#आज_धनत्रयोदशी
धनत्रयोदशी, हा दिवाळीचा दुसरा दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
आज आपण याचं धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व जाणून घेणार आहोत…
धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमाराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे.
No comments:
Post a Comment