#कौळाणे येथील #महाराजा #सयाजीराव #गायकवाड #वाडा
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासुन अतिशय जवळ असलेले कौळाणे (नि)हे बडोदानरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जन्मगाव. मालेगावमध्ये कौळाणे नावाची दोन गावे आहेत. एक आहे कौळाणे निंबायती. हे राजाचे कौळाणे या नावानेही ओळखले जाते. तर दुसरे आहे कौळाणे गाळणा. हे गाव गाळणा किल्ल्याजवळ असल्याने त्याला कौळाणे गाळणा म्हटले जाते.महाराजा सयाजीराव गायकवाडांचं म्हणजेच राजाचं कौळाणे विचारले की रस्ता चुकत नाही.
मालेगावच्या अलीकडे उजव्या हाताला सौंदाणे गाव लागते. गावाच्या कमानीतून कौळाणेकडे जाता येते. येथून साधारण दहा किलोमीटरवर कौळाणे आहे. सुरूवातीला सौंदाणे, टाकळी व सोनजमधून उजव्या हाताने कौळाणेचा पोहचायचे. एसटीच्या थांब्यापासून गावात प्रवेश केला की आपण थेट गायकवाडांच्या भल्यामोठ्या वाड्यासमोर पोहचतो.
बडोदा संस्थानाच्या राज घराण्यात दत्तक गेल्यानंतर व राजे झाल्यावर महाराजांनी आपल्या कुटूंबाला आणि जवळच्या नातेवाईकांनाही हळूहळू बडोद्यात आणले. तरीही जन्मगावी महाराजांनी आपले वडील बंधू #आनंदराव यांच्यासाठी इ.स. १८८५ साली हा भव्य वाडा बांधून घेतला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या इतर भावंडांना व नातलगांनाही वाडे बांधून दिले. त्यामुळे गावात एक नव्हे तर सात भलेमोठे गायकवाडांचे वाडे आहेत.मात्र यातील दोन पूर्णपणे कोसळले आहेत.
आपण आज जाणून घेणार असलेला वाडा महाराजांचे ज्येष्ठ बंधू आनंदराव यांचा वाडा आहे.. आनंदरावांचे वंशज सत्यजितराजे गायकवाड यांनी हा राजवाडा 'दिलो जानसे' जपला आहे. आज हाच वाडा सयाजीरावांचा वाडा म्हणून ओळखला जातो.
वाड्याचे दरवाजाचे नक्षीकाम, सज्जा अन् दुमली वाड्यातील दोन चौक, दगडी व लाकडी खांब, चौकांमधील तुळस, तळघर, वीसपंचवीस खोल्या अन् आजूबाजूची नक्षी डोळ्यात भरते. पूर्वी या वाड्याच्या भिंती नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या चित्रांनी सजलेल्या होत्या. मात्र कालांतराने ते ऐश्वर्य मागे पडले. मात्र अशा स्थितीतही या वाड्याचे सौंदर्य पाहूनअजूनही डोळ्याचे पारणे फिटते.
या वाड्याचे आरेखन #पेस्टनजी दोराबजी खंडाळेवाला यांनी केले आहे. बांधकाम ठेकेदार #डोसाजी लुकमन हे होते तर मिस्त्री म्हणून #चिरधार लिलाधर यांनी काम केले आहे.डिझायनर #पेस्तनजी हुशार, कर्तबगार आणि महाराजांचे विश्वासू गृहस्थ होते. कवळाणे येथील हा वाडा बांधून झाल्यावर महाराजांनी त्यांना बढती देऊन त्यांची प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली. यानंतर खाजगी कारभारी नेमले.
सर्वांनी आवर्जून एकदा तरी जरूर भेट द्यावी असा हा वैभवशाली व प्रेक्षणीय वाडा आहे.
No comments:
Post a Comment