चांदवडचे रेणुका माता मंदिर
'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ असे जिचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, त्या रेणुकादेवीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आहे. रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवीचे मंदिर जुन्या दगडी बांधणीचे आहे. आतमध्ये फरशी व शेड वगळता सगळे बांधकाम अहिल्यादेवींच्याच काळातले आहे. भव्य दगडी प्रवेशद्वार, ५० पायऱ्या, मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी दीपमाळा ही सगळी दौलत अभिमानाने मिरवत रेणुकामातेचे मंदिर चांदवडमध्ये डौलाने उभे आहे. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराचे वैभव आहे आहे.
मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती स्वयंभू असून पाषाणाची आहे. रेणुकामातेची मूर्ती पूर्णाकार नसून केवळा एक तांदळा आहे. हा तांदळा अर्थात शेंदूरचर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय. त्याला डोळे, नाक, तोंड तयार केलेले आहेत, तसेच नथ व मुकुट घातलेले असतात. रेणुकादेवीला कर्नाटकात ‘यल्लमा’, तर महाराष्ट्रात ‘यमाई आणि ‘एकवीरा’ असेही म्हणतात. या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात, की गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपांत दिसते. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी, पादुका, नाग वगैरेंच्या दगडी प्रतिमा आहेत.
रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी-
रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परममातृपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची, एवढे तिचे पावित्र्य कठोर होते. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनांत कामवासना जागृत झाली. तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला. जमदग्नींची देवपूजा खोळंबून राहिली. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट जमदग्नी ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलाला, परशुरामाला दिली.
वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. आजही माहूरला रेणुकादेवीच्या फक्त पादुका, तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते.
चांदवडच्या रेणुकादेवीला भरपूर दागिने आहेत. देवीचा मुखवटा सोन्याचा असून, तो जवळजवळ दोन किलो वजनाचा आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवशी सकाळी एक पालखी रंगमहालातून निघते. तिच्यात देवीचा मुखवटा व दागदागिने असतात. अतिशय कडक बंदोबस्तात ही पालखी डोंगरातील देवीच्या मंदिरात जाते. दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात. रात्रीआठ वाजता ही पालखी पुन्हा पोलिस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते. देवीचे मंदिर गावापासून तीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे इतर वेळी गाभाऱ्यात देवीची चांदीची प्रतिमा ठेवलेली असते. रेणुकादेवीची आरती सकाळी व सायंकाळी नियमितपणे केली जाते. नवरात्रीत सकाळी साडेआठ वाजता, तर रात्रीची आरती देवीची पालखी निघून गेल्यावर रात्री साडेनऊ वाजता करण्यात येते.
No comments:
Post a Comment