एक अनोखी परंपरा - मुल्हेरचा रासोत्सव.....
श्रीकृष्णच्या जीवनात रासलीलेचे स्थान अढळ आहे. गोपिका व श्रीकृष्ण यांच्या एकमेकांवरच्या निस्सीम प्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. गोकुळातील गोपींचे कृष्णकन्हैयावर अपार प्रेम होते. कृष्णाचे सुद्धा सर्व गोपींवर समान प्रेम होते. सर्व गोपी श्रीकृष्णमय झाल्या होत्या. त्या गोपींना आपले पतीसुद्धा श्रीकृष्णरुप दिसत असत. श्रीकृष्णाने सर्व गोपींना वचन दिले होते. त्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेस रात्रीच्या शांत समयी मुरलीधरने मुरली वाजविण्यास सुरूवात केली. मुरलीचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी ऐकताच त्या सावध झाल्या. त्यांना कृष्णाच्या भेटीची ओढ लागली. त्यांनी व्यवस्थित शृंगार केला व श्रीकृष्णाकडे आल्या.
श्रीकृष्णास मुरली वाजवताना पाहून सर्व गोपींना आनंद झाला. श्रीकृष्णाने गोपींच्या संख्येएवढी रूपे धारण केली. त्यामुळे प्रत्येक गोपीला श्रीकृष्णाचा सहवास लाभला. एकमेकांचा हात धरून श्रीकृष्णासह गोल रिंगण करून गाणी म्हणत त्या आनंदाने नृत्य करू लागल्या. सर्व गोपिकांच्या जीवनातला तो सुवर्णक्षण होता. श्रीकृष्णाबरोबरची रासक्रीडा पाहून सर्व देवदेवतांना आपणसुद्धा गोपींचे रूप घ्यावे असे वाटू लागले. रासलीलेतील गोपींचे तालमय नृत्य पाहून रंभा, मेनका, तिलोत्तमा इ. अप्सरासुद्धा आश्चर्यचकित झाल्या. गंधर्व, यक्ष,किन्नर यांना गोपींचा हेवा वाटू लागला.
असाच अनोखा रासक्रीडा उत्सव नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे दरवर्षी साजरा होतो. नाशिकच्या बागलाण प्रांतातील मुल्हेर येथील रासोत्सव महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी एक आहे. मराठी प्रांत असूनही येथे उत्तरेतील मथुरा आणि वृंदावनात प्रचलीत असणाऱ्या ब्रज भाषेतील गोपीगीत गाऊन उत्सव साजरा केला जातो. स्थानिक श्रद्धेनुसार महाभारतातील राजा मयुरध्वज याने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने रासोत्सव सुरु केला. पुढे इ.स.१५० च्या सुमारास बागलाण प्रांतावर आभिरांचे आधिपत्य होते. ते स्वतःला कृष्णाच्या कुळातील समजत असत. त्यांनी ही परंपरा सुरु केली असावी परंतु त्याचे तेव्हाचे स्वरूप कसे असावे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. साधारणपणे हजार वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो अशी स्थानिक मान्यता आहे. प्रचलीत उत्सव इ.स.१६०० दरम्यान श्री.उद्धवमहाराजांचे गुरु श्री.काशिनाथमहाराज यांच्यापासून साजरा केला जातो.
स्थानिक आख्यायिकेनुसार हा उत्सव महाभारत कालीन मुल्हेर राजा मयूरध्वज याने (इ.स.पूर्व ३००० सुमारे )सुरु केला. राजा मयूरध्वजाचे राज्य नर्मदेच्या दक्षिण भागात होते या राजधानी रत्नपुर (मुल्हेरचे पूर्वीचे नाव ) पांडवांच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी नर्मदा हि त्यांच्या दिग्विजयाची सीमा निश्चित करण्यात आली.अर्जुन श्रीकृष्णासह नर्मदातीरी अश्व त्यांचा १६ वर्षाचा मुलगा ताम्रध्वज सांभाळत होता. अर्जुनाने नर्मदेच्या दक्षिण तिरावरील राज्यावर विजय मिळवण्याची इच्छा श्री कृष्णा जवळ प्रगट केली. पण देवाने सांगितले की, आपली हिच सीमा आहे. तसेच मयूरध्वज राजा महापराक्रमी आहे.त्याच्यापुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे तरी ही अर्जुनाने कृष्णाला आग्रह धरला की तुम्ही असतांना काहीही अशक्य नाही.मयूरध्वज हि कृष्ण भक्त होता. त्याच्यावर कृपा व्हावी व अर्जुनाचाही हट्ट पुरवावा. अशा इच्छेने ते सैन्यासह नर्मदेच्या तीरावर आले. त्यांचा सामना ताम्रध्वजानें केला तोही पराक्रमी होता. त्याने आपल्या बाणाच्या वर्षावाने अर्जुनाचा पराभव केला. मग कृष्णाने दुसरी युक्ती केली. त्या दोघांनी ब्राह्मण वेष धारण केला व मयूरध्वजाच्या यज्ञ मंडपात दान मागण्यासाठी आले राजाने त्यांचा आदर करून काय दान देऊ? हि पृच्छा केली तेव्हा ब्राह्मण रुपी कृष्णाने सांगितले की आमचा मुलगा जंगलात एका सिंहाने पकडला असून त्याला सोडविण्यास आपला अर्धा देह द्यावा. अशी इच्छा केली. राजाने कृष्णाचे चिंतन केले तेव्हा त्याला ब्राह्मणाचे खरे स्वरूप कळाले. साक्षात भगवान आपल्याकडे दान मागत आहेत हे जाणून राजाने पत्नी शुद्धमती व पुत्र ताम्रध्वज ह्याच्या हातून देह कापून दिला .श्रीकृष्ण राजावर प्रसन्न झाले. राजाचा त्याग पाहून अर्जुन हि खजील झाला. देवाने राजास वर देऊ केला तेव्हा मयूरध्वज म्हणाला की देवा आपल्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती आहेच. पण द्यायचे असेल तर आपल्या ह्या जन्मातील वैशिष्ट्य असलेली रासक्रीडा मला दाखवावी. श्रीकृष्णाने मयूरध्वज राजास ती दिव्यचक्षूंनी दाखविली. राजा धन्य झाला व भगवान श्रीकृष्णास विनंती केली की आपली हि कृपा अश्विनी पौर्णिमेस उत्सव म्हणून साजरी करण्याची परवानगी द्यावी, तेव्हा पासून रासक्रीडा उत्सव साजरा होतो. एवढेच नाही तर श्री उद्धव महाराजांनी आपले निर्वाणानंतर चे स्थान ह्या जागे जवळ असावे अशी इच्छा केली . म्हणून समाधी हि रासस्तंभा समोर आहे.
उत्सवाचे स्वरूप - अश्विन शुद्ध पौर्णिमेला गोरजमुहूर्तावर श्री.उद्धवमहाराज समाधी मंदिराच्या प्रांगणातील एका खांबावर चोवीस आरे असणाऱ्या चक्रावर केळीच्या पानांचे आच्छादन करून त्याचे आरोहण केले जाते त्यानंतर ते झेंडूच्या फुलांनी सुशोभित केले जाते. श्री.उद्धवमहाराजांचे वंशज असणाऱ्या पंडित घराण्यातील एका उपनयनसंस्कार झालेल्या बालकाला कृष्ण बनवतात तोच त्यादिवसाचा साक्षात भगवान असतो त्याची आणि इतर गोपींची पंडितांच्या घरी आरती केली जाते. त्यानंतर त्यांना उत्सवस्थळी चक्राखाली आसनावर बसवले जाते. रासक्रीडा उत्सवाची सुरुवात ही रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. यासाठी २८ फुट व्यासाचे भव्य चक्र दोरीच्या सहाय्याने विणून तयार केले जाते. यात १४ आऱ्या असलेल्या ७ फुट व्यासाचे चक्राला २८ बाम्बू बांधून ते २८फुट व्यासाचे भले मोठे चक्र कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे विनले जातेेचक्राची सजावट केळीची पाने व झेंडूच्या फुलांनी केली जाते. त्यानंतर सूर्यास्त व् चंद्रोदय यांच्या संपात काळी हजारो हातानी १४ फूटी रासस्तंभावर चढविले जाते.
रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना वाटून दिलेली असून सर्व समाजघटकांना विविध जबाबदार्या सोपवत सामाजिक एकतेचा संदेशही या उत्सवातून देण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आहे. आजही हे सर्व समाज आपापली परंपरा व जबाबदारी सांभाळून आहेत. रासमंडलासाठी लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणण्याचे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे, रासमंडल विणणे व देव सांभाळण्याची जबाबदारी शिंपी समाजाकडे, रासाच्या चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळण्याचे काम मराठा समाजाकडे, दिवाबत्तीची सोय करण्याचे नियोजन तेली समाजाकडे आणि भजन परंपरा व पूजा साहित्याची जबाबदारी ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात. मुल्हेर परिसरातील ४२ खेड्यांमधून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांचा सहभाग या उत्सवात असतो. गुजरातच्या डांग भागातूनही काही आदिवासी या उत्सवासाठी मुल्हेर गाठतात.
सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्या मध्यकाळी म्हणजेच संपतकाळी हे चक्र चंद्र सूर्याच्या साक्षीने, श्री उद्धव महाराज की जयच्या जयघोषात १४ फूट उंचीच्या रासस्तंभावर चढवतात. चक्र म्हणजे मंडल होय. वृंदावनात अशाच मंडलाखाली भगवान श्रीकृष्ण गोपिकांसमवेत वृंदावनात रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतिक म्हणजेच हे रासचक्र आहे तर रासक्रीडेला गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार इ.स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा। मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते. रासक्रीडा उत्सवाची धुरा सध्या मुल्हेरच्या श्री उद्धव महाराज समाधी संस्थानकडे आहे. चारशे वर्षांपूर्वी उद्धव महाराजांनी मुल्हेरला समाधी घेतली. त्यांचे गुरू श्री काशीनाथ महाराज मुल्हेरलाच राहत. त्यांच्याही आधी मुल्हेरमध्ये रासक्रीडा उत्सव सुरू होताच.
मात्र, इ. स. १६४०च्या सुमारास काशीनाथ महाराजांनी रासक्रीडा उत्सवाची पुनर्रचना केल्याचे संदर्भ श्री उद्धवमहाराज संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरू आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा सहवास आणि उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात हा रासोत्सव आजही उत्तर भारतीय पद्धतीनेच साजरा केला जातो. श्री उद्धव महाराजांच्या समाधीसमोर संपातकाली रास स्तंभावर चक्र चढल्या नंतर पूजा, आरती होते. रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्णाचे रूप दिले जाते. नवसाने झालेल्या मुला, मुलींना राधागोपिका बनवून राधा कृष्ण जय कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी वा भजनाच्या जयघोषाने देवघरापासून समाधी मंदिराकडे नेतात, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होतो. सकाळी सात वाजेपर्यंत रासाच्या चक्राखाली व्रज भाषेतील १०५ भजने म्हटली जातात. या भाजनांची रचना विस्कळीत झाली. ती पुन्हा सुस्थापित करण्याचे काम श्री काशीनाथ महाराजांनी केले. या भजनांची गायकी पंजाबी आहे. तर पखवाज उत्तर भारतीय आहे. सुमारे अर्धा किलो वजनाची दक्षिणी झांज अत्यंत वेगाने या भजनांमध्ये वाजवली जाते.
या भजनांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही भजने संत कबीर, नरसिंह स्वामी यांनी रचलेली असून यात श्रीकृष्णाशी असलेली गोपिकांची एकरूपता, विरहाचि व्याकुळता आणि समर्पण याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण, मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकॉस, रामकली, भैरवी, नायकी आदी रागदारीत गायली जातात. रासक्रीडेची भजने गाण्यामध्ये तरुण वर्गाचा उत्साह लक्षणीय असतो, हेही एक या उत्सवाचे वैशिष्ठ्य. भजन सोहळ्याची सांगता भैरवीने होते. हा परमोच्च क्षण असतो. यावेळी उपस्थित भाविकांचे अश्रूंनी डोळे भरून येतात. सकाळी ८.३० वा. रासस्तंभावरून रासचक्र हळूवारपणे खाली उतरविले जाते. त्यानंतर रासचक्र महोत्सवाची सांगता होते. यादिवशी मुल्हेरमध्ये मोठी यात्रा भरते. या उत्सवाला महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक कोजागिरीच्या रात्री उपस्थित असतात. त्यामुळे मुल्हेरला यात्रेचे स्वरूप येते.
या उत्सवात नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठीही गर्दी असते. त्यात अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलणारे अधिक असतात. नवस हा श्रद्धेचा भाग असला तरी हा रासक्रीडा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आहे यात शंका नाही.
Friday, 18 October 2024
मुल्हेरचा रासोत्सव
Saturday, 5 October 2024
श्री देवी सप्तश्रुंग स्तोत्र
श्रीगणेशाय नमः || श्री सरस्वत्ये नमः || श्री गुरुभ्यो नमः || श्री दुर्गादेव्ये नमः ||
ॐ नमो श्री सप्तशृंगी निवासिनी | नमो सह्याद्रीशिखर रूपिनी |
नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी | जगजननी तुज नमो ||१||
नमो महिषासुरमर्दिनी | नमो सुरवरबंधमोचनी |
नमो भक्त मनोल्हासिनी दैत्यकुलदाहिनी तुजनमो ||२||
नमो मुळमाया भगवती | तुझीया नामे भक्त गर्जती |
सगुणरूप नटली पर्वती | पहाता तटस्थ सूरनर ||३||
कष्टे लंघुनी गिरीवर | जवळ करिता तुझे द्वार |
शिन भाग उतरे पार |नवल अदभूत हेची पै ||४||
सुंदर ध्यान मृत्युलोकी | भक्तलिन सदविवेकी |
साष्टांग नमोनी नयन झाकी | हृदय मंदिरी रूप तुझे ||५||
सर्व सुरांचे तेज एकवटले | अष्टादश भूजारूप नटले |
दानव अंगी भय सुटले | उर्वीवरी प्रगटता ||६||
सर्व देवांची एकशक्ती | प्रेमभावे करावी भक्ती |
ओळंगती चारी मुक्ती |निश्चय चित्ती असावा ||७||
औट पिठे भारता माझारी | अर्धपिठ सप्तश्रुंगगिरी |
दुर्गा हीच आष्टादशकरी | पावली निर्वाण भक्तासी ||८||
विप्रकुळांची कुलस्वामिनी | रेणुकामाता पुर निवासिनी |
क्षत्रियकुल वरदायिनी | तुळजापूर तुकाई ||९||
तृतीय वर्ण वैश्याची आई | करविर निवासिनी रमाबाई |१०||
ध्यान धावते पर्वत कंदरी | क्रोधावली असुरावरी |
नानापरी आयुधेकारी | रणांगणी उभी जैसी ||११||
कधी सौम्यरूप दिसे | कधी नयना उग्रता भासे |
भक्तजना लाविले पिसे | संचारोनी नाचवी थै थै ||१२||
सन्मुख पार्वती मार्कंडेय मुनी | वाडे सप्तसतीचा मधुर ध्वनी |
परिसे जगदंबा लक्ष लावोनी | हस्त कर्णासी लाविला ||१३||
घोडंब निवासीनि धृवबाला | स्तवनार्थी उभी पूर्वेला |
पाठीशी परशुरामबाला | निसर्ग रचना सुंदर ||१४||
गणेशतीर्थी लंबोदर | यमुनातांबुल तीर्थ मनोहर |
शिवालय तीर्थी सिद्धेश्वर | स्नाने पतिता उद्धरी ||१५||
पिंडश्राद्ध पितृतर्पण | करिता पूर्वजा उद्धरण |
मनिद्विपी स्वानंदे करून | समिपता मुक्ती भोगिती ||१६||
नवदुर्गा पर्वत शिखरी | शस्त्रे सज्ज घेवुनिया करी |
गुप्तउभ्यारण सुंदरी | ध्वजरक्षणी सावध ||१७||
सप्तमातृका विक्राळरूप | करी पाजाळुनी पोत दीप |
स्वेच्छे खेळती समीप | रक्षणी सप्तश्रुंगाचे ||१८||
वेताळादि चंडीका भैरव | शाखिनी डाकिनी बिरुदेव |
सांभाळी ती स्वयमेव | अंबिका राजदरबार ||१९||
अदभूत चमत्कार अनेक | वर्णिता वाटेल कौतुक |
सर्वस्वी नटली रूप एक | भगवती अंबिका समर्थ ||२०||
राम असता बळ ब्रम्हचारी | तीर्थे फिरलासे उर्वीवरी |
तव सप्तश्रुंगासी रावणारी | दर्शनास्तव पातले ||२१||
रघुनाथ वनवासी असता | पंचवटी ये निवास करिता |
सांगे घेउनी जनकदुहिता | मातेच्या दर्शनी येतसे ||२२||
अद्यापि सिंदूर चर्चुनी | जगदंबे सन्मुख बैसोनी |
भक्तजना प्रथम दर्शनी | सगुणरूप नटला असे ||२३||
ऐसी माय माझी अनादी | सदभक्ता उतरावी भवाद्धी |
योगिया ब्रम्हानंदपदी | स्वानंदे बैसवी अक्षय ||२४||
सप्तश्रुंगरूपे सप्तशती | शुद्ध वैखरी उच्चारिती |
तयासीच उत्तमगती | तवकृपे लाभतसे ||२५||
ऐसी जगन्माता श्रीमंतीण | भक्ता का करिसी हैराण |
अन्न उदाक्स्तव दिनदिन | हिंडवीसी दारोदारी ||२६||
भक्ता कसोटी लाविसी | खरे खोटे निवडिसी |
सदभक्ता अपंगीसी | अंती दाविसी ब्रम्हरूप ||२७||
तुझे गाता गुणगान | राधासुत झाला लीन |
जळी स्थळी तुझे ध्यान | अहोरात्र ध्यातसे ||२८||
कधी दाविसी चितस्वरूप | भक्ती करिता जपतप |
अंतरीचा ध्यान दिप | अखंड जळतो तवकृपे ||२९||
आता नको हो अंत पाहू | करपल्लवे किती तुज पाहू |
यातना कुठवरी साहू | विश्वमोहिनी दयाळे ||३०||
जीवसृष्टीची जीवन कळा | चिदानंदरुपी चितकळा |
त्रिभुवन सुंदरी वेल्हाळ | भोळा खुळा भाव माझा ||३१|
माया ब्रंम्हात मानिती भेद | निवडीता तटस्थ झाले वेद |
ज्ञानवंत पी घालिती वाद | खेद बहु वाटतसे ||३२||
अंबे तूच रामकृष्ण हरी | राधा रुक्मिणी जनककुमारी |
माया ब्रंम्हाचा खेळ दशअवतारी | आभेदत्व नसेची ||३३||
देहासवे फिरे छाया | तैसी व्यापली श्रीहरीची माया |
ब्रम्ह स्वरूपी ओळख द्याया | जगदंबिका समर्थ ||३४||
पित्याची ओळखी माताच सांगे | बाप म्हणविता वर पांगे |
दूषण येईल निजांगे | समाधान मायकरी ||३५||
सगुणसृष्टी सगुणदेव | भावे मानिले स्वयमेव ।
भेदाभेद पहाती जीव | सोहं शिवा विसरले ||३६||
माजेल वादाचा पाल्हाळ | दुर्गा भगवती गुण वेल्हाळ |
आमंगळासी करिले मंगळ | कृपामृत दृष्टीने ||३७||
तुझे रूप ध्यानी मनी | शिरी मुकुट पंचफणी |
केस मोकळे सोडोनी | मान झुकविली उत्तरे ||३८||
कुंकुम लाविले स्वस्तीक | हरिंद्रा गुलाल बुक्का टिक |
वक्र भुवया सुरेख | धनुष्या कृती शोभती ||३९||
शंकरे चंद्रमा धरिला जटेत तोची | तुझिया मुकुटात |
दैत्यावरील क्रोध बहुत | शितल होण्या धरीला असे ||४०||
किंचित मुरडीले नाशिक | नथनी सर्जाची सुरेख |
गालावरी लावली टीक | दृष्ट सगुनीला होईल ||४१||
कर्णफुले शोभती छान | तांबुल विडामुखी धरून |
अलंकार गळा भरून | नाभिपर्यंत लोळतसे ||४२||
पुतळ्याची हौस भारी | ताईत पेट्या डोरले शिनगरी |
कंठा बोरमाळ गळसरी | महाराणी शोभतसे ||४३||
रंगारंगाच्या पैठण्या फार | नारळी जरतारी बुट्टेदार |
छातीवरी उभा पदर | गुर्जरनि माय माझी ||४४||
पायघोळ दिसे छान | शिंदेशाही तोडर घालोन |
सच्य चरण उचलोन | वाम पुढे टाकिला ||४५||
कमंडलुरुद्राक्ष माला | वामसव्य दोन्ही कराला |
सव्य हास्ती परशु धरीला | वाम लाविला मुकुटासी ||४६||
आणिक हस्त चतुर्दश | शस्त्रे धरिले बहुवश |
दृष्टदानव दंडनास | वर्णिता विस्तार वाढेल ||४७||
आश्विन शुद्ध कोजागिरी | श्रुंगार पुजा षोडशोपचारी |
महापूजा रात्रभरी | नामगजरी कल्लोळ ||४८||
कोजागिरीचे चंद्रामृत | रम्य वनश्री डोलत |
वैकुंठ कैलास भासत | भाविक भक्ता स्वानंद ||४९||
वनस्पती सिद्ध सोज्वळ | धरूजाता होतसे ज्वाळ |
संधीनी संजीवानी कोमल मृतजीवा उठविती ||५०||
गळसरीची प्रदक्षिणा | सोपी आते बहुजना |
आखतिर्थी प्रदक्षिणा | आष्टतिर्थ दर्शन ||५१||
सूर्यतीर्थ कालिका तिर्थ | गंगा लक्ष्मी सरस्वती तिर्थ |
तांबुल यमुना शितला तिर्थ | स्नाने पापे नासती ||५२||
तिसरी महा प्रदक्षिणा | सुरथराजा वैश्यस्थाना |
वणी मार्कंडेया सहजाना | गणती तिन योजने ||५३||
कृतयुगी ब्रम्हा सांगे नारदा | सिद्धीदायक भक्त वरदा |
कालिका लक्ष्मी शारदा | जगदंबीका हिच पै ||५४||
ममकमंडलु पासून निघाली | गिरीजा तीच गीरणा नाम पावली |
महानदित मुख्य जहाली | पर्वता सन्नीध वहातसे ||५५||
ऐसा या अर्धपीठाचा महिमा | नित्य जपावे बत्तीस नामा |
दुर्गभीमा दुर्गाभामा | दुर्गमात्मस्वरूपिणी ||५६||
दुर्गा दुर्गा र्तीशमनी | दुर्गमा दुर्गपद्वी निवारीनी |
दुर्गमच्छेदिनी | दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी | दुर्गभ्या ||५७||
दुर्गतोध्वारिनी दुर्गनिहंत्री | दुर्गमापहा दुर्गमासुर सहंत्री |
कलीयुगी नाममंत्री | उद्धरतिल मानव ||५८||
दुर्गमज्ञानदा दुर्गमार्ग स्वरुपिनी | दुर्गभा दुर्गमायुधधारिणी |
दुर्गमालोका दुर्गमार्थ स्वरुपिनी | दुर्गदैत्य लोक दवानला ||५९||
दुर्गमार्गप्रदा दुर्गमाश्रीता | दुर्गमविद्या दुर्गमता |
दुर्गमांगी आंबामाता | दुर्गमज्ञान संस्थाना ||६०||
दुर्गभ्या दुर्गमेश्वरी दुर्गभात्रिभुवना माझारी |
नाम पठणे संकटे निवारी | दुर्गदारिणी भगवती ||६१||
नामस्मरणी ठेवुन विश्वास | त्रिकाल जपावे बत्तीस नामास |
निर्विघ्न करील भक्तास | सप्तश्रुंगी निवासिनी ||६२||
भक्तिसाधन नामची श्रेष्ठ | नचसाधती जपतपाचे कष्ट |
नाम महिमा वरिष्ठ | कलीयुगा माझारी ||६३||
तनमन धनेची शरण | धरावे आंबेची चरण |
त्रिविध ताप दारूण | निवारील निश्चये ||६४||
निष्काम करिता भक्ती | आंगीबाने चैतन्य शक्ती |
चौ पुरुषार्थ चारीमुक्ती | वोळंगती सर्वस्वे ||६५||
अमृत मोहिनी निवासी | महालयाच्या पंचक्रोसि |
एक योजने दक्षिणेसी | जन्मभूमी कारेगाव ||६६||
प्रतिष्ठान निवासी एकनाथ | मासिक वारी पिता करीत |
नाथ कृपेने जन्म होत | देहनाम निवृत्ती ||६७||
माता माझी राधाबाई | मुखी नाम आंबाबाई |
बालपणी मंत्र देई | तोची लोलो लागला ||६८||
सप्तश्रुंग दुर्गामाई | तुझी लीला तुची वदवी |
भरून उरली सर्वाठाई | मी तव अज्ञान बालक ||६९||
श्रोतया विनवी भक्तकवी | चुकी भुली पदरात घ्यावी |
बहुश्रुत अनुभवी | नमन माझे साष्टांग ||७०||
इतिश्री पद्म पुराणांतरगत | वर्णिली सह्याद्री खंडात |
मार्कंडेय सप्तशतीत | सविस्तर कथियेले ||७१||
तया आधारे वर्णन केले | भक्ती भावे श्रुंगारीले |
श्रीजगदंबे चरणी वाहिले | भक्ता मुखी वदवावे ||७२||
|| श्रीजगदंबार्पणमस्तु ||
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...
-
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) 'भद्रं करोति इति भद्रकाली | ' भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी ...
-
आज #गोदावरी #जन्मोत्सव... गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. #भगवान ...