विजयादशमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तींना विशेष वस्त्र परिधान करण्यात येते. ह्या वस्त्राना वल्कले म्हणतात. प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सितामाई जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा त्यानी वल्कले परिधान केली होती. वृक्षांच्या सालींपासून हे वस्त्र बनवतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे देव रथात आरूढ होऊन सिमोल्लंघन करण्यासाठी चालले आहे असा देखावा मांडण्यात येतो व देवांना पारंपारिक आभूषणे देखील चढवण्यात येतात.
Wednesday, 25 October 2023
Thursday, 19 October 2023
स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक
स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक
ब्रिटिशांच्या दास्यातून भारतमातेची मुक्तता या अनिवार ध्यासातूनच सावरकरांना ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हा महन्मंगल मंत्र स्फुरला. या मंत्राच्या सिध्दीसाठी त्यांनी ’अभिनव भारत’ या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. सावरकर लंडनला गेले, तेही त्यासाठीच. हि कथा आहे सावरकरांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मीची व अभिनव भारत संस्थेची.
१८९८ मध्ये भगूर व आजूबाजूच्या गावांमध्ये प्लेगचा उद्रेक झाल्याने बाबाराव व तात्याराव सावरकर हे दोघे सावरकर बंधू नाशिकच्या तीळभांडेश्वर गल्ली येथील वर्तकांच्या वाड्यात वास्तव्यास आले. सुरुवातीला वर्तकांच्या वाड्यात राहणारे सावरकर कुटुंबीय नंतर तो वाडा सोडून दातारांच्या घरात वास्तव्य करू लागले. ही सर्व मंडळी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम या राष्ट्रीय भावनेने भारावलेली होती. ‘आपला भारत देश या जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीत अडकला आहे. भारतीय जनता भरडली जात आहे. आपण आपल्या परीने जमेल तशी सशस्त्र क्रांती करून इंग्रजांच्या विरोधात लढले पाहिजे,‘ असे या सर्वांचे ठाम मत होते. यातूनच नोव्हेंबर १८९९ मध्ये या सर्व मित्रांनी म्हणजेच सावरकर बंधू, दातार बंधू, वर्तक, चिपळूणकर, म्हसकर, पागे या सर्वांनी मिळून ‘राष्ट्रभक्त समूह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. याची प्रकट शाखा म्हणून दि. १ जानेवारी १९०० ला ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना केली. ‘मित्रमेळा’च्या बैठकांमध्ये तत्कालीन इंग्रज करत असलेले जुलूम-जबरदस्ती व अन्याय कृतींबाबत चर्चा केली जात असे.
‘स्वातंत्र्य हेच साध्य आणि सशस्त्र क्रांती हेच साधन’ हे ‘मित्रमेळ्या’चे ब्रीदवाक्य होते. ‘मित्रमेळ्या‘त जातीभेद नव्हता, शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने ‘मित्रमेळा‘ समूहातर्फे नाशिकमध्ये साजरे केले जात. विनायक सावरकर हा तरुण मुलगा तेथीलच जवळील पिंपळाच्या पारावर उभा राहून देशाची सध्याची परिस्थिती आपल्या भाषणातून सांगत असे. ‘देश स्वतंत्र व्हावा, यासाठी सर्वांनी आपापसातील वैयक्तिक हेवेदावे विसरून राष्ट्रभक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरोधात लढले पाहिजे,‘ असे हा तरुण विनायक सर्व नाशिककरांना सांगत असे. विनायकाची भाषणे ऐकण्यासाठी दुरून लोक नाशिकला येत असत. पिंपळपार परिसरामध्ये जमत असत. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदूमून जात असे.
‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.
१९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्या ब्रिटिशांना कळावं, सार्या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले.
दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.
तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.
सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते. त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदीर, नाशिक येथील स्वातंत्र्यलक्ष्मीची मुर्ती १९५६ छायचित्राखालिल अक्षर बहुदा स्वत: स्वातंत्र्यवीरांचे आहे. (हे मूळ फोटोच्या मागे लिहिले आहे)पोस्ट साभार- चंद्रशेखर साने
Saturday, 14 October 2023
नाशिकची ग्रामदेवता कालिका माता
नाशिक शहराची ग्रामदेवता असलेले कालिका मातेचे मंदिर
नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्याच लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.
मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.
स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.
पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. मंदिराच्या आवारातील उद्यानात कालिका मातेचे परमभक्त असलेले रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत.
मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर.
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...
-
भद्रकाली शक्तीपीठ, जनस्थान नाशिक (चिबूकस्थान) 'भद्रं करोति इति भद्रकाली | ' भद्र म्हणजे कल्याण| करोति म्हणजे करणारी| याचा अर्थ जी ...
-
आज #गोदावरी #जन्मोत्सव... गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. #भगवान ...