Tuesday, 20 December 2022

२१ डिसेंबर, हुतात्मा अनंत कान्हेरे शौर्य दिवस !

 आज २१ डिसेंबर. आज जॅक्सन वधाला ११३ वर्ष पूर्ण झाली. 


https://tinyurl.com/yc2vsxcr


नागरिकांवर होणाऱ्या जुलुमाच्या व अत्याचाराच्या निषेधार्थ अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ब्रिटिश कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान पिस्तुलाने गोळी झाडून हत्या केली. 


वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दाखवलेल्या सशस्त्र पराक्रमास त्रिवार वंदन.


ज्या पिस्तुलातून अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या ते पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील पिस्तुलांपैकी एक होते. अनंत कान्हेरे यांना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे व इतर समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. 


जॅक्सनची हत्या केल्यानंतर अनंत कान्हेरे आपल्या जागेवर शांतपणे उभे राहिले. त्यांना अटक करण्यात आली.  अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे, जोशी व गंगाराम मारवाडी यांच्यावर खटला भरण्यात आला. या खटल्याची व्याप्ती वाढवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही त्यात आरोपी करण्यात आले. हा खटला नाशिक कट खटला म्हणूनही ओळखला जातो. त्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना २० मार्च १९१० रोजी फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. या तिघांचेही मृतदेह नातलगांना न सोपवता त्यांच्यावर परस्पर अंतिम संस्कार करण्यात आले. ब्रिटिश सरकारने अस्थी ठाण्याच्या खाडीत आणि रक्षा मुंबईला समुद्रात विसर्जित केली.  तर या व इतर खटल्यांच्या आधारे २४ डिसेंबर १९१० ला स्वा. सावरकरांना ५० वर्षे जन्मठेपेची अर्थात काळ्यापाण्याची व त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 


अश्या वीर हुतात्म्यांना व त्यांच्या सशस्त्र पराक्रमाला त्रिवार वंदन !!!


वंदे मातरम्









Thursday, 15 December 2022

भेटवस्तूऐवजी रोख रकमेच्या पाकीटामध्ये आपण तो अतिरिक्त एक रुपया का जोडतो

वाढदिवस किंवा लग्न यासारख्या शुभप्रसंगी, कधीकधी आपण भेटवस्तूऐवजी " रोख रकमेचे पाकीट" देणे पसंत करतो. पण आपण पाकीटात ठेवलेली रक्कम कधीच  रु. १०, १००, ५०० किंवा १००० अशी नसते; पण नेहमीच  रु. ११, १०१, ५०१ किंवा १००१  अशा प्रकारे दिली जाते.  मग रोख रकमेच्या पाकीटामध्ये आपण तो अतिरिक्त एक रुपया का जोडतो याचा कधी विचार केला आहे का ?


असे करण्यामागे चार कारणे असू शकतात :


१)आपण दिलेली रोख रक्कम ही शुभेच्छांचे प्रतीक असते. त्यामुळे त्या रकमेतील  "शून्य" म्हणजे समाप्ती, तर "एक" म्हणजे नवीन सुरुवात. तो अतिरिक्त एक रुपया हे सुनिश्चित करतो की प्राप्तकर्ता शून्यावर येऊ नये तर एक या अंकाप्रमाणेच सतत वाढत जावो. 


२) गणितीय दृष्ट्या १०,  १००, ५०० आणि १००० या संख्यांना पूणर्पणे भाग जातो; परंतु ११, १०१, ५०१ आणि १००१ या संख्या अविभाज्य आहेत. शगुन हा आशीर्वाद आहे आणि आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद अविभाज्य राहावेत, अशी त्यामागची इच्छा असते. 


३) जोडलेला एक रुपया हा सातत्याचे प्रतीक आहे, मूळ रकमेच्या पुढे. तो देणारा आणि घेणारा यांच्यातील बंध मजबूत करतो. याचा सरळ अर्थ की "आपले चांगले संबंध कायम राहतील."


४) पूर्वीच्या काळी आशीर्वाद अथवा शुभेच्छा देताना सोने, चांदी इ. धातू दिले जात असत. तसेच नाणे धातूचे बनलेले असते, जे पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते. आणि ते लक्ष्मीचा अंश मानले जाते. मोठी रक्कम ही गुंतवणूक असली तरी, एक रुपयाचे नाणे हे त्या गुंतवणुकीच्या पुढील वृद्धीचे "बीज" असते. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ही गुंतवणूक रोख किंवा कर्मामध्ये वाढण्यासाठी आहे.





Wednesday, 7 December 2022

श्रीदत्त जयंती

 मार्गशीर्ष शुक्लपक्ष पौर्णिमा, श्रीदत्त जयंती उत्सव





त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर 

होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार

दत्त म्हणजे साकार होणे, प्रगट होणे, अवतिर्ण होणे.

परमेश्वर आपल्या शरिराच्या रुपाने साकार झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व ईश्वर रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.


तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य (परमेश्वर).

सहा हात :- शरीराचे दोन हात - डावा व उजवा

मनाचे दोन हात - बहिर्मन व अंतर्मन

चैतन्याचे दोन हात - जाणिव व नेणीव.

गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.

श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.

हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात राम अशी जगण्याची जीवन शैली.

काखेत झोळी म्हणजे सतत इतरांकडून ज्ञान मिळवत रहा.


किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.

जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.

सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.

म्हणून ख-या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.


दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा! 🙏🏻💐🚩


#Datta #DattaJayanti #Dattatreya #दत्त #दत्तात्रय #दत्तजयंती




वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....