!! शिवप्रतापदिन !!
१० नोव्हेंबर १६५९
जगाच्या इतिहासातील सर्वोच्च पराक्रम, परिपूर्ण नियोजन, अदभुत शौर्य, निष्ठावान मावळे या जोरावर अफझलखान सारखा बलाढ्य शत्रु फाड़ला.
चित्रकार - कै. रघुवीर मुळगावकर
⛳⛳⛳🌞⛳⛳⛳
#शिवप्रतापदिन:-
(१० नोव्हेंबर १६५९).
संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भरलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचे स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान चालून आला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की,छत्रपती शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.
राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. खानाने राजांना आपल्या बाहुत जखडले.. दगा झाला. खानाने खंजीर राजांच्या पाठीत मारला, अंगरखा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. बिचवा पोटात घातला आणि पापणी लवायच्या आत खानाचा कोथळा बाहेर काढला... खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवाजी महाले यांनी त्याचा अचूक वेध घेतला.
खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण संभाजी कावजी समोर ठाकला. त्याने भोयाच्या पायावर वार केले, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.
खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाची तलवार धरून जवळच उभा होता तो शिवरायांवर वार करता झाला. वार राजेंच्या डोक्याला चाटून गेला. महाराज थोडक्यात बचावले. आणि महाराजांनी एकाच वारात त्यालाही गर्दीस मिळविले, त्याचेही मुंडके छाटले, खानासोबत कुलकर्णीही संपवला.
ही राजेंच्या आयुष्यतील त्यांच्यावर झालेली एकवेम जखम...
वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. महाराजांनीच त्याची आतडी बाहेर काढली होती. कारण दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठेच सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.
No comments:
Post a Comment