Sunday, 16 April 2023

भारतीय रेल्वेचा शुभारंभ


'साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलाची गाडी कशी ढकली रे! 


हाच तो दिवस आणि हीच ती तारीख.... आजच घडली ती भारताला आधुनिक करणारी घटना.. आणि याच दिवशी जगाच्या इतिहासातील एका प्रकरणात


भारतीय रेल्वेचा शुभारंभ झाला. बरोब्बर १७० वर्षांपूर्वी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ती आजच्याच दिवशी. ब्रिटिश राज मध्ये कलकत्त्यावर मात करून प्रवासी रेल्वेचा शुभारंभ करण्याचा मान मुंबई शहराने मिळवला. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. 

दुपारी ३.३० वाजता २१ तोफांची सलामी घेऊन या रेल्वेने आपला प्रवास सुरू केला. १४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० भाग्यवान प्रवासी बसले होते. सिंध, सुलतान आणि साहिब या तीन वाफेच्या इंजिनांनी या ट्रेनला ५७ मिनिटात ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचवले. या मार्गावर तेंव्हा कुर्ला आणि भायखळा ही दोनच स्थानके होती. या रेल्वेनं वाटेत पाणी भरण्यासाठी सायन येथे एक थांबा घेतला. ४.४५ वाजता ही गाडी ठाणे स्थानकात पोहोचली तेंव्हा स्वागतासाठी शेकडो ठाणेकर उपस्थित होते. या गाडीने पहिला प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना शाही खाना देण्यात आला. 


वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी गाडी पाहून 

' साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलांची गाडी कशी ढकली रे ' असं गाणं ही तेंव्हा लोकप्रिय झालं होतं. 



Thursday, 6 April 2023

हनुमान जयंती



मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥


https://tinyurl.com/bbjdpkte


भक्ति, शक्ती, बुद्धी, समर्पण आणि अचल निष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक असलेले महाबली हनुमान यांची आज जयंती. हनुमानाची दैवत म्हणून उपासना होत असली, हनुमान जयंती साजरी होत असली तरी हनुमानाबद्दल तपशीलवार माहिती असतेच असं नाही.


हनुमानाच्या जन्माची कथा मोठी रोचक आहे. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. 


व्युत्पत्ती : वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही. हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही. केमिली बुल्के त्यांच्या ‘रामकथा: उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.


हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.


हनुमानाचे जन्मस्थान: हनुमानाच्या जन्मस्थानाबद्दल विविध प्रांतातील लोक दावे करतात. नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत

कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत, हरियाणातील गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे, अंजनधामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत, पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल इ. विविध ठिकाणी त्याचे जन्मस्थळ आहे असे तेथील स्थानिक लोक मानतात. मात्र बहुतांशी लोक नाशिकजवळील अंजनेरी पर्वत अथवा हंपीजवळील अंजनेय पर्वत या दोन ठिकाणांना जन्मस्थळ म्हणून मान्यता देतात. 


हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात, संगीत् रत्नाकार इ. ग्रंथांतून प्राचीन संगीताचार्यांबरोबर अंजनेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.


हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे.  हनुमानाची पंचमुखी मूर्ती  रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.


रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.


हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्त वर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे. 


आज हनुमान जयंतीच्या मुहुर्ताव हनुमंताची समर्पण वृत्ती, पराक्रम आणि संकटांवर मात करण्याची जिद्द् आत्मसात करण्याचा आपण संकल्प करूया. मारुतीरायांचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच या मंगलदिनी प्रार्थना आहे. 


संकट कटै मिटै सब पीरा।

जो सुमिरै हनुमत बलबीरा।।


#हनुमानजयंती


वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....