झाले. त्यांचे व शिवगणांचे युध्द झाले.
भगवान शंकर शोकविव्हळ होऊन यज्ञकुंडातील सतीचे निष्प्राण कलेवर खांद्यावर घेवून ब्रह्माण्डात भ्रमण करू लागले. यामुळे बाकी सर्व देव मुनी ऋषी घाबरले. त्यांनी भगवान विष्णूंना विनंती केली की आता शंकरांना शांत आपणच करू शकता. भगवान विष्णुंनी आपले सुदर्शन चक्र सोडले व त्या चक्राने सतीच्या देहाचे अनेक तुकडे झाले व ते सर्व भाग या भूमंडलावर पडले. त्यापैकी हनुवटीचा भाग हा गोदावरीच्या काठावर नाशिक येथे पडला.
'चिबुके भ्रामरी देवी विकृताक्ष जनस्थले।' (- तंत्र चुडामणी )
अर्थात जनस्थल अथवा जनस्थान या ठिकाणी 'चिबुक' हे भ्रामरी शक्तिरूपात प्रकट झाले व या शक्तिपीठाचा रक्षक भैरव आहे विकृताक्ष.
संस्कृत भाषेत हनुवटीला ‘चिबुक’ म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला ‘चिबुकस्थान’ असेही म्हणत असत. सतीच्या हनुवटीचा बाग जेथे पडला तेच स्थान भद्रकाली शक्तीपीठ होय. या शक्तिपीठाची शक्ती आहे भ्रामरी तर भैरव आहे विकृताक्ष. विकृताक्ष भैरवाची मूर्ती असलेले स्थान सध्याच्या मंदिराच्या जागेपासून साधारणपणे ३५० मीटरवर आहे. त्यामुळे मूळ भद्रकाली मंदिरही या जागेवरच असावे असा कयास करावा लागतो.
देवीच्या सुप्रसिद्ध ५१ शक्तीपीठापैकी एक असलेले व अत्यंत महत्वाचे असे शक्तीपीठ आपल्या नाशिकमध्ये आहे. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी मंदिर हे इतर शक्तिपीठांइतकेच महत्त्वाचे आहे. पण, जणू नाशिककरांना त्याची जाणीवही नाही. आपल्या दृष्टीने ती फक्त ग्रामदेवता आहे. नाशिककर, महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने ठरविले, तर नाशिकच्या या भद्रकालीमातेला कामाख्या, कालीमाता, ज्वालामाता, मनकर्णिका किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईएवढी प्रसिद्धी आणि महत्त्व मिळवून देता येऊ शकेल.
विकृताक्ष भैरव
विकृताक्ष भैरव