आज चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन मानला जातो.
नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता ||१||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ ||२||
स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही खात्रीशीर अशी माहिती नाही पण एका हकीकतीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हरियाणातील छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ प्रकट झाले होते असे मानले जाते. स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जावून तेथिल पुरोहितांमधील हरीहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत. याचा दाखला देऊन तेथिल काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्र प्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदिनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथिल पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरणार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैद्राबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथिल चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबधी व चरित्रासंबंधी खात्रीशिर आणि सुत्रबध्द माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास २३ वर्षे वास्तव्य होते. आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार यागोष्टी पाहता, स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म स्वरुप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे.
दरम्यान, स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरात आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १८७८ होता. त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामिसुत महाराजांनी सुरु केला आहे. तेव्हापासून दरवर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जातो.
स्वामी समर्थांचे परम शिष्य असलेल्या स्वामीसुत महाराजांनी त्यांचा स्वामींशी झालेल्या संवादावर जे काही अभंग रचले आहेत त्यात त्यांनी स्वामींच्या प्रकटण्याबद्दल वर्णन केले आहे.
दत्त माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥०१॥
छेलीखेड्या ग्रामामाजीं । झाला अवतार हा सहजी ॥०२॥
गोटी खेळण्याचा रंग । तेव्हां मनी झालो दंग ॥०३॥
तेथे होता विजयसिंग । आतां येथे करू रंग ॥०४॥
गजानन आनंदला । पाहुनियां त्या खेळाला ॥०५॥
नाचताती चहू कोणीं । नुपुरें वाजतीं चरणीं ॥०६॥
गोटी गोटीचा हा वाद । हरीचा हसण्याचा छंद ॥०७॥
हंसू लागे वक्रतुण्ड । हलवूनी प्रीती सोंड ॥०८॥
विष्णु स्तंभी प्रकटलें । दत्त गोटी फोडूनि आले ॥०९॥
माझ्या स्वामीचीं करणीं । कंप होतसे धरणीं ॥१०॥
गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय करीं ॥११॥
गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग ॥१२॥
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली ॥१३॥
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ ॥१४॥
एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती लीला ॥१५॥
स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या काजाला ॥१६॥
स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथेच 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. मात्र, आजही लोकांमध्ये स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।