Wednesday, 4 November 2020

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

आज अरण्यऋषी मा.मारोती चितमपल्ली यांचा वाढदिवस.

त्यांना दीर्घायुष्य व सु आरोग्यासाठी आभाळभर शुभेच्छा.
दि.१२ नोव्हे.आ.सलीम अली यांची जयंती.
या कालावधीत महाराष्ट्र शासनाने "पक्षी सप्ताह"साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
त्यानिमीत्ताने नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याचा हा अल्प परिचय...
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील खानगाव थडी येथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर इ.स. १९११ च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसरास, इ.स. १९८६ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. १००.१२ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास जगप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून गौरवले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र (IBA) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसर आढळून येतो. ४०० हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती येथे बघायला मिळतात. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेते, नदी किना-यावरची वनराई ह्या बाबी देशी- विदेशी पक्ष्यांना आकर्षित करत असतात.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात उदमांजर, कोल्हे, लांडगे, बिबळे, मुंगूस, विविध प्रजातीचे साप, कासव हे वन्यप्राणी आढळतात. हिवाळ्यात रोहित, चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण इत्यादी पाणपक्षी भेट देत असतात. चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात.
पक्षी निरीक्षणासाठी येथे निरीक्षण मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. येथे पक्षी निरीक्षणासाठी प्याडल बोट अभयारण्य व्यवस्थापनेकडून उपलब्ध करून दिली जाते परंतु जलाशयातील पाण्याची पातळी, पक्षी जलाशयात विहार करत असल्यास ही बोट उपलब्ध नसते. तसेच ही बोट आपल्यालाच चालवावी लागते. अभयारण्य व्यवस्थापनेकडून कोणताही बोट चालक उपलब्ध करून दिला जात नाही. तसेच चापडगाव येथील स्वागतकक्षात फिल्ड गाईड, दुर्बिण आणि मार्गदर्शक उपलब्ध असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी किंवा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या वेळचा अविष्कार बघायचा असेल तर अभयारण्यालगतच खानगाव थडी येथे सिंचन विभागाद्वारा विश्राम गृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पक्षी निरीक्षणासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी असतो.













No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....