आज दासनवमी....
सद्गुरु समर्थ रामदासांनी पंधरा दिवस आधी पूर्व सूचना देऊन इ.स.१६८२ च्या माघ वद्य नवमीला दुपारी साडे बारा वाजता सज्जनगडावर देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ' दासनवमी ' म्हणून ओळखली जाते.
समर्थांनी तर देह ठेवण्याआधी आपल्या शिष्यांना दिलेल्या अखेरच्या संदेशात स्पष्ट सांगून ठेवले आहे कीं ते या जगांत त्यांच्या ग्रंथ रूपाने निरंतर वास करून आहेत.
माघ वद्य नवमीला समर्थांनी तीन वेळेला मोठ्यांदा रामनामाची गर्जना केल्यानंतर त्यांची प्राणज्योत त्यांच्या शरीरातून बाहेर पडली व समोरच्या राममूर्तीत प्रविष्ट झाली. दुपारी साडे बारा वाजता त्यांनी अशा प्रकारे देह ठेवला.
रामदास स्वामी समाधिस्त झाल्याची ही बातमी संभाजीराजांना समजली. समर्थांच्या उत्तरकार्यासाठी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना सज्जनगडी जाण्याची आज्ञा केली. नंतर दीड महिन्याने संभाजीराजे रामचंद्रपंतांसह सज्जनगडावर गेले. समर्थांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधीसुद्धा मोठे देवालय बांधण्याची आज्ञा केली. दीड महिन्यात मोठे देवालय करविले. खाली समाधी आणि वरती तंजावरहून आणलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान याच्या मूर्ती असे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मठाच्या खर्चास द्रव्य पुरविण्याची रामचंद्रपंत अमात्य व खंडोबल्लाळ यांना आज्ञा दिली. साधुसंतांचा योग्य तो मान राखण्याचे शिवाजी महाराजांचेच धोरण संभाजीराजांनी अंगिकारले.
समर्थ समाधी रुपाने सज्जनगडावर आजही आहेत व भाविकांना याचे प्रत्यंतर अनेक प्रकारांनी येत असते. तेथील समाधी मंदिरावर पुढील श्लोक आहे.
सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदारश्रृंगापरि ।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीउर्वशीचे तिरी ।
साकेताधीपती कपि भगवती हे देव ज्याचे शिरी ।
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या टाकळी (नाशिक) येथील गोमय हनुमान मंदिरात जतन केलेल्या समर्थांच्या चरण पादुका (खडावा)