Monday, 28 June 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ७ ) लेणी क्रमांक २० ते २४

मागील लेखामध्ये आपण लेणी क्र १७ ते १९ अशी माहिती पाहिली. आज आपण २० ते २४ ही शेवटची महत्वाची लेणी जाणून घेऊयात.

लेणे क्रमांक २०: "श्री यज्ञ विहार" (अंदाजे १८० ख्रिस्ताब्द)  

लेणे क्रमांक २० हा सुद्धा एक मोठा विहार आहे. हे लेणे श्री यज्ञश्री सातकर्णीच्या शासनकाळाच्या ७व्या वर्षात खोदविले गेले, त्यामुळे हे लेणे 'श्री यज्ञ विहार' या नावाने ओळखले जाते. हे लेणे लेणे क्र. १९ च्या थेट वर खोदले आहे. त्यामुळे जणू लेणी क्र. १९ व २० हे दुमजली विहार असल्याप्रमाणे भासतात. 

हा विहार अतिशय प्रशस्त असून यात सभागृह, अनेक कक्ष व गाभारा अशी याची रचना आहे.  या विहारामध्ये एकूण २१ कक्ष खोदलेले आहेत. किंचित उंचीवर असलेल्या व मध्यभागी समोर असलेल्या गाभा-यात भगवान बुद्धाची भव्य अशी सुमारे १० फूट उंचीची प्रलंबपादासनात बसलेली व धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मुर्ती कोरलेली आहे. भगवान बुद्ध सिंहासनावर बसलेले आहेत. बुद्धाच्या दोन्ही बाजुंना भव्य असे दोन चवरीधारी सेवक उभे आहेत. शिवाय वरच्या दोन्ही बाजूंना गंधर्व पुष्पमाला घेऊन उडत आहेत. गाभा-याच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला भव्य असे तब्बल ९.५ फूट उंचीचे दोन द्वारपाल कोरलेले आहेत. हे दोन्ही द्वारपाल पद्मपाणी मुद्रेत आहेत. गाभा-याच्या बाहेरील चार स्तंभ अतिशय नाजुक नक्षीकामाने अलंकृत केलेले आहेत.  

या लेण्यातील शिलालेखातील माहितीनुसार, या लेण्याचे खोदकाम बोपकी नावाच्या भिक्कुने सुरु केले होते, तर लेण्याचे हे अपूर्णावस्थेतील काम भवगोप या गौतमीपुत्र सातकर्णीच्या सेनापतीच्या पत्नीने पूर्ण केले. गौतमीपुत्र असलेल्या यज्ञश्री सातकर्णीच्या ७व्या शासनकाळात  हे लेणे खोदल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. त्यानुसार या विहाराचे खोदकाम इ.स् १८० च्या दरम्यान झाले आहे. याचाच अर्थ हे लेणे दोन वेगवेगळया कालखंडात कोरले गेले आहे. यज्ञश्री सातकर्णीचे अशाच प्रकारचे शिलालेख कान्हेरी येथील लेण्यांमध्ये आढळले आहेत. यावरून सातवाहनांनी यज्ञश्री सातकर्णीच्या काळातच कान्हेरी व नाशिकचा प्रदेश पश्चिमी क्षत्रपांच्या ताब्यातून परत मिळवला होता हे सिद्ध होते.  

गाभा-यातील बुद्धमूर्ती व शिल्पकलेच्या शैलीनुसार या लेणीतील कोरीवकाम दोन वेगवेगळ्या काळात झाल्याचा अनुमान काढता येतो. साधारणपणे सहाव्या शतकात महायान पंथीयांनी या लेण्यात गाभारा व आणखी दोन कक्षांची भर घातली. या लेण्यातील दुस-या शिलालेखानुसार हे खोदकाम करण्यासाठी  'मर्मा' या उपासकाने देणगी दिली आहे. 

व्हरांड्यात चार अष्टकोनी स्तंभ कोरलेले आहेत. या स्तंभांचा खालचा भाग घटाकृती आहे तर वरचा भाग घंटाकृती आहे. व्हरांड्यात  एक कक्षही खोदलेला आहे. लेण्याचा बाहेर एक पाण्याचे टाकेही खोदलेले आहे. 



यज्ञ विहाराचे बाह्य दर्शन


यज्ञ विहाराचे अंतर्दर्शन



विहारातील गाभारा, द्वारपाल व गाभा-यातील बुद्धमूर्ती


पद्मपाणी द्वारपाल


पद्मपाणी द्वारपाल


भव्य बुद्धमूर्ती आणि बोधिसत्व   

भव्य बुद्धमूर्ती आणि बोधिसत्व   

गाभा-याबाहेरचे सालंकृत स्तंभ


गाभा-याबाहेरचे सालंकृत स्तंभ


गाभा-याला लागूनच सुरु होणारे विहारातील कक्ष


विहारातील इतर कक्ष


विहाराचा आराखडा


लेणी क्र .२१-२२

लेणी क्रमांक २१ यात फक्त सभागृह कोरलेले आहे.  

लेणे क्रमांक २२  मध्ये सभागृह, एक कक्ष व एक अपुर्ण खोदलेला कक्ष आहेत.  

या दोन्ही लेण्यांमध्ये शिलालेख अथवा शिल्पे नाहीत. 

लेणी क्र .२१ आणि २२ चा बाहेरुन दिसणारा भाग (बाजूला लेणे क्र २० च्या व्हरांड्यातील खांब दिसत आहेत)

लेणे क्रमांक २३ -

हे लेणे म्हणजे पूर्वी अनेक वेगवेगळ्या लेण्या असाव्यात. मात्र सध्या मधल्या भिंती नष्ट झाल्याने हे आता एकच प्रशस्त असे लेणे बनले आहे. या लेण्याच्या पुढ्यातच पाण्याच्या अनेक टाक्या खोदलेल्या आहेत. या लेण्याचा दर्शनी भाग जवळपास नष्ट झाला आहे. या लेण्याच्या एका भागात गाभारा खोदलेला आहे. गाभा-यात बुद्धाची भव्य बैठी मूर्ती आहे. बाहेर पद्मपाणी व वज्रपाणी द्वारपालाच्या रुपात आहेत. या गाभा-याच्या पडवीतील दोन खांब अतिशय कलात्मकरित्या कोरलेले आहेत. मात्र या खांबावर कोरण्यात आलेल्या नक्षीकामाच्या शैलीवरुन ते ब-याच नंतरच्या काळात कोरले गेल्याचे दर्शवतात. 

इतर भागात भिंतींवर बुद्ध व बाजूला पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्व कोरलेले आहेत. तसेच सोबत तारा, लोचना व महामुखी इ. देवता ही कोरलेल्या आहेत. या लेण्यातील शिल्पे रंगविण्यात आले होते असे दिसते. कारण काही शिल्पांवरील रंग अद्याप शाबूत आहे. या लेण्यातील शिल्पांवर महायान पंथाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या लेण्याच्या शेवटच्या भागातील भिंतीवर बुद्धाचे महापरिनिर्वाणाचे  म्हणजे बुद्ध शरीराच्या उजव्या बाजूवर झोपलेल्या अवस्थेतील शिल्प आहे.  

या लेण्यातील शिलालेखात हे लेणे श्री पुळुमावीच्या शासन कार्यकाळाच्या दुस-या वर्षात बनवल्याचा उल्लेख आहे.  

 

विस्तृत असे लेणे क्र. २३

स्तंभ आणि बोधिसत्व 


लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्ध आणि बोधिसत्व  

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा
व सर्वात कडेला बुद्धाचे महापरिनिर्वाण

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या रंगवलेल्या शिल्पाचे उरलेले अवशेष

लेणे क्र. २३ मधील बुद्धाच्या विविध भावमुद्रा

लेण्याच्या समोर लोखंडी जाळीने झाकलेल्या पाण्याच्या टाक्या


लेणे क्रमांक २४ -

यात सुध्दा एकापेक्षा जास्त लेणी मधल्या भिंती नष्ट झाल्याने एकच लेणे तयार झालेले आहे. हे लेणे म्हणजे भिक्कुंचे एक छोटेसे वसतीस्थान असावे. यामध्ये व्हरांडा व दोन खोल्या असाव्यात असा अंदाज आहे. या  लेण्याची शीर्षपट्टी अतिशय सुंदर असून यावर भौमितिक रचना व विविध प्राणी कोरले आहेत. या लेण्यात वाघ व घुबड यांच्या प्रतिमाही कोरलेल्या आहेत. घुबडाचे दर्शन आपल्याकडे अपवित्र मानले जाते ग्रीक संस्कृतीमध्ये मात्र घुबड हे अथेना या देवतेबरोबर असल्यामुळे पवित्र मानले जाते. यावरुन पुन्हा एकदा या लेण्यांच्या शिल्पकलेवरील ग्रीक प्रभाव दृगोच्चर होतो. 

या लेण्याच्या दर्शनी भागावर त्रिरत्न हे बौध्द धर्माचे चिन्ह कोरलेले आहे. या लेण्यात एक शिलालेख असून त्यात हे लेणे खोदवण्यासाठी लेखनिक असलेल्या वुधिका नावाच्या व्यक्तीने दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेण्यातही बुद्ध व बोधिसत्त्वांची उत्कृष्ट शिल्पे कोरलेली आहेत. 


 

लेणे क्र. २४ मधील बुद्ध आणि बोधिसत्वांची शिल्पे


लेणे क्र. २४ मधील बुद्ध आणि बोधिसत्वांची शिल्पे


लेणे क्र. २४ चे अत्यंत कलात्मक शीर्षपट्टी


लेणे क्र. २४ मधील शिलालेख 

याशिवाय नुकत्याच अजून तीन नवीन लेणी या समूहात सापडल्या असून त्या लेण्यांची रचना पाहता या लेणीसमूहाचा निर्मिती कालखंड अजून मागे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अद्याप अभ्यासक अजून तरी कुठल्याही निष्कर्षाप्रत आलेले नसल्याने नक्की सांगता येत नाही.






नुकत्याच सापडलेल्या नवीन लेणी



या लेण्यांच्या बाहेर मार्गावर हनुमान व गणेशाची प्रतिमा कातळात कोरलेली दिसते. मात्र ती बरीच अर्वाचिन आहे.





(समाप्त)

(संकलन - अशोक दारके)


मागील लेखांच्या लिंक्स -

लेखांक १ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/04/blog-post_17.html


लेखांक २ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/04/blog-post_19.html


लेखांक ३ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/05/blog-post_5.html


लेखांक ४ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/05/blog-post_17.html


लेखांक ५ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/05/blog-post_24.html


लेखांक ६ - 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/06/blog-post_9.html

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....